RBI Announces Big Relief for Fraud Victims: ऑनलाइन व्यवहारात फसवणूक झाली, तर ग्राहकांना आता नुकसानभरपाई मिळू शकते. RBIने वाढत्या डिजिटल फ्रॉडला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रस्तावित नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीद्वारे पैसे गेले, तर त्याला 25 हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते.
आरबीआयने हे फ्रेमवर्क बँकिंग फ्रॉड रोखण्यासाठी आणि बँकांना अधिक जबाबदार बनवण्यासाठी तयार केले आहे. यासोबतच संपूर्ण बँकिंग प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठीही काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.
आरबीआय गव्हर्नर यांनी सांगितलं की, सध्या देशातील बँकिंग आणि NBFC क्षेत्र मजबूत स्थितीत आहे. मात्र ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन नियम आणले जात आहेत. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी लवकरच एक “डिस्कशन पेपर” प्रसिद्ध केला जाणार आहे. यात व्यवहारांची मर्यादा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसारख्या ग्राहकांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय सुचवले जाणार आहेत.
दरम्यान, मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी डिसेंबर 2025 मध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली होती. सध्या हेच दर सुरू राहणार आहेत. याचा अर्थ होमलोन, कार लोन किंवा पर्सनल लोनच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.
आरबीआयने आर्थिक वर्ष 2027साठी पूर्ण वर्षाचा GDP वाढीचा अंदाज दिलेला नाही. नवीन GDP सिरीज आल्यानंतर एप्रिलमधील धोरण बैठकीत हा अंदाज जाहीर केला जाईल, असं RBI गव्हर्नर यांनी सांगितलं. मात्र पुढील तिमाहीसाठीचा अंदाज वाढवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत GDP वाढ सुमारे 6.9 टक्के, तर दुसऱ्या तिमाहीत 7.0 टक्के राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.