अर्थभान

अर्थवार्ता : व्याजदर कमी होण्याचे संकेत न मिळाल्याने निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये घसरण

अमृता चौगुले

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 88.07 अंक व 398.60 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 19428.3 अंक व 65322.65 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.45 टक्के तर सेन्सेक्समध्ये 0.61 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सप्ताहादरम्यान निफ्टीने 19645.5 अंक तर सेन्सेक्सने 66067.9 अंकांच्या पातळीला स्पर्श केला परंतु जागतिक भांडवलबाजारांमधील प्रतिकुल परिस्थिती तसेच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये व्याजदर कमी होण्याचे कोणतेही संकेत न मिळाल्याने निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

गतसप्ताहात रिझर्व्ह बँकेची व्दैमासिक पतधोरण आढावा बैठक झाली. पतधोरण समितीने बहुमताने देशातील रेपोरेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचे ठरवले. आर्थिक वर्ष 2024 मध्ये किरकोळ महागाई दर (रिटेल इन्फ्लेशन) अंदाज 5.1 टक्क्यांवरून

5.4 टक्क्यांपर्यंत नेण्यात आला. बाजारातील अधिकची तरलता कमी करून देशातील महागाईदर नियंत्रणात ठेवून 4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे. याचाच अर्थ नजीकच्या काळात कर्जाचे व्याजदर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून कदाचित पुन्हा काही प्रमाणात कर्जाचा हफ्ता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जून महिन्यात भारताचा औद्योगिक उत्पादनवाढ निर्देशांक 3.7 टक्के झाला. मे महिन्यात हा निर्देशांक 5.2 टक्के होता. जून महिन्यात या निर्देशांकाने मागील तीन महिन्यांचा निचांक गाठला.

नॅशनल लॉ ट्रिब्युनल (दिवाळखोरी संबंधी प्रकरणे हाताळणारे न्यायाधिकरण) ने झी एन्टरप्राईझेस् आणि कल्व्हर मॅक्स एन्टरटेन्मेंट (सोनी पिक्चर्स) यांच्या एकत्रीकरणास मंजूरी दिली. यापूर्वी बाजारवियामक 'सेबी' देशातील सर्व 'भांडवलबाजार' (स्टॉक एक्स्चेंज), भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) यांची या व्यवहारास मान्यता मिळाली आहे. एकत्रिकरणपश्चात या कंपनीचे मूल्य र्(ींरर्श्रीरींळेप) सुमारे 10 अब्ज डॉलर्स (सुमारे 82 हजार कोटी) असेल. जवळपास 70 टीव्ही वाहिन्यांसह बाजारपेठेचा एकूण 26 टक्के हिस्सा कंपनीकडे असेल.

देशातील सर्वात मोठी सरकारी जीवनविमा कंपनी 'एलआयसी'चा नफा तिमाहीत 14 पट वधारून 9543.71 कोटी झाला आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत हा नफा 682.89 कोटी होता प्रीमियमद्वारे मिळणारे उत्पन्न 98362.89 कोटींवर स्थिर राहिले.

पिरॅमिड टेक्नोप्लास्ट लिमिटेड, पॉलिमर आधारित मोल्डेड उत्पादनांच्या निर्मितीसाठी ओळखली जाणारी एक औद्योगिक पॅकेजिंग कंपनी आहे. पब्लिक इश्यूच्या माध्यमातून 153.05 कोटी रुपये उभारण्याचा तिचा संकल्प आहे. कंपनीचा पब्लिक इश्यू 18 ऑगस्ट रोजी खुला होईल आणि 22 ऑगस्ट 2023 रोजी बंद होईल. पब्लिक इश्यूसाठी कंपनीचा प्रति इक्विटी शेअर प्राइस बँड रु. 151-166 निश्चित केला आहे.

आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी 'ग्रासीम'चा नफा 6.61 टक्के घटून 2576.35 कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूल 28041.54 कोटींवरून 10.78 टक्के वधारून 31065.19 कोटी झाला.

अ‍ॅक्सिस बँक 'मॅक्स लाईफ' या जीवनविमा कंपनीमधील आपला हिस्सा 9.99 टक्क्यांवरून 16.22 टक्क्यांवर नेणार. यासाठी एकूण 1612 कोटींची गुंतवणूक केली जाणार. प्राधान्य समभागांद्वारे (प्रेफरन्शिअलशेअर्स) च्या माध्यमातून हा व्यवहार होणार. यापूर्वी अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज व अ‍ॅक्सिस कॅपीटल या उपकंपन्यांमार्फत 2021 मध्ये अ‍ॅक्सिस बँकेकडे 'मॅक्स लाईफ'चा 19.02 टक्के हिस्सा तयार होईल. 14 कोटी समभागांचे हस्तांतरण या व्यवहारात होईल. 113.06 रुपये प्रतिसमभाग दरावर हा व्यवहार पूर्ण केला जाईल. सध्या मॅक्स लाईफ कंपनीमध्ये मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेस या प्रमुख कंपनीचा 87 टक्के हिस्सा आहे. व्यवहारापश्चात हा हिस्सा 80.98 टक्क्यांपर्यंत खाली येईल.

एसआयपीद्वारे दरमहा म्युच्युअल फंडांमध्ये 15 हजार कोटींची गुंतवणूक जुलै महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून एकूण 15245 कोटींची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. यापैकी इक्विटी या प्रकारात एकूण 7626 कोटींची गुंतवूणक झाली. यापैकी लार्ज कॅप प्रकारात 1880 कोटी तर स्मॉलकॅप प्रकारात 4171 कोटींची गुंतवणूक झाली. एकूण एसआयपी द्वारे झालेले व्यवस्थापन अंतर्गत भांडवल बाजारमूल्य (एयूएम) तब्बल 8 लाख 32 हजार कोटींवर पोहोचले. दहा वर्षांपूर्वी एसआयपीच्या माध्यमातून केवळ
1500 कोटींची दरमहा बाजारात गुंतवणूक होत होती. दहा वर्षांत हा आकडा सुमारे दहा पटींनी अधिक वाढल्याचे दिसून येते.

मारुती सुझुकी इंडिया ही भारतीय कंपनी आपली प्रमुख कंपनी 'सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशन'ला समभाग (शेअर्स) विकणार. सध्या हा व्यवहार गुजरात प्रकल्पापुरता मर्यादित असून सुझुकी मोटर्सचा मारुती सुझुकी कंपनीमधील हिस्सा 56.48 टक्क्यांवरून 58.28 टक्के होणार कंपनीचा गुजरातमधील प्रकल्प दरवर्षी 7.5 लाख वाहने तयार करतो. 2014 पासून सुझुकी मोटर्सने या प्रकल्पात एकूण 18 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.

देशातील प्रमुख दुचाकी वाहन उत्पादक कंपनी 'हिरोमोटोकॉर्पचा' नफा 32 टक्के वधारून 876 कोटी झाला. मागील सप्ताहात हिरो मोटोकॉर्पचे प्रमुख पवन मुजाल यांच्यावर 'ईडी'ने धाड टाकली 'पीएमएलए' कायद्याअंतर्गत दिल्ली व गुरू ग्राममध्ये तयास करण्यात आला. आता यानंतर करविभागाने हिरोमोटोकॉर्पच्या माल पुरवठादारांकडे आपले लक्ष वळवले आहे. 90 कोटींचे खर्च चुकीच्या पद्धतीने दाखवून कर लाभ मिळवल्याचा यंत्रणेला शंका आहे.

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमची प्रमुख कंपनी  वन 97 मध्ये 10.3 टक्के हिस्सा खरेदी केला. विजय शेखरशर्मा यांचा वन 97 मधील हिस्सा 19.42 टक्क्यांवर पोहोचला तसेच आंटफायनान्शिअल या आणखी एका गुंतवणूकदाराचा हिस्सा घटून 13.5 टक्क्यांवर आला.

'कतार इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटीज' कंपनीने 3920 कोटींच्या गुंतवणुकीद्वारे अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतील 2.7 टक्के हिस्सा खरेदी केला यामध्ये कतारच्या कंपनीने अदानी ग्रीन एनर्जीचे 42.6 दशलक्ष समभाग (शेअर्स) 920 रुपये प्रतिसमभाग दरावर खरेदी केले.
4 ऑगस्ट अखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी
2.4 अब्ज डॉलर्सनी घटून 601.45 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

10 ऑगस्ट अखेर थेट कर संकलनाद्वारे  सरकारकडे एकूण 5.84 लाख कोटींचा महसूल जमा झाला. मागील वर्षाची तुलनाकरता महसूलात 17.3 टक्के वाढ झाली. या संपूर्ण आर्थिक वर्षात थेट करांद्वारे एकूण
18023 लाख कोटींना महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT