सेन्सेक्स 86000 च्या उंबरठ्यावर Pudhari File Photo
अर्थभान

लाखाचा टप्पा गाठण्यास सोनेही आतूर!

पुढारी वृत्तसेवा
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

सप्टेंबर महिन्याची Monthly Expiry गुरुवार दिनांक 26 रोजी धुमधडाक्यात पार पडली. धुमधडाक्यात म्हणण्याचे कारण सप्टेंबर महिन्यात निफ्टी, सेन्सेक्स आणि निफ्टी बँक हे तिन्ही प्रमुख निर्देशांक पावणे पाच ते पाच टक्के वाढले. निफ्टीने पावशतकी टप्प्यानंतर कधी 26000 चा टप्पा पार केला, हे कळलेदेखील नाही. सेन्सेक्स 86000 च्या उंबरठ्यावर आहे; मात्र निफ्टी स्मॉल कॅपच्या तेजीचा वेग मंदावला आहे. निफ्टी मिडकॉपही धापा टाकतो आहे. निफ्टी 100 ने 4.5 टक्के रिटर्नस सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. त्यावरून आगामी काळातही लार्ज कंपन्यांतील तेजी अशीच वाढवण्याची चिन्हे आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे Nifty CPSE, Nifty PSE आणि Nifty PSU Bank हे तीनही सरकारी कंपन्यांचे निर्देशांक रेड झोनमध्ये राहिले. बाकी सर्व एकूण एक सेक्टरल निर्देशांक तेजीमध्ये राहिले. सरकारी बँका आणि सरकारी कंपन्या यांच्या शेअर्सना लागलेले ग्रहण कधी सुटणार? मध्यंतरी एका ब्रोकरेज फर्मने या सरकारी कंपन्यांचे शेअर्स अतिमहाग झाल्याचा रिपोर्ट प्रसिद्ध केला. हा रिपोर्ट सरकारी कंपन्यांच्या घसरणीस कारणीभूत ठरला. आज Oil, Hal, NMDC, PFC, Cochin Shipyard NBCC हे शेअर्स त्यांच्या उच्चांकापासून कितीतरी खाली आले आहेत.

Nifty Consumption आणि Nifty Realty या दोन निर्देशांकांनी सप्टेंबर महिन्यातील तेजीचे नेतृत्व केले. दोन्ही निर्देशांक जवळपास 8 टक्क्यांनी वाढले. हे निर्देशांक बाजाराच्या एकूणच वाटचालीत अतिशय महत्त्वाचे आहेत. Nifty Consumption हा एक Diversified Sectors चा समावेश असलेला इंडेक्स आहे. कंझ्युमर गुडस्, ऑटो, ऑटो काँपोनंटस्, कंझ्युमर सर्व्हिसेस, टेलिकम्युनिकेशन्स, कंझ्युमर ड्यूरेबल्स, हेल्थकेअर, पॉवर, रिअ‍ॅल्टी अशा विविध सेक्टर्सचा त्यात समावेश होत असल्यामुळे हा इंडेक्स तेजीत असणे म्हणजे बाजारातील तेजी सर्वसमावेशक असणे असे समीकरण आहे. या इंडेक्समधील Britannia, Colgate-Palmolive, Eicher Motors, Nestle India Hero Moto, Hindustan Uniliver हे शेअर्स त्यांच्या All Time High च्या पातळीवर टेड करीत आहेत.

दुसरा महत्त्वाचा इंडेक्स म्हणजे Nifty Realty! या सेक्टरवर सिमेंट, मेटल्स, बिल्डिंग मटेरिअल्स वगैरे अनेक उद्योगांचे भविष्य अवलंबून असते. त्यामुळे Realty मधील तेजी बाजारामध्ये एक चैतन्य आणते. DLF, Prestige, Godrej Properties, Sobha हे शेअर्स सप्टेंबरमध्ये पावणेआठ ते पंधरा टक्के वाढले. सर्वात जास्त बहार आली ती Brigade च्या शेअरमध्ये. साडेबावीस टक्क्यांनी वाढून हा शेअर रु. 1453.10 या अत्युच्च पातळीवर पोहोचला.

शेअर बाजारात यश मिळविण्यासाठी सेक्टर रोटेशनचे महत्त्व ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. एकाच वेळी सर्व सेक्टर्समध्ये तेजी येत नाही आणि बाजारात मंदी आली तरी FMCG, Pharma, IT ही सेक्टर्स मंदी थोपविण्याचे काम करतात, हे आपल्याला माहीत असेलच. कोव्हिडनंतर Pharma मध्ये, त्यानंतर Chemicals मध्ये, नंतर Realty आणि Infra मध्ये, IT मध्ये आलेली तेजी आपण अनुभवली. सध्या प्रायव्हेट बँकांमधली तेजी आपण पाहतो आहोत. त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत. तसेच लाईफ इन्श्युरन्स, जनरल इन्श्युरन्स कंपन्यांचे शेअर्सही वाढत आहेत. सप्टेंबर महिन्यात Chola Finance, Bajaj Finserv, ICICI Life Insurance या शेअर्सनी विक्रमी पातळी गाठली. बजाज फायनान्स, एसबीआय कार्ड हे शेअर्सही तेजी दाखवत आहेत. श्रीराम फायनान्सचा All Time High वर आहे. यासंदर्भात Aptus Value Housing Finance या शेअरचा गुंतवणूकदारांनी अवश्य अभ्यास करावा. हा एक उत्तम शेअर आहे. मार्च ते जून तिमाहीत FIIS आणि DIIS यांनी या शेअर्समधील गुंतवणूक लक्षणीयरित्या वाढवली आहे. शुक्रवारी शेअर्सचा बंदभाव रु. 364 आहे.

बजाज ऑटोच्या शेअरला बे्रक लागण्याची चिन्हे तूर्तास तरी दिसत नाहीत. मागील एका वर्षात हा शेअर 131 टक्के वाढला आहे. 2024 चा विचार केला, तर नऊ महिन्यांत तो 76 टक्के वाढला आहे. रु. 12774 चा विक्रमी भाव त्याने गाठला आहे. हीच बाब अल्ट्राटेक सिमेंटची. तोही रु. 12138 या विक्रमी पातळीवर सध्या आहे. हे दोन्ही शेअर्स रु. 20000 च्या भावाकडे वाटचाल करीत आहेत, असे दिसते. अल्ट्राटेक सिमेंटमधील म्युच्युअल फंडांचा खरेदीचा ओढा दिवसेंदिवस वाढतो आहे.

आता एका मनोरंजक गोष्टीकडे वळूया! सन 2024 च्या जानेवरीपासून सप्टेंबरअखेरच्या 9 महिन्यांत (YTD Returns) निफ्टी 50 ने 20 टक्के, सेन्सेक्सने 18.50 टक्के, तर निफ्टी बँकने 11.60 टक्के निटर्नस दिले आहेत; परंतु याच काळात सोन्याने 28 टक्के रिटर्नस् दिले आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याज दर कमी केले; परंतु याचवेळी मध्यपूर्वेत आणि दक्षिण पूर्व आशियातील संघर्षाने शेअर बाजारात मंदी येणार असे वाटल्यामुळे, सोन्यामधील गुंतवणूक वाढली. आता स्थिती अशी आहे, त्यामुळे सर्वप्रथम लक्षाधीश होण्याचा मान कोण पटकावणार? सेन्सेक्स की सोने? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल आणि तेही 2024 हे वर्ष संपायच्या आत हे साध्य होईल का, हाही एक औत्सुक्याचा विषय आहे कारण अगोदरच भारतीय बाजार तेजीच्या अश्वावर आरूढ आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची घोषणा ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे; त्यामुळे सेन्सेक्स एक लाख आधी की, सोने प्रती ग्रॅम रु. एक लाख आधी? घोडामैदान जवळच आहे!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT