आर्थिक स्वातंत्र्याचे करू या नियोजन  Pudhari File Photo
अर्थभान

आर्थिक स्वातंत्र्याचे करू या नियोजन

पुढारी वृत्तसेवा
अनिल पाटील, प्रवर्तक : एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

गुंतवणूक करताना आर्थिक कौशल्य प्राप्त केले पाहिजे. तसेच सुरक्षितता आणि जोखीम याची सांगड घालता आली पाहिजे. वाढत्या भांडवली बाजारांचा फायदा घेता आला पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये जोखीम स्वीकारली पाहिजे, तर अल्पकालीन गुंतवणुकीमध्ये सुरक्षितता पाहिली पाहिजे.

येत्या गुरुवारी (दि. 15 ऑगस्ट) देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. यानिमित्ताने आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करणे औचित्यपूर्ण ठरेल. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? तर आपल्याकडे इतका पैसा हवा की, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी विशिष्ट वयानंतर काम करायला लागू नये. आपल्याला जीवन स्वच्छंदीपणे जगता आले पाहिजे. दर महिन्याला गरजेनुसार हवा तितका पैसा मिळायला हवा. ही परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच ‘आर्थिक स्वातंत्र्य’ असे म्हणता येईल. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे भरपूर संपत्ती असणे नव्हे. आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य देते. प्रत्येक वयाच्या स्तरावरील व्यक्तीसाठी आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ भिन्न असू शकतो. तुमच्या मूलभूत गरजा आणि राहणीमानाचा दर्जा टिकविण्यासाठी पुरेसे पैसे असणे आवश्यक आहे. आर्थिक स्वातंत्र्यासाठी कर्ज मुक्त असणे, पुरेशी बचत, गुंतवणूक आणि मालमत्ता असणे आवश्यक आहे.

कुटुंबाचा अर्थसंकल्प

प्रत्येकाच्या कुटुंबात उत्पन्नाच्या स्वरूपात पैसा येतो आणि खर्च होऊन जातो. पैसा किती येतो आणि किती जातो, याला महत्त्व नसून तो किती शिल्लक राहतो, हे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या मार्गाने दर महिन्याला किती पैसा येतो? आणि खर्च किती होतो? शिल्लक किती राहतो? शिल्लक भविष्यातल्या उदरनिर्वाहासाठी किंवा आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोठे गुंतवणूक करतो? तो किती टक्क्यांनी वाढतो? चांगला परतावा कोठे मिळतो, त्यासाठी गुंतवणूक निर्णय कसे घेतो? या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त असेल, तर वित्तीय तूट येते. तुमच्या घरातील अर्थसंकल्प मांडताना तो तुटीचा असून चालणार नाही. आलेल्या उत्पन्नापैकी किमान 30 टक्के बचतीचा हवा. जर दहा ते वीस टक्के शिल्लक राहत असेल आणि तुम्हीपारंपरिक योजनेमध्ये गुंतवणूक करीत असाल, तर तुमचा पैसा हा महागाई खात राहील. मध्यम वर्गीय लोकांच्या कुटुंबामध्ये ही परिस्थिती आढळून येते. ते बचत करतात, पण योग्य ठिकाणी गुंतवणूक नसल्याने पैसा वाढत नाही. आलेल्या पैशातील काहीच पैसा शिल्लक राहत नसेल, तर कुटुंबाचे भवितव्य हे कर्जबाजारी-उसनवारी याने भरून जाईल आणि आर्थिक संकटे निर्माण होतील.

उत्पन्नापैकी किमान 30 टक्केरक्कम शिल्लक राहिली पाहिजे आणि ती भांडवली बाजारातील मालमत्ते मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक गरजेनुसार आणि कालमर्यादेनुसार गुंतवणूक केली; तर मात्र तुमचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते. आपत्ती व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, अल्पकालीन व दीर्घकालीन गुंतवणूक, गरजांचे व्यवस्थापन आणि आर्थिक स्वातंत्र्याचे व्यवस्थापन अशा क्रमाने नियोजन केले पाहिजे. भविष्यातील गरजासाठी वेगवेगळ्या मालमत्तेमध्ये जोखीम घेऊन गुंतवणूक केली पाहिजे. त्या गुंतवणुकीचा आढावा घेतला पाहिजे. प्रत्येक वर्षी उत्पन्न आणि खर्च वाढत असतो. त्या पद्धतीने बचतही वाढवली पाहिजे. बर्‍याच वेळेला मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करण्यापेक्षा चार चाकी गाडी आणि महागडा मोबाईल या गोष्टीवर पैसा खर्च केला जातो. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना एक आर्थिक शिस्त लागली पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे आणि आर्थिक गरजा व वाढत्या महागाईनुसार कोणकोणत्या वर्षात पैशाची उपलब्धता हवी, याबाबत विचारविनिमय केला पाहिजे.

