अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्‍या आराेपांवर 'सेबी'च्‍या प्रमुख माधवी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी संयुक्‍त निवेदन जारी केले आहे. (Image source- X)
अर्थभान

madhabi buch | सर्व आरोप निराधार, हा तर 'सेबी'च्‍या विश्वासार्हतेवर हल्ला

'हिंडेनबर्ग'च्या आरोपावर बुच दाम्‍पत्‍याने जारी केले संयुक्‍त निवेदन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने ताज्या अहवालात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)च्‍या प्रमुख माधवी पुरी बूच ( madhabi buch) आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावर आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. हे सर्व आरोप निराधार असल्‍याचे बुच दाम्‍पत्‍यांनी आपल्‍या संयुक्‍त निवेदनात म्‍हटलं आहे. अदानी समूहाच्या संस्थांमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. तसेच हिंडेनबर्ग रिसर्चने नमूद केलेल्या फंडात त्यांची गुंतवणूक सेबी प्रमुख म्हणून नियुक्तीच्या दोन वर्षांपूर्वी झाली होती. हिंडनबर्ग रिसर्च कडून सेबीच्‍या विश्‍वासहर्तावरच हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे.

काय आहे आरोप?

हिंडेनबर्ग रिसर्चचया ताज्‍या अहवालात आरोप करण्‍यात आला आहे की, माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी विनोद अदानींच्‍या ऑफशोअर फंडांमध्ये गुंतवणूक केली. विनोद अदानी हे दुबईत राहणारे गौतम अदानी यांचे मोठे भाऊ आहेत.

बुच दाम्‍पत्‍याने सर्व आराेप फेटाळले, संयुक्‍त निवेदन जारी

बुच दाम्पत्याने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "हिंडेनबर्ग यांनी 10 ऑगस्ट रोजी आमच्यावर केलेल्या आरोप पूर्णपणे निराधार आहेत. हे सर्व आरोपांमध्‍ये कोणतेही तथ्य नाही. आमची सर्व आर्थिक कागदपत्रे सेबीला देण्यात आली आहेत. ज्या व्यक्तीवर सेबीने कारवाई केली आहे आणि कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, ती व्यक्ती त्याला उत्तर म्हणून खोटे आरोप करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्‍या ताज्‍या आरोपांबाबत अदानी समूहानेही एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, हिंडेनबर्गने केलेले नवीन आरोप दुर्भावनापूर्ण, खोडकर आणि दिशाभूल करण्याच्या हेतूने करण्‍यात आले आहेत.

गुंतवणुकीबाबत केला खुलासा

बुच दाम्‍पत्‍याने जारी केलेल्‍या तपशीलवार निवेदनात म्हटले आहे की त्यांची IIFL वेल्थ मॅनेजमेंटच्या फंडातील गुंतवणूक सिंगापूर-आधारित खाजगी नागरिक म्हणून करण्यात आली होती. माधवी पूर्णवेळ सदस्य म्हणून सेबीमध्ये रुजू होण्याच्या दोन वर्षांपूर्वी ही गुंतवणूक करण्यात आली होती. त्‍यावेळी मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल आहुजा हे धवलचे शालेय आणि IIT दिल्लीतील बालपणीचे मित्र असल्यामुळे आणि Citibank, JP Morgan आणि 3i Group PLC चे माजी कर्मचारी असल्याने अनेक दशकांमधली मजबूत गुंतवणूक करिअर असल्यामुळे या फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ब्लॅकस्टोनचे 2019 पासून वरिष्ठ सल्लागार असलेले धवल हे प्रायव्हेट इक्विटी फर्मच्या रिअल इस्टेटच्या बाजूने गुंतलेले नाहीत. निवेदनानुसार, माधवीची 2017 मध्ये सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लगेचच, तिच्या दोन सल्लागार कंपन्या बंद झाल्या होत्‍या.

नोटीशीला उत्तर देण्‍याऐवजी सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्ला करण्याचा प्रयत्‍न

'भारतातील विविध नियामक उल्लंघनांसाठी हिंडेनबर्गला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसला उत्तर देण्याऐवजी सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्ला करण्याचा आणि सेबीच्या अध्यक्षांच्या चारित्र्याला मारण्याचा प्रयत्न करणे हे दुर्दैवी असल्‍याचेही बूच दाम्‍पत्‍यांनी संयुक्‍त निवेदनात नमूद केले आहे. दरम्‍यान, गेल्या वर्षीही अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्गने अहवालाद्वारे केलेल्या आरोपांचा गंभीर परिणाम अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता. दरम्यान, आता हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतीयांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT