पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स- निफ्टी निर्देशांक शुक्रवारी (दि. १४) सलग आठव्या सत्रांत घसरुन बंद झाले. सेन्सेक्स १९९ अंकांनी घसरून ७५,९३९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १०२ अंकांच्या घसरणीसह २२,९२९ वर स्थिरावला.
सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद झाले. फार्मा मीडिया, मेटल, ऑईल अँड गॅस, पीएसयू बँक, रियल्टी, कन्झ्यूमर ड्युरेबल्स, एनर्जी हे निर्देशांक १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसई मिडकॅ २.५ टक्के, स्मॉलकॅप ३.२ टक्के घसरला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन आयातीवर कर लागू करणाऱ्या देशांवर परस्पर शुल्क लागू करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला. परिणामी बाजारात आज घसरण दिसून आली. विशेषतः आजच्या सत्रात फार्मा शेअर्सना मोठा फटका बसला. निफ्टी फार्मा निर्देशांक आज २.८ टक्के घसरला.
सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, एम अँड एम, एलटी, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस हे शेअर्स वाढून बंद झाले.
भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री कायम राहिल्याने बाजार भांडवल ८ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. जून २०२४ नंतर पहिल्यांदाच बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४०० लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर्सची विक्री कायम आहे. या महिन्यात विदेशी गुंतवणूदारांनी सुमारे १९,०७७ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. याआधी जानेवारी महिन्यात त्यांनी ७८,०२७ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली होती. गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी २,७८९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.
तिसऱ्या तिमाहीतील कमकुवत कार्पोरेट कमाईचाही बाजारात परिणाम दिसून येत आहे.