कोणत्या वर्षी किती मोठी रक्कम लागणार, हे निश्चित करून त्यानुसार गुंतवणुकीची सुरुवात केली पाहिजे. पैशाच्या वाढीचा वेग कमी असेल, तर तुम्हाला जास्त रक्कम गुंतवणूक करावी लागेल. पैशाच्या वाढीचा वेग मोठा असेल तर कमी पैशांमध्ये तुम्हाला मोठी रक्कम निर्माण करता येते. यासाठी अर्थ कौशल्य प्राप्त केले पाहिजे. आर्थिक यश सहजासहजी मिळत नाही. आर्थिक स्वातंत्र्य हे अंतिमस्थान नाही. हा एक प्रवास आहे. त्यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच घरामध्ये आर्थिक शिस्त आणि योजनाबद्ध अंमलबजावणी गरजेची आहे.

आपण एक उदाहरण पाहू...

समजा, राजेश यांचे सध्याचे वय 35 आहे. त्यांचा सध्याचा खर्च 50,000 रु. आहे. त्यांना वयाच्या 55 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे. राजेश यांची किमान वयोमर्यादा 80 गृहीत धरली, तर वयाच्या 55 ते 80 वर्षे पर्यंत म्हणजे 25 वर्षे सन्मानाने जगण्यासाठी 7 टक्के दराने वाढत्या महागाईनुसार किती रक्कम उभी करावी लागेल, याचा विचार केला पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राजेश यांच्याकडे वयाच्या 55 व्या वर्षी किमान 7 कोटी इतका निधी असायला हवा. आजचा 50,000/- खर्च विचारात घेतला तर वीस वर्षांनंतर 7 टक्के दराने वाढत्या महागाईनुसार खालील प्रमाणे पैशाच्या प्रवाहाची गरज भासणार आहे. राजेश यांच्याकडे 7,04,57,000 /- इतका निधी असेल, तरच आर्थिक स्वातंत्र्य मिळून सन्मानाने 80 वर्षांपर्यंत जगू शकेल. आज राजेश यांचे वय 50 इतके आहे. वाढत्या वयानुसार त्यांना दर महिन्याला खालीलप्रमाणे खर्चाची तरतूद करणे गरजेचे आहे.

55 व्या वर्षी 2,00,320/- 60 व्या वर्षी 2,80,900/- 65 व्या वर्षी 3,94,059 /-

70 व्या वर्षी 5,52, 688 /- 75 व्या वर्षी

7,75,174 /- 80 व्या वर्षी 10,87,221/-

वाढते वय, वाढणारी महागाई आणि वाढणारा खर्च या गोष्टींचा विचार केला असता, आजचा पन्नास हजार रुपये खर्च वरीलप्रमाणे 55 व्या वर्षी दोन लाख असणार आहे. 65 व्या वर्षी 4 लाख, 75 व्या वर्षी 7 लाख 75 हजार रुपये दरमहा खर्च असणार आहे आणि 80 व्या वर्षी 10 लाख रुपये दर महिन्याला खर्च होणार आहेत. हे वाढत्या महागाईचे परिणाम आहेत.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैसा येतो आणि जातो. मात्र, काही निवडक मंडळी बचत करतात आणि गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना आर्थिक कौशल्य प्राप्त केले पाहिजे. तसेच सुरक्षितता आणि जोखीम याची सांगड घालता आली पाहिजे. वाढत्या भांडवली बाजारांचा फायदा घेता आला पाहिजे. त्यासाठी एक चांगला सल्लागार भेटला पाहिजे.

दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये तुम्ही जोखीम स्वीकारली पाहिजे. तसेच अल्पकालीन गुंतवणुकीमध्ये सुरक्षितता पाहिली पाहिजे. आजच आपल्या कुटुंबाचा अर्थसंकल्प मांडून आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करायला सुरुवात करा.

आर्थिक नियोजन करताना...

आता तुमचे वय किती? आताच्या राहणीमानानुसार दर महिन्याला किती पैसा लागतो? तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य हवे? सध्याचा महागाईचा दर किती ? तुम्ही गुंतवणूक करत असणारी मालमत्ता किती टक्के दराने परतावा देते? आर्थिक स्वातंत्र्यकाळात तुमचा गुंतवणूक परतावा किती मिळणार?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT