Pocket FM Pocket TV Pudhari
अर्थभान

Pocket TV: Pocket TV खरंच बंद पडलं का? अखेर Pocket FM चे CEO रोहन नायक यांनी सांगितलं सत्य

Pocket FM Pocket TV: Pocket TV हा बीटा प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला होता. सुमारे पाच महिन्यांच्या चाचणीनंतर आवश्यक अनुभव मिळाल्याने तो बंद करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Pocket FM Pocket TV: गेल्या काही दिवसांपासून Pocket FM ने Pocket TV बंद केल्याची बातमी विविध माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर झळकत होती. "Pocket FM shuts down Pocket TV" अशा मथळ्यांमुळे कंपनीचा नवा प्रोजेक्ट बंद पडल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र, या चर्चेनंतर Pocket FM चे सह-संस्थापक आणि CEO रोहन नायक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहन नायक यांच्या मते, Pocket TV हा पूर्ण विकसित झालेला व्यवसाय नव्हता, तर एक 'बीटा प्रॉडक्ट' होता. कंपनीने सुमारे पाच महिने या प्लॅटफॉर्मची चाचणी घेतली, युजर्सच्या सवयी समजून घेतल्या आणि अपेक्षित माहिती मिळाल्यानंतर हा प्रयोग बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याला अपयश म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मायक्रो ड्रामा मॉडेलमध्ये सर्वात मोठी अडचण कोणती?

Pocket TV च्या प्रयोगातून कंपनीला सर्वात मोठा धडा मिळाला तो म्हणजे युजर्सना अॅप डाउनलोड करायला लावणे कठीण नाही, पण त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणे हेच खरे आव्हान आहे.

रोहन नायक यांनी सांगितले की, सध्याच्या मायक्रो ड्रामा प्लॅटफॉर्म्समध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती करून नवीन ग्राहक मिळवले जातात. मात्र, अनेक कंपन्या युजर्सना टिकवून ठेवण्यासाठी ऑटो-रिन्युअल, सबस्क्रिप्शन आणि इतर 'डार्क पॅटर्न्स' वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्यांच्या मते,कंपन्या ग्राहकाला सबस्क्रिप्शन बंद करण्याचा पर्याय देत नसतील, तर ते खरं प्रॉडक्ट नसून केवळ मार्केटिंगवर आधारित व्यवसाय आहे.

युजर्सच्या समाधानावर भर

Pocket FM ने सुरुवातीपासूनच युजर्सच्या समाधानावर भर दिला असल्याचे रोहन नायक यांनी नमूद केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, Pocket FM चे 50 टक्क्यांहून अधिक युजर्स 12 महिन्यांनंतरही प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत.

विशेष म्हणजे, मायक्रो ड्रामा क्षेत्रातील अनेक कंपन्यांपेक्षा Pocket FM चा Daily Active Users (DAU) अधिक आहे, आणि हे कंपनीने मोठ्या जाहिरात खर्चाशिवाय साध्य केले आहे. त्यांनी यावर भर देताना म्हटले की, Pocket TV अपयशी नव्हता, तर यशस्वी प्रयोग होता.

Pocket TV बंद करण्याचा निर्णय हा अपयशामुळे नव्हे, तर बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर घेतलेला नियोजित निर्णय असल्याचे रोहन नायक यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रयोगातून कंपनीला मायक्रो ड्रामा क्षेत्रात काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजल्या असून, त्याच अनुभवाच्या आधारावर कंपनीने या क्षेत्रासाठी एक नवीन आणि अधिक प्रभावी मॉडेल विकसित केले आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले.

सोशल मीडिया पोस्टच्या शेवटी रोहन नायक यांनी मिश्किल शैलीत माध्यमांचे आभार मानत लिहिले, "मोफत प्रसिद्धीसाठी धन्यवाद. पुढच्या वेळी एखादा बीटा प्रॉडक्ट बंद केला तर त्यासाठी प्रेस कॉन्फरन्सच आयोजित करू."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT