पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभाग नोव्हेंबर 2025 मध्ये देशभरात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन 4.0 सुरू करणार आहे. यामध्ये फेस ऑथेंटिकेशन आणि घरपोच सेवा यांचा समावेश असेल.
कमलेश गिरी
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन 4.0 या मोहिमेत देशातील 1,600 जिल्हे आणि सब डिव्हिजनमध्ये पेन्शनधारकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग पेन्शनर्ससाठी घरपोच सेवा दिली जाणार आहे. या उपक्रमात बँका आणि इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक सहयोग करतील.
या मोहिमेमध्ये 80 वर्षांहून जास्त वय असलेल्या पेन्शनर्ससाठी खास सोय केली आहे. ते ऑक्टोबर 2025 पासून आपले लाईफ सर्टिफिकेट डिजिटल माध्यमातून जमा करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभागाच्या ऑफिस मेमोरँडमनुसार, बँकांना 1 ऑक्टोबर 2025 पासून सुपर सीनियर पेन्शनर्ससाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुविधा सुरू करावी लागेल.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी पेन्शनर्सना फक्तस्मार्टफोन आवश्यक आहे. प्रथम, आधार फेस आरडी अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे. नंतर ‘जीवन प्रमाण अॅप’ डाऊनलोड करावे. या अॅपमध्ये ओपन केल्यावर ‘ऑपरेटर ऑथेंटिकेशन’ स्क्रीनवर आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ई-मेल पत्ता भरावा, सबमिट बटण दाबावे आणि ओटीपी नोंदवून प्रमाणीकरण पूर्ण करावे.
ओटीपी नंतर फेस स्कॅनसाठी स्क्रीन खुले होईल. फेस स्कॅन पूर्ण केल्यावर पेन्शनरची माहिती भरावी लागेल, ज्यात आधारनुसार पूर्ण नाव, पेन्शन प्रकार, प्राधिकरण, एजन्सीचे नाव, पीपीओ नंबर आणि पेन्शन अकाऊंट नंबर यांचा समावेश असेल. सर्व घोषणांवर क्लिक करून सबमिट केल्यावर अंतिम फेस स्कॅन होईल. यानंतर डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे तपशील स्क्रीनवर दिसतील, ज्यामध्ये आयडी आणि पीपीओ नंबर असेल.
ही सुविधा विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग पेन्शनर्ससाठी वरदान ठरेल. कारण, त्यांना आता घरबसल्या सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने लाईफ सर्टिफिकेट जमा करता येईल. त्यामुळे पेन्शनच्या प्रक्रियेत विलंब किंवा गैरसोय होण्याची शक्यता कमी होईल.
सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी जीवन प्रमाणाच्या वेबसाईटवर लॉगिन करावे आणि आयडी टाकून डाऊनलोड करावे. लक्षात ठेवा की, ऑपरेटर ऑथेंटिकेशन फक्तएकदाच करावा लागतो. पेन्शनर स्वतः ऑपरेटर होऊ शकतो आणि एक ऑपरेटर अनेक पेन्शनर्सचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करू शकतो.