पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक स्तरावरील व्यापार युद्धाची तीव्रता कमी होण्याचे संकेत, परदेशी गुंतवणूकदारांचा कायम राहिलेला खरेदीवर जोर आणि जागतिक व्यापारात भारताचे अनुकूल स्थान आदी घटक भारतीय शेअर बाजारासाठी फायदेशीर ठरले आहे. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी (दि.२३) सलग सातव्या सत्रात वाढून बंद झाले. सेन्सेक्स ५२० अंकांनी वाढून ८०,११६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १६१ अंकांच्या वाढीसह २४,३२८ वर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी, फार्मा आणि रियल्टी सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीचा जोर दिसून आला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत विक्रमी उच्चांकावर गेलेला निफ्टी बँक निर्देशांकाला प्रॉफिट बुकिंगला सामोरे जावे लागले. यामुळे यात किरकोळ घसरण दिसून आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करारानंतर चीनच्या आयातीवरील शुल्क (टॅरिफ) लक्षणीयरीत्या कमी होईल, असे संकेत दिल्यानंतर व्यापार तणाव निवळण्याच्या आशावादामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली.
निफ्टी आयटी आज ४.४ टक्के वाढला. निफ्टी आयटीवर एचसीएल टेक ७.६ टक्के, कोफोर्ज ६ टक्के, ओएफसीसी ५.३ टक्के, LTIMindtree ५ टक्के आणि टेक महिंद्राचा शेअर्स ४.४ टक्के वाढला. फार्मा आणि रियल्टी निर्देशांकही प्रत्येकी सुमारे १ टक्के वाढले.
सेन्सेक्सवर एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एम अँड एम, इन्फोसिस, टीसीएस, सन फार्मा, टाटा स्टील, भारती एअरटेल, एलटी, मारुती, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, कोटक बँक, एसबीआय, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. दरम्यान, २२ एप्रिल रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,२९० कोटी रुपयांच्या शेअर्सची खेरदी केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ८८५.६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.