Palm Oil Crisis in India: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता थेट भारतीयांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणमधील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझवरील तणावामुळे भारत आधीच कच्च्या तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. आता त्यात आणखी एक मोठी समस्या वाढताना दिसत आहे ती म्हणजे पाम ऑइलचा तुटवडा.
भारत हा जगातील सर्वात मोठा पाम ऑइल आयात करणारा देश आहे. देशात दरवर्षी जवळपास 9.5 दशलक्ष टन पाम ऑइलचा वापर केला जातो. मात्र देशांतर्गत उत्पादन अत्यंत कमी आहे. भारत आपल्या गरजेपैकी 90 टक्क्यांहून अधिक पाम ऑइल परदेशातून आयात करतो.
पाम ऑइल मुख्यतः इंडोनेशिया आणि मलेशिया येथून भारतात येते. मात्र आता इंडोनेशियाने मोठा निर्णय घेतला आहे. हा देश आता निर्यातीपेक्षा देशांतर्गत वापरासाठी पाम ऑइलचा वापर वाढवत आहे. विशेषतः बायोडिझेल निर्मितीसाठी पाम ऑइल वापरण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात पाम ऑइलचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील दैनंदिन वापराच्या वस्तूंवर होऊ शकतो. कारण पाम ऑइलचा वापर फक्त स्वयंपाकासाठीच होत नाही, तर अनेक FMCG उत्पादनांमध्येही तो मोठ्या प्रमाणावर केला जातो.
साबण, शॅम्पू आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये फेस तयार करण्यासाठी पाम ऑइलचा वापर केला जातो. त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स सारख्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या खर्चात वाढ होऊ शकते.
तसेच लिपस्टिक, क्रीम, लोशन यांसारख्या कॉस्मेटिक उत्पादनांमध्येही पाम ऑइल महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
याशिवाय बिस्किटे, चिप्स आणि इतर तळलेल्या किंवा बेकरी उत्पादनांमध्येही पाम ऑइल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे पार्ले प्रॉडक्ट्स आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, पाम ऑइलच्या किमती वाढल्यास अनेक वस्तू 5 ते 10 टक्क्यांनी महाग होऊ शकतात. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी हा आणखी एक आर्थिक धक्का ठरू शकतो.
जागतिक तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि वाढती मागणी यामुळे आगामी काळात खाद्यतेल आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.