पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सुवर्ण कर्ज (Gold Loan) घेण्यात झालेली वाढ आणि यामधील अनियमिततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर २०२४ अखेरच्या कालावधीत सोने तारण कर्जात एक वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत झपाट्याने वाढ झाली आहे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सोन्यावरील वाढते अवलंबन आणि सोने तारण कर्जातील अनियमिततावर RBI ने आपल्या अहवालात चिंता व्यक्त केली आहे.
'आरबीआय'च्या अहवालात म्हटलं आहे की, सुवर्ण कर्जात (गोल्ड लोन) सप्टेंबर 2024 कालावधीत वेगाने वाढ झाल्याचे दिसते. मार्च 2024 पर्यंत बँका आणि संपूर्ण बँकिंग परवाना नसलेली नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी ( NBFCs) द्वारे वितरीत केलेल्या एकूण सुवर्ण कर्जामध्ये NBFCsचा 59.9 टक्के वाटा आहे. यावरुन सोने तारण कर्जाची मागणीची वाढ स्पष्ट होते.
सोने तारण कर्जावेळी सोन्याच्या मूल्यांकनातील विसंगती आणि कर्ज निधीवेळीचे पूर्ण निरीक्षण नसणे यांचा समावेश आहे. तसेच सुवर्ण कर्जात बँकिंग परवाना नसलेली नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या ( NBFCs) वर्चस्व गाजवत असल्याचेही आरबीआय अहवालात नमूद केले आहे. मार्च 2024 अखेरीस एकूण सोन्याच्या कर्जाच्या (बँका आणि NBFC एकत्रितपणे) 59.9 टक्के वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वैयक्तिक कर्जात सप्टेंबर 2023 पासून लक्षणीयरीत्या घट झाली आहे. किरकोळ मायक्रोफायनान्स आणि स्वयं-सहायता गट (SHG) कर्जांचा वाढीचा दर गेल्या वर्षी दोन तृतीयांश पेक्षा अधिक घसरला आहे, असे आरबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
'द इंडियन एक्स्प्रेस'च्या रिपाेर्टनुसार, मंदीच्या अर्थव्यवस्थेवर उत्पन्नाच्या पातळीवर परिणाम झाल्याने कर्जदार कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. अनेक ग्राहक घरगुती खर्च, शिक्षण शुल्क आणि वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी सोने गहाण ठेवून कर्ज काढतात. केवळ परतफेडीच्या मागण्या पूर्ण करण्यात ते असमर्थ ठरले. याव्यतिरिक्त, सोन्याच्या किमती वाढल्याने, अधिकांनी सुवर्ण कर्जाला प्राधान्य दिले आहे. बँकांचे सोन्याचे कर्ज मार्च 2024 मध्ये 1.02 ट्रिलियन रुपयांवरून ऑक्टोबर 2024 मध्ये 1.54 ट्रिलियन रुपयांवर पोहोचले. लवचिक परतफेडीचे पर्याय आणि दैनंदिन परतफेड सुविधा यासारख्या वैशिष्ट्यांमुळे सुवर्ण कर्जे सर्वसामान्यांच्या आर्थिक कर्ज भागविण्यासाठी एक पर्याय ठरत आहे. अल्पकालीन आर्थिक गरजांसाठीही सुवर्ण कर्जे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.