जगात आजकाल प्रत्येक गोष्ट डिजिटल होत आहे. या डिजिटल युगात पैशाचे व्यवहारदेखील ऑनलाईनने झटपट होत आहेत. यापुढे जात क्यूआर कोडने पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून ती अतिशय सुलभ आणि सोपी आहे.
काडीपेटी खरेदीपासून ते महागडा मोबाईल खरेदी करण्यापर्यंतचे व्यवहार क्यूआर कोडने होत आहेत. मात्र पैसे पाठविण्याच्या घाईगडबडीत अनेकदा तुम्ही आम्ही बनावट स्कॅमर्सच्या बनावट क्यूआर कोडला बळी पडू शकतो. अलीकडेच बनावट क्यूआर कोड स्कॅनची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. पडताळणी न करता क्यूआर कोड स्कॅन करणे हे जोखमीचे राहू शकते. एकीकडे क्यूआर कोडला स्कॅमर्सनी बनावट कोडच्या साहाय्याने बदल केलेला असल्याने पेमेंट थेट स्कॅमर्सच्या खात्यात जात आहेत. अशावेळी बनावट आणि खरे क्यूआर कोड ओळखणे महत्त्वाचे ठरते. सर्वच क्युआर कोड एकसारखे दिसतात; परंतु त्यापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
साऊंड बॉक्सचा वापर : बनावट क्यूआर कोडपासून वाचण्यासाठी पेमेंट रीसीव्हर आणि पेमेंट करणार्या दोघांनी सजग राहणे आवश्यक आहे. रीसीव्हरने पेमेंटची खातरजमा करण्यासाठी साऊंड बॉक्सचा वापर करायला हवा. अशावेळी बनावट क्यूआर कोडच्या माध्यमातून पेमेंट होत असेल तर त्याला वेळीच थांबवता येऊ शकते.
पेमेंट करण्यापूर्वी खातरजमा : तुम्ही क्यूआर कोडद्वारे पेमेंट करत असाल तर पेमेंटच्या अगोदर दुकानदार किंवा मालकाचे नाव विचारून घ्या आणि कोड स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवर तेच नाव आहे का ते पाहा. स्कॅन केल्यानंतर भलत्याच व्यक्तीचे नाव समोर येत असेल तर पेमेंट करू नका आणि तशी सूचना मालकाला द्या. यानुसार तो क्यूआर कोडबाबत कारवाई करू शकेल.
चुकीच्या क्यूआर कोडची ओळख : एखादे पेमेंट करताना क्यूआर कोड संशयित वाटत असेल तर गुगल लेन्सच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅन करायला हवा. या प्रयोगातून तुम्हाला यूआरएल हे कोणत्या संकेतस्थळावर रीडायरेक्ट होत आहे हे समजेल आणि फसवणुकीतून तुमचा बचाव होऊ शकतो. एक फेक किंवा संशयास्पद यूआरएल हा टायपो किंवा चुकीच्या शब्दांत असतो. तसेच एक्स्टर्नल टूलचा वापर करत लहान केलेल्या क्यूआर कोडच्या यूआरएलचा वापर करू नये. छोटा यूआरएल हा यूजरला कोणत्याही संकेतस्थळाचे नाव दाखवत नाही. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्याकडून पैसे घ्यायचे असेल तर क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही.
फेरफार केलेल्या क्यूआर कोडपासून सावध : फिजिकली क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी कोड व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा करायला हवी. म्हणजेच खर्या कोडवर कोणी स्टिकर तर लावलेले नाही ना? ते पाहा. तुम्हाला संशय वाटत असेल तर संबंधित व्यक्तीकडून क्यूआर कोडची तपासणी करून घ्या किंवा अशा कोडच्या वापरापासून दूर राहा.
पैसे स्वीकारताना क्यूआर कोड स्कॅन करणे : पैसे पाठविण्यासाठी क्यूआर कोडचा वापर केला जातो आणि पैसे स्वीकारण्यासाठी देखील. पैसे किंवा पेमेंट ट्रान्स्फर करण्याचा दावा करणारे मेसेज किंवा ई-मेल आले असतील आणि त्यात क्यूआर कोड असेल तर ते स्कॅन करू नका.
तुम्ही क्यूआर कोडच्या मदतीने अॅप डाऊनलोड करत असाल तर सावधान. कारण कदाचित फसवे अॅप डाऊनलोड होऊ शकते आणि आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता राहते. अॅप कोणताही असो तो गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोरवरूनच डाऊनलोड करायला हवा. अॅपसाठी क्यूआर कोड स्कॅनिंग टाळावे.
संकेतस्थळ सुरू करणार्या कोणत्याही क्यूआर कोडला पेमेंटसाठी स्कॅन करू नका. तुम्हाला क्यूआर कोडमार्फत पेमेंट करायचे असेल तर एक व्हॅलिड पेमेंट अॅपमार्फत करायला हवे. या व्यवस्थेत रीसीव्हरची खातरजमा झालेली असते. तुम्हाला एखाद्या संकेतस्थळाच्या मदतीने पेमेंट करण्याची गरज असेल तर स्वत: यूआरएल टाईप करा.