Petrol Diesel Price Hike: सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी एक महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झालेली वाढ येत्या काळात आणखी वाढू शकते, असा अंदाज रेटिंग एजन्सी क्रिसिलने व्यक्त केला आहे. याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होणार असून अन्नधान्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात.
क्रिसिलच्या अहवालानुसार, 15 मेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 7.5 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती उच्च पातळीवर कायम राहिल्यास ही वाढ 10 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
इंधन दरवाढीचा सर्वात मोठा परिणाम महागाईवर होतो. कारण देशातील बहुतांश मालवाहतूक रस्ते मार्गाने केली जाते. भारतातील जवळपास 71 टक्के मालवाहतूक ट्रक आणि इतर वाहनांद्वारे होते. त्यामुळे डिझेल महाग झाल्यास वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम थेट वस्तूंच्या किंमतींवर दिसून येतो.
क्रिसिलच्या अंदाजानुसार, इंधनाच्या दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्यास किरकोळ महागाई दरात सुमारे 0.36 टक्क्यांची वाढ होऊ शकते. जर दरवाढ 10 रुपयांपर्यंत पोहोचली, तर महागाईत जवळपास 0.48 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
वाहतूक खर्च वाढल्यामुळे दूध, फळे, भाज्या, डाळी, चहा, कॉफी, मसाले, अंडी, मांस आणि मासे यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू महाग होऊ शकतात. या वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाहतूक नेटवर्कवर अवलंबून असतो.
याशिवाय कपडे, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, लाकडी उत्पादने, सिमेंट, सिरेमिक आणि बांधकाम क्षेत्रातील उत्पादनांच्या किंमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
रसायन, कोळसा आणि धातू उद्योगांवरही इंधन दरवाढीचा परिणाम होऊ शकतो. उत्पादन खर्च वाढल्यास कंपन्या हा अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकू शकतात. काही कंपन्या उत्पादनाचे प्रमाण कमी करूनही खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात.
अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाची सरासरी किंमत 112 डॉलर प्रति बॅरल राहिली आहे. ही किंमत संपूर्ण वर्षासाठी गृहीत धरलेल्या 95 डॉलर प्रति बॅरल या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे.
सध्या देशातील एकूण महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 4 टक्के लक्ष्याच्या खाली आहे. मात्र आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय कमकुवत मान्सून, एल निनोचा प्रभाव आणि कृषी उत्पादनातील घट यामुळे अन्नधान्य महागाई वाढू शकते. त्यामुळे रिझर्व्ह बँकही महागाईच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यास त्याचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही. वाहतूक, उत्पादन आणि वितरण खर्च वाढल्यामुळे जवळपास प्रत्येक वस्तूच्या किंमतीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे येत्या काही महिन्यांत महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता असून सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम दिसू शकतो.