पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील. या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी (शनिवार) रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) नियमित वेळेनुसार लाईव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित करणार आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदारांकडून वेळेवर प्रतिसाद मिळणे, हा यामागील उद्देश आहे.
"केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल," असे एक्सचेंजेसने जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे. "सदस्यांना विनंती आहे की, सेटलमेंटच्या सुट्टीमुळे १ फेब्रुवारी २०२५ रोजी 'T0' सत्र ट्रेडिंगसाठी शेड्यूल केले जाणार नाही," असे NSE ने नमूद केले आहे.
इक्विटी मार्केटमध्ये दुपारी ३:३० वाजेपर्यंत नियमित ट्रेडिंग सत्र असणार आहे. तर कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्र असेल.
याआधीदेखील अशा हाय- इम्पॅक्ट इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार खुला ठेवण्यात आला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२० आणि २०१५ (शनिवार, १ फेब्रुवारी २०२० आणि शनिवार, २८ फेब्रुवारी २०१५) मधील अर्थसंकल्पीय सादरीकरणाच्या दिवशीदेखील ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते.
अर्थसंकल्पाचा दिवस हा शेअर बाजारासाठीदेखील महत्त्वाचा मानला जातो. कारण केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारची आर्थिक धोरणे, कर आकारणी आणि क्षेत्रनिहाय निधीच्या वाटपाची रूपरेषा जाहीर केली जाते. याचा उद्योग आणि गुंतवणूकदारांच्या भावनांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचे हे सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादरीकरण असेल. अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमने अर्थसंकल्प २०२५ ची तयारी सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्व क्षेत्रांना अपेक्षा आहेत.