PM Modi Appeal Pudhari
अर्थभान

PM Modi Appeal: देश आर्थिक संकटात? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय काय सांगितलं? A to Z माहिती जाणून घ्या

PM Modi Global Crisis Appeal: जागतिक आर्थिक संकट आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले.

Rahul Shelke

PM Modi Global Crisis Appeal: जागतिक आर्थिक संकट, वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. हैदराबादमधील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सध्याच्या कठीण परिस्थितीत केवळ सरकारच्या धोरणांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने देशहितासाठी जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

मोदी म्हणाले की, देशभक्ती म्हणजे फक्त सीमारेषेवर लढणं नाही. संकटाच्या काळात देशाच्या संसाधनांची बचत करणं, अनावश्यक खर्च टाळणं आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणं हेदेखील देशभक्तीचंच रूप आहे.

इंधन बचतीवर भर

भारताचा मोठा खर्च पेट्रोलियम आयातीवर होतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करण्याचं आवाहन मोदींनी केलं. शक्य असेल तिथे मेट्रो, बस किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असं त्यांनी सांगितलं. खासगी वाहन वापरताना कार-पूलिंगचा पर्याय स्वीकारण्याचाही सल्ला दिला.

मालवाहतुकीसाठी रस्ते मार्गाऐवजी रेल्वेला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावरही मोदींनी भर दिला. यामुळे इंधनावरील आयात अवलंबित्व कमी होईल आणि प्रदूषणही घटेल, असं ते म्हणाले.

‘एक वर्ष सोने खरेदी टाळा’

पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना किमान एक वर्षभर अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं. भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो आणि त्यासाठी मोठं परकीय चलन खर्च होतं. जागतिक संकटाच्या काळात देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

परदेश दौरे आणि डेस्टिनेशन वेडिंगवर संयम

मोदींनी परदेश प्रवासावरही मर्यादा आणण्याचं आवाहन केलं. विशेषतः विदेशात होणाऱ्या ‘डेस्टिनेशन वेडिंग’ टाळण्याचा सल्ला देत त्यांनी ‘वेड इन इंडिया’ आणि देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं.

वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन बैठकींना प्रोत्साहन

कोविड काळात सुरू झालेल्या चांगल्या सवयी कायम ठेवण्यावरही मोदींनी भर दिला. शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्स आणि व्हर्च्युअल मीटिंग्ज सुरू ठेवाव्यात, असं त्यांनी सांगितलं. यामुळे वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होऊ शकते.

‘मेड इन इंडिया’ वस्तूंना प्राधान्य द्या

दैनंदिन वापरातील वस्तू, जसे की बूट, बॅग आणि इतर वस्तूंमध्ये स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावं, असं मोदींनी आवाहन केलं. यामुळे देशांतर्गत उद्योगांना चालना मिळेल आणि आयात कमी होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

खाद्यतेल वापराबाबतही सल्ला

मोदींनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचाही सल्ला दिला. यामुळे एका बाजूला आयात खर्च कमी होईल, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या आरोग्यालाही फायदा होईल, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी खास संदेश

शेतकऱ्यांनाही मोदींनी महत्त्वाचं आवाहन केलं. रासायनिक खतांचा वापर 50 टक्क्यांपर्यंत कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, डिझेल पंपांच्या जागी सौरऊर्जेवर चालणारे पंप वापरण्याचं आवाहन केलं. पीएम-कुसुम योजनेचा लाभ घेऊन खर्च कमी करता येईल आणि पर्यावरणाचंही संरक्षण होईल, असं त्यांनी सांगितलं.

काय आहे मोदींच्या आवाहनाचा अर्थ?

मोदींचं हे भाषण केवळ सल्ला नाही, तर जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारत मजबूत ठेवण्यासाठी दिलेला इशारा मानला जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने संसाधनांची बचत केली, स्वदेशी वस्तू वापरल्या आणि अनावश्यक आयात टाळली, तर भारत आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होऊ शकतो. आता या आवाहनाला देशवासीयांचा किती प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT