* गतसप्ताहात निफ्टीमध्ये एकूण 424.50 अंकांची वाढ नोंदवली गेली असून निर्देशांक 25,709.8 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये 1.68 टक्क्यांची वाढ झाली. तसेच सेन्सेक्समध्ये एकूण 1,451.37 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 83,952.2 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 1.76 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टीने 24781.5 अंकाचे नवीन शिखर गाठले, तर बँक निफ्टीनेही 57,713 अंकांचा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. मजबूत कॉर्पोरेट निकाल आणि आर्थिक स्थैर्य तसेच डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे विश्लेषकांनी सांगितले. सप्ताहात बाजारात सर्वाधिक वाढ झालेल्या समभागांमध्ये नेस्ले इंडिया (7.5 टक्के), एशियन पेंटस् (7.2 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (5.6 टक्के), अदानी पोर्टस् (5.0 टक्के) आणि बजाज फायनान्स (4.5 टक्के) या समभागांचा समावेश झाला, तर सर्वाधिक घसरण झालेल्या समभागांमध्ये इन्फोसिस (-4.9 टक्के), विप्रो (-3.1 टक्के), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (-2.2 टक्के) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (-1.9 टक्के) या समभागांचा समावेश झाला.
* रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील कमजोरीमुळे कंपनीचा दुसर्या तिमाहीतील निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिला. तरीही कंपनीचा निव्वळ नफा 10 टक्क्यांनी वाढून रु. 18,165 कोटी झाला आहे. महसुलात 10 टक्क्यांची वाढ होऊन तो रु. 2.59 लाख कोटींवर पोहोचला; परंतु तिमाहीत नफ्यात 33 टक्क्यांची घसरण झाली. रिलायन्स रिटेलचा नफा 22 टक्क्यांनी वाढून रु. 3,457 कोटींवर, तर जिओ प्लॅटफॉर्म्सचा नफा 3.78 टक्क्यांनी वाढला.
* टाटा समूह आणि शापूरजी पल्लोनजी (एसपी) समूह यांच्यातील भागभांडवल विभाजनासाठी शेअर-स्वॅप (share-swap) पर्यायावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावानुसार एसपी समूह आपला टाटा सन्समधील 18.4 टक्के हिस्सा टप्प्याटप्प्याने विक्री करून त्याच्या बदल्यात टाटा समूहातील सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स स्वीकारू शकतो. या अंतर्गत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, ट्रेंट, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर, व्होल्टास, टायटन कंपनी आणि टाटा कम्युनिकेशन यांसारख्या कंपन्यांच्या समभागांचा विचार केला जात आहे. सदर चर्चा प्रारंभिक टप्प्यात असून, यामुळे दोन्ही गटांमधील दीर्घकालीन भागभांडवल वाद सोडवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* जे एस डब्लू स्टीलचा दुसर्या तिमाहीतील नफा चारपट वाढला असून तो रु. 1,646 कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या रु. 404 कोटींपेक्षा तब्बल 307 टक्के वाढ दर्शवतो. कंपनीचा महसूल 14 टक्क्यांनी वाढून रु. 45,152 कोटींवर गेला आहे. कंपनीचा ईबीआयटीडीए (EBITDA) 31 टक्क्यांनी वाढून रु. 7,115 कोटींवर पोहोचला असून, नफा मार्जिन 3.6 टक्क्यांवरून 17.4 टक्क्यांवर वाढला आहे. या वाढीचे प्रमुख कारण म्हणजे खनिज प्रीमियम आणि रॉयल्टी शुल्कात घट, तसेच लोखंडाच्या किमती कमी होणे हे आहे. एकूण उत्पादनात 17 टक्क्यांची वाढ झाली असून निर्यातीत 89 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी रु. 20,000 कोटींचे भांडवली खर्चाचे लक्ष्य कायम ठेवले आहे.
* दक्षिण कोरियाची वाहन निर्मिती कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने भारतातील आपली सर्वात मोठी गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. कंपनी रु. 45,000 कोटींची गुंतवणूक करून भारतातील विस्तार आणि उत्पादन क्षमतेत मोठी वाढ करणार आहे. या अंतर्गत कंपनी 2030 पर्यंत भारतातील आपला बाजार हिस्सा 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवत आहे. ह्युंदाईकडून 26 नवीन मॉडेल्स सादर केली जाणार असून त्यात 7 नवीन नावीन्यपूर्ण वाहनांचे लवकरच लोकार्पण केले जाईल. तसेच 2027 पर्यंत भारतातच तयार होणारी पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात आणली जाणार आहे. कंपनी लक्झरी ब्रँड ‘जेनेसिस’ देखील भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे. ह्युंदाई मोटर इंडिया प्रमुख तरुण गर्ग यांनी सांगितले की, भारतीय बाजार आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, उच्च श्रेणीतील एसयूव्ही विभागात आमची उपस्थिती आणखी मजबूत करणार आहोत.
* आंध्र प्रदेश सरकारने गुगलच्या रायडेन इन्फोटेक इंडिया या सहाय्यक कंपनीला रु. 22,000 कोटींचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. गुगल या गुंतवणुकीद्वारे विशाखापट्टणम आणि अनाकपल्ली जिल्ह्यांमध्ये 1,000 मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर्स उभारणार आहे. या प्रकल्पात एकूण रु. 87,500 कोटींची गुंतवणूक होणार असून यात अदानी समूहाच्या सहकार्याने एआय इन्फ्रास्ट्रक्चर पार्क उभारला जाईल. राज्य सरकारने प्रोत्साहन म्हणून 25 टक्के जमीन सवलत, 100 टक्के स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क माफी, तसेच 10 टक्के भांडवली अनुदान (कॅपिटल सबसिडी) जाहीर केले आहे. याशिवाय बांधकामावर लागू असलेला एसजीएसटीचा रु. 2,245 कोटींचा परतावा देखील दिला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून, आंध्र प्रदेश जागतिक डेटा सेंटर हब बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकणार आहे.
* एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचा दुसर्या तिमाहीतील निव्वळ नफा 3 टक्क्यांनी वाढून रु. 447 कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा एकूण प्रीमियम उत्पन्न 14 टक्क्यांनी वाढून रु. 19,287 कोटींवर गेला आहे. नवीन व्यवसाय प्रीमियम 11 टक्क्यांनी वाढून रु. 8,950 कोटींवर, तर नूतनीकरण प्रीमियम 17 टक्क्यांनी वाढून रु. 10,337 कोटींवर पोहोचला. ग्राहक टिकवण्याचे (Retention) प्रमाण सुधारल्याने व्यवसायात वाढ झाली असली, तरी व्यवस्थापन खर्चात 16 टक्क्यांची वाढ झाल्याने नफ्यावर काही प्रमाणात दबाव राहिला. कंपनीचा वार्षिक प्रीमियम समकक्ष (APE) 8 टक्क्यांनी वाढून रु. 6,949 कोटी झाला आहे. एचडीएफसी लाईफने रु. 750 कोटींचे सबऑर्डिनेटेड डेट (कर्ज) उभारण्याची योजना जाहीर केली आहे. कंपनीचे सॉल्व्हन्सी रेशो 175 टक्क्यांवर स्थिर आहे, जे नियामकांच्या 150 टक्क्यांच्या किमान मर्यादेपेक्षा जास्त आहे.
* सप्टेंबर महिन्यात देशातील किरकोळ महागाईचा दर घसरून 1.54 टक्क्यांवर आला असून, हा मागील आठ वर्षांतील सर्वात नीचांक आहे. भाज्या, डाळी, धान्य आणि इंधन यांच्या किमतीत घट झाल्याने महागाईत ही मोठी कमी झाली आहे. अन्नमहागाई सलग चौथ्या महिन्यात निगेटिव्ह झोनमध्ये राहिली असून ती (-2.28 टक्के) नोंदवली गेली. महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या 2 टक्क्यांच्या सहनशील मर्यादेपेक्षा खाली गेल्यामुळे डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. तथापि, खाद्यतेलांच्या किमती उच्च पातळीवर असून, रिफाईंड तेलात 20.2 टक्के आणि मोहरी तेलात 20.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी महागाईमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढून खपात वाढ होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात देशातील घाऊक महागाई दरदेखील घटून 0.13 टक्क्यांवर आला असून, ऑगस्टमधील 0.52 टक्क्यांच्या तुलनेत ही घट नोंदवली गेली.
* चालू वर्षात आयपीओंमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा (रिटेल इन्व्हेस्टर) सहभाग कमी झाला आहे. 2025 मध्ये झालेल्या 80 आयपीओंमध्ये सरासरी सबस्क्रिप्शन 26.99 पट राहिले असून, ते 2024 मधील 33.71 पट च्या तुलनेत घटले आहे. लिस्टिंग गेनदेखील कमी होऊन सरासरी 8.4 टक्के इतके राहिले आहेत, जे मागील वर्षी 28.9 टक्के होते. एकूण इश्यू साईज रु. 1,20,668 कोटींवर पोहोचला आहे.
* भारताचा परकीय चलनसाठा 10 ऑक्टोबर 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात 2.18 अब्ज डॉलर्सने घटून 697.78 अब्ज डॉलर्सवर आला आहे. मागील आठवड्यात हा साठा 699.96 अब्ज डॉलर्स इतका होता. ही घट प्रामुख्याने परकीय चलन मालमत्तांमध्ये 5.61 अब्ज डॉलर्सची घसरण झाली असून, सोन्याच्या साठ्यात मात्र 3.6 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवली गेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थिर चलनस्थिती राखण्यासाठी परकीय चलन बाजारावर लक्ष ठेवले असून, आवश्यक त्या ठिकाणी हस्तक्षेप केले आहेत.