पुढारी ऑनलाईन डेस्क : RBI MPC Meeting 2025 | repo rate | भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा (RBI Governor Sanjay Malhotra) यांनी आज बुधवारी (दि.९) पतविषयक धोरण समितीचा (MPC) चा निर्णय जाहीर केला. आरबीआयने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. यामुळे आता आरबीआयने रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आरबीआय पतधोरण समितीने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून तो ६ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. हा दर तात्काळ लागू होईल, असे संजय मल्होत्रा यांनी सांगितले.
या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरु झाली होती. त्यानंतर आज रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.
याआधी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत, आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची कपात केली होती. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्राच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही पहिलीच दर कपात होती. तसेच जवळपास पाच वर्षांतील पहिलीच कपात होती. आता दुसऱ्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात केली.
आरबीआयच्या सहा सदस्यांच्या समितीने धोरणात्मक भूमिका आता तटस्थ ऐवजी अनुकूल करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मल्होत्रा म्हणाले.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, आरबीआयच्या समितीने १ एप्रिलपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी दराचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. "या नवीन आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज २० बेसिस पॉइंट्सने कमी करण्यात आला आहे. जो जागतिक व्यापार आणि धोरणातील अनिश्चितता दर्शवितो," असे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दराचा निर्णय जाहीर करताना सांगितले.
रेपो दर म्हणजे व्याजदर असून ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज पुरवठा करते. कमी रेपो दरामुळे कर्जदारांना, विशेषतः घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळते. तसेच त्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होतो. आरबीआयने रेपो दरात कपात केल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेपो दर कमी झाल्याने बँका स्वस्त दराने कर्ज घेऊ शकतात. जर बँकांनी याचा लाभ ग्राहकांना दिला तर गृहकर्ज स्वस्त होईल.