सुभाष वैद्य
केंद्र सरकारने निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी सुरू केलेली नॅशनल पेन्शन स्किम अर्थात एनपीएस ही योजना आजघडीला सर्वात कमी खर्चिक आणि पारदर्शक गुंतवणूक साधनांपैकी एक मानली जाते. यामध्ये टियर 1 हे मुख्य खाते असून ते निवृत्तीच्या उद्दिष्टाने तयार करण्यात आले आहे.
टियर 1 या खात्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गुंतवणुकीवर मिळणारी कर सवलत. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी आणि 80 सीसीडी 1 बी अंतर्गत गुंतवणूकदाराला वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट मिळू शकते. मात्र हे खाते दीर्घकालीन असल्याने त्यातून पैसे काढण्यावर कडक निर्बंध आहेत. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच यातील 60 टक्के रक्कम आपण एकाच वेळी काढू शकतो आणि उर्वरित 40 टक्केरकमेतून पेन्शन खरेदी करणे बंधनकारक असते. निवृत्तीपूर्वीच तातडीच्या कारणास्तव पैसे काढायचे असतील तर केवळ विशिष्ट अटींनुसारच अल्प रक्कम काढता येते.
याच्या अगदी उलट स्वरूप टियर 2 खात्याचे आहे. हे खाते पूर्णपणे ऐच्छिक असून ते एका बचत खात्यासारखे काम करते. टियर 2 खाते उघडण्यासाठी आपल्याकडे टियर 1 खाते असणे अनिवार्य आहे. या खात्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील तरलतेची सोय. गुंतवणूकदार या खात्यात कधीही कितीही रक्कम जमा करू शकतो आणि गरजेनुसार कोणतीही अट न पाळता ती रक्कम पुन्हा काढू शकतो. यामध्ये पैसे काढण्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे अनेक जण याला म्युच्युअल फंडला पर्याय म्हणून पाहतात.
टियर 2 खात्यातील गुंतवणुकीवर सामान्य गुंतवणूकदारांना कोणतीही कर सवलत मिळत नाही. केवळ केंद्र सरकारी कर्मचार्यांना विशिष्ट अटींवर यात काही प्रमाणात कर लाभ मिळू शकतात. ज्या गुंतवणूकदारांना शेअर बाजार किंवा रोखे बाजारातील परताव्याचा लाभ घ्यायचा आहे; पण ज्यांना बँकांच्या बचत खात्यापेक्षा जास्त परतावा हवा आहे त्यांच्यासाठी हे खाते उपयुक्त ठरू शकते. एनपीएसमधील फंड व्यवस्थापन शुल्क हे इतर कोणत्याही गुंतवणूक माध्यमापेक्षा खूपच कमी असल्याने टियर 2 मधून मिळणारा निव्वळ परतावा अनेकदा आकर्षक ठरतो.
शेवटी या दोन्ही खात्यांची निवड करताना आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करणे गरजेचे आहे. केवळ टॅक्स वाचवायचा असेल आणि भविष्यात नियमित पेन्शनची सोय करायची असेल तर टियर 1 हाच एकमेव आणि सर्वोत्तम मार्ग आहे, पण निवृत्तीच्या नियोजनासोबतच अधूनमधून लागणार्या पैशांची सोय म्हणून एक लवचिक पर्याय हवा असेल तर आपण टियर 2 खात्याचा वापर करू शकतो. आपल्या उत्पन्नातील एक ठराविक हिस्सा टियर 1 मध्ये सातत्याने गुंतवणे आणि अतिरिक्त बोनस किंवा नफा टियर 2 मध्ये ठेवणे हे एक आदर्श आर्थिक नियोजन ठरू शकते.
गुंतवणुकीसाठी उपयुक्त
गुंतवणुकीच्या धोरणाचा विचार केल्यास टियर 1 खाते हे निवृत्तीचा मोठा निधी उभा करण्यासाठी सर्वोत्तम आहे. यामध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा दीर्घकाळ मिळतो कारण पैसे काढण्यावर मर्यादा असल्याने गुंतवणुकीत खंड पडत नाही. उशिरा गुंतवणूक सुरू करणार्या व्यक्तीसाठी टियर 1 खाते हे प्राधान्य असायला हवे. कारण पुढील 15-20 वर्षांत एक शिस्तबद्ध भांडवल तयार होऊ शकते.
दुसरीकडे टियर 2 खाते हे ज्यांच्याकडे अतिरिक्त रोकड उपलब्ध आहे आणि ज्यांना ती कमी खर्चात चांगल्या ठिकाणी गुंतवायची आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.