अर्थभान

गृहकर्ज मुदतपूर्व फेडावे का? | पुढारी

Pudhari News

गृहकर्ज आपण वेळेच्या आधी फेडू शकतो. गृहकर्ज फेडण्यावरून मनात अनेक प्रश्‍न उपस्थित राहत असतील तर गृहकर्ज लवकर फेडणे कधीही हिताचे ठरू शकते. जर आपण परतफेड करण्यास सक्षम असाल तर परतफेडीचा अगोदर विचार करावा. यातून आपले मोठ्या प्रमाणात जाणारे व्याज वाचू शकते. परतफेडीनंतर बचत केलेल्या पैशातून नवीन गुंतवणूक करू शकता.     

वेळेपूर्वीच गृहकर्ज फेडण्याचा निर्णय हा शहाणपणाचा ठरू शकतो.

गृहकर्ज हे स्वत:चे घर खरेदीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. गृहकर्ज हे मालमत्ता तयार करण्यासाठी मोलाचा हातभार लावते. तरीही आपण थोडा वेळ काढून लवकरात लवकर गृहकर्ज फेडण्याची योजना आखायला हवी. या माध्यमातून अन्य खर्चासाठी पैशाची जमवाजमव आणि नवीन मालमत्ता खरेदीसाठी मदत होऊ शकते. कर्जाचा हप्ता कमी राहण्यासाठी बहुतांशी कर्जदार हे कर्जाचा कालावधी अधिकाधिक ठेवण्याचा प्रयत्न करतात.

उदाहरणार्थ, 30 वर्षांसाठी 8.5 टक्के व्याजदराने 50 लाखांचे कर्ज घेतल्यावर 38,446 हप्ता भरावा लागेल. जर याच कर्जासाठीची कालमर्यादा 10 वर्षे ठेवली तर हप्त्याची रक्कम 61,993 इतकी असेल. यावरून आपल्या लक्षात येईल की कर्जाचा कालावधी अधिक ठेवला तर हप्ता कमी बसतो. मात्र आपण त्याअगोदरच परतफेड करून कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकतो. उत्पन्न वाढल्याने किंवा बोनस आदी कारणांमुळे आपल्याकडे कधी कधी अतिरिक्त पैसा येतो. या पैशाचा वापर आपण वेळेच्या अगोदर फेडीसाठी करू शकतो. मात्र त्यात काही अडचणींचा सामनादेखील करावा लागतो. वेळेच्या अगोदरच कर्ज कसे फेडता येईल, हेे लक्षात घेऊ या.

आजघडीला बहुतेक बँका गृहकर्ज मुदतपूर्व परतफेडीवर कोणताही प्रीपेमेंट पेनल्टी चार्ज आकारत नाहीत. त्यामुळे कर्ज घेणार्‍यांसमोर कर्जाची फेड लवकरात लवकर करून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असतो. यातून व्याजाच्या रुपातून जाणारा पैसा वाचू शकतो. लवकर कर्ज फेडल्यास निश्‍चितच आपल्याला दिलासा मिळतो. उदा. 50 लाख रुपयांचे कर्ज जसे की अगोदर सांगितल्याप्रमाणे दहा वर्षात फेडले तर आपल्याला 24.39 लाख व्याज द्यावे लागेल. तर 30 वर्षांत फेड केल्यास 88.4 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणूनच व्याज वाचवण्यासाठी परतफेड लवकर करणे ही बाब महत्त्वाची ठरू शकते. 

वेळेपूर्वीच कर्जमुक्त व्हा

वेळेच्या आधी कर्जाची परतफेड करावी की नाही, याचा निर्णय हा कधी कधी करभरणावर अवलंबून असतो. कर्जाच्या संपूर्ण कालावधीच्या काळात सुमारे 50 ते 60 टक्के कालावधीत  हप्त्यातील मोठा भाग व्याजाचा असतो आणि मूळ रक्कम खूपच कमी असते. कर्जाच्या परतफेडीच्या शेवटच्या टप्प्यात मोठा हिस्सा हा मूळ रक्कमेचा असतो आणि व्याजाची रक्कम कमी झालेली असते. यावरून एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, ती म्हणजे कर्जाच्या सुरवातीचा काळ हा केवळ व्याज भरण्यातच जातो आणि उत्तरार्ध हा मूळ रक्कम भरण्यात.

त्यामुळे कर्जाच्या सुरुवातीलाच टप्प्याटप्प्याने अतिरिक्त पैसे जमा केले तर व्याजाचा प्रभाव कमी राहू शकतो. शेवटच्या काळात परतफेडीला फारसा अर्थ राहत नाही कारण तोपर्यंत बँकेने भलेमोठे व्याज आपल्या हप्त्यातून काढलेले असते. मुदतपूर्व कर्ज फेडताना तुमच्या आयकराचाही विचार करा. कारण कर्जपरतफेडीनंतर गृहकर्जावरील हप्त्यावर मिळणारी करसवलत बंद होते. त्यामुळे कदाचित आयकर भरावा लागू शकतो. त्यासाठीची तुमची आर्थिक तरतूद काय आहे, करबचतीसाठी अन्य कोणत्या उपाययोजना करता येण्याजोग्या आहेत याचा विचार करून मगच निर्णय घ्या.

 

-सतीश जाधव

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT