Price Change August 1: 1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि नवीन कारपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती वाढणार असल्याने घरगुती बजेटवर परिणाम होणार आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, FMCG (Fast Moving Consumer Goods) क्षेत्रातील अनेक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. चहा, केसांचे तेल, साबण, टूथपेस्ट आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्ती 6 ते 8 टक्क्यांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे.
घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही महागाईचा परिणाम दिसून येणार आहे. फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही यांसारख्या उपकरणांच्या किमती 4 ते 6 टक्क्यांनी वाढू शकतात. तसेच मेमरी चिपच्या वाढलेल्या किमतीमुळे स्मार्टफोनही महाग होण्याची शक्यता आहे.
वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांनाही अतिरिक्त खर्चाला सामोरे जावे लागू शकते. उत्पादन खर्च वाढल्यामुळे अनेक वाहन कंपन्या दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. मारुती सुझुकीने ऑगस्टपासून काही मॉडेल्सच्या किमती 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. याशिवाय होंडा कार्स आणि मर्सिडीज-बेंझसारख्या कंपन्याही दरवाढ करण्याची तयारी करत आहेत.
या दरवाढीमागे जागतिक कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कच्चे तेल, पाम ऑईल आणि पॅकेजिंग साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर (Supply Chain) परिणाम झाला आहे.
समुद्री मालवाहतुकीचा खर्च वाढणे, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार आणि आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम आता ग्राहकांवर होणार आहे.
कंपन्या एकाच वेळी मोठी दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला मोठ्या आणि प्रीमियम उत्पादनांच्या किमती वाढतील, त्यानंतर लहान पॅकच्या वस्तूंच्या दरात वाढ होऊ शकते.
काही कंपन्यांचे म्हणणे आहे की, जून तिमाहीत त्यांनी वाढलेल्या खर्चाचा काही भाग स्वतः उचलला होता. उर्वरित भार भरून काढण्यासाठी सप्टेंबर तिमाहीतही 2 ते 5 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त दरवाढ होण्याची शक्यता आहे. रेडीमेड कपड्यांच्या किमतीतही वाढ होऊ शकते.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, दैनंदिन वापराच्या वस्तू महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्चावर आणि देशाच्या आर्थिक वाढीवर होऊ शकतो. महागाई वाढल्यास सर्वसामान्यांचे मासिक बजेट बिघडणार आहे.
सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना दैनंदिन गरजेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे आणि वाहनांच्या वाढत्या किमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर खर्चाचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढती महागाई यामध्ये समतोल राखणे अनेक कुटुंबांसाठी कठीण होऊ शकतं.