पुढारी ऑनलाईन डेस्क : बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने (Sebi) एका फ्रंट- रनिंग घोटाळ्याचा खुलासा केला आहे. ज्यात स्टॉक मार्केट ऑपरेटर केतन पारेख (Ketan Parekh) आणि सिंगापूर येथील ट्रेडर रोहित साळगावकर (Rohit Salgaocar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना भारतीय भांडवली बाजारात व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
केतन पारेख आणि रोहित साळगावकर यांनी याआधी २००१ मधील एका घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगला आहे. त्यांच्यावर साल २००३ मध्ये १४ वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये खरेदी, विक्री अथवा व्यवहार करण्यास बंदी घातली होती. केतन पारखने गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा रुपयांचा चुना लावला होता. त्यानंतर पारेख आणि अन्य लोकांवर कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एका घोटाळा समोर आला आहे. त्यात केतन पारेखचे नाव पुढे आले आहे.
सेबीने केतन पारेख आणि रोहित साळगावकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध अमेरिकेतील अज्ञात फंडाद्वारे केलेल्या कथित फ्रंट- रनिंग व्यवहाराविरोधात (front-running scam) अंतरिम आदेश पारित केला आहे. २ जानेवारी रोजी जारी केलेला हा आदेश १८८ पानांचा आहे.
२ जानेवारीला जारी केलेल्या आदेशानुसार, सेबीने सांगितले की पारेख आणि साळगावकरने फ्रंट- रनिंगची योजना आखली होती. यात ६५.७७ कोटी रुपयांची अवैध कमाई आहे. कथितरित्या उल्लंघन करून कमावलेल्या एकूण बेकायदेशीर नफ्यांपैकी ६५.७७ कोटी रुपये पारेख, साळगावकर आणि इतर २० जणांकडून जप्त करण्याचे निर्देशही सेबीने दिले आहेत. सेबीने हा आदेश २२ संस्थांच्या विरोधात जारी केला आहे. अलीकडेच सेबीने पूर्णवेळ सदस्य कमलेश वाष्णेय यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, रोहित साळगावकर (नोटिस प्राप्तकर्ता १) आणि केतन पारेख (नोटिस प्राप्तकर्ता २) यांनी फ्रंट रनिंगच्या माध्यमातून एका 'बिग क्लायंट' (फंड हाऊस) च्या एनपीआयचा वापर करत फायदा उठवला.
साळगावकर हे अमेरिकेतील फंडाचे कन्सल्टंट होते. ज्याचा सेबीने 'बिग क्लायंट' म्हणून उल्लेख केला आहे. या फंडाच्या ट्रेड्सनी भारतीय बाजारातील ऑर्डरपूर्वी साळगावकरशी सल्लामसलत केले, असे सेबीने म्हटले आहे. त्याने ही माहिती पारेखला दिली. त्याने ब्रोकर्सच्या नेटवर्कद्वारे बिग क्लायंटच्या ऑर्डरपूर्वीच व्यवहार केले.
सेबीच्या आदेशात अशोक कुमार पोद्दार, श्याम राजकुमार सरोगी, प्रदीप कुमार सरोगी, संजय तापडिया, सुमित सोंथालिया, किरण कुमार सोंथालिया, प्रिया सराफ, रचित पोद्दार, अशोक कुमार दमानी, अनिरुद्ध दमानी, प्रमोद कुमार द्रोलिया, विमल कुमार द्रोलिया, अनिता द्रोलिया, मनोज कुमार अग्रवाल, महेंद्र कुमार अग्रवाल आणि रेणू अग्रवाल यांच्या नावाचा समावेश आहे.