PM Kisan 23rd Installment Pudhari
अर्थभान

PM Kisan 23rd Installment: PM किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याची तारीख ठरली; शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार कधी येणार?

PM Kisan 23rd Installment: PM किसान सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

PM Kisan 23rd Installment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार असून, 20 जून 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या हप्त्याचा लाभ देशभरातील सुमारे 9 ते 10 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. त्यातील 23 वा हप्ता आता थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

पश्चिम बंगालमधून होणार हप्त्याचे वितरण

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 20 जून रोजी पश्चिम बंगालमधील तारकेश्वर (हुगळी) येथून या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे.

हप्ता मिळण्यासाठी या अटी पूर्ण असणे आवश्यक

PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्ता अडकू शकतो.

यासाठी खालील बाबी पूर्ण असणे गरजेचे आहे:

  • e-KYC पूर्ण असणे आवश्यक

  • आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक

  • जमिनीच्या नोंदींची (Land Records) पडताळणी पूर्ण असणे आवश्यक

  • लाभार्थी यादीत (Beneficiary List) नाव असणे आवश्यक

घरबसल्या असे तपासा स्टेटस

तुमच्या खात्यात 20 जून रोजी पैसे जमा होणार आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी PM किसान पोर्टलवर स्टेटस तपासता येईल.

त्यासाठी:

  1. PM किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  2. ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.

  3. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाका.

  4. स्क्रीनवरील कॅप्चा कोड भरा.

  5. ‘Get Data’ वर क्लिक करा.

यानंतर तुमच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही किंवा आधार-बँक लिंकिंग बाकी आहे, त्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच लाभार्थी यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. अन्यथा 20 जून रोजी मिळणारा 2 हजार रुपयांचा हप्ता अडकू शकतो.

केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मदत होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे. 20 जूनकडे आता देशातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT