Stock Market  (Pudhari File Photo)
अर्थभान

Stock Market | शेअर बाजार निराशेच्या गर्तेत, कारणे काय?

'हे' 92 शेअर्स लाल रंगात न्हाऊन निघाले

पुढारी वृत्तसेवा

मागील आठवड्याच्या लेखात HDFC Bank, ICICI Bank, Reliance Industries यांच्या उत्कृष्ट निकालांमुळे सोमवारी बाजार वधारेल, असे लिहिले होते. झाले ही तसेच; शिवाय अमेरिका-जपान व्यापार करार पूर्णत्वास गेल्याने अमेरिका-भारत करारही लवकरच होईल, अशी आशा निर्माण होऊन बुधवारीही बाजारात चांगली तेजी आली. परंतु, हे दोन दिवस वगळता, उर्वरित तीन दिवस बाजारात मंदीचेच वातावरण राहिले. अखेरच्या दिवशी तर बाजाराने गुंतवणूकदारांचा चांगलाच सुपडासाफ केला. स्मॉल कॅप शेअर्स तर असे गडगडले की ज्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये स्मॉल कॅप शेअर्सचा भरणा अधिक आहे, त्यांनी हायच खावी.

मेटल्स, फाइनान्शिअल आणि फार्मा शेअर्स वगळता इतर सर्व सेक्टर्स धाराशाही झाले. विशेषतः, रिअ‍ॅल्टी आणि आयटी शेअर्स खूपच खाली गेले. निफ्टीपेक्षा निफ्टी नेक्स्ट 50 मधील घसरण अधिक होती. टोरेंट फार्मा, ह्युंडई, झायडस लाईफ, आयसीआयसीआय, जनरल इन्शुरन्स हे शेअर्स वादळात दीपस्तंभ ठरावे तसे लढले, बाकी सर्व शेअसे गलितगात्र झाले. अदानी ग्रीन सर्वाधिक साडेचार टक्के कोसळला. चोला फाइनान्स, एलआयसी, लोढा, अदानी एनर्जी सोलुशन्स या शेअर्सनीही वातावरण खराब केले. स्मॉल कॅप इंडेक्सने मागील आठवड्यात गुंतवणूकदारांना चांगलेच त्रस्त केले. निफ्टी स्मॉल 100 या इंडेक्समधील तब्बल 92 शेअर्स लाल रंगात न्हाऊन निघाले, तेव्हा आठ शेअर्स तेजी दाखवत होते. या शेअर्सचा, त्यांच्या फंडामेंटल्सचा, त्यांच्या Q1 निकालांचा आणि चार्टस्चा गुंतवणूकदारांनी अगदी अवश्य अभ्यास करावा. कारण, हे सर्व आठ शेअर्स फंडामेंटली उत्तम आहेत आणि नजीकच्या भविष्य काळात ते खूप चांगली तेजी दाखवतील, यात शंका नाही.

1) Anant Raj - Rs. 573.45

2) Atul - Rs. 6667

3) Cyient - Rs. 1243.20

4) Kaynes Tech- Rs. 5693.50

5) Laurus Labs - Rs. 837.75

6) Narayana Hruda - Rs. 1991.60

7) Ramkrishna Forge - Rs. 624.95

8) Shyam metalics - Rs. 969

निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्सप्रमाणेच निफ्टी मिड कॅप इंडेक्सनेही वातावरण अधिक खराब केले. या इंडेक्समधील 88 शेअर्स घसरले, तर केवळ 12 शेअर्स बाजारास सावरून धरण्याचा प्रयत्न करत होते.

खरे म्हणजे ज्या एका घटनेने भारतीय शेअर बाजारात तेजीची लहर उमटावयास हवी होती, अशी एक घटना मागील आठवड्यात घडली ती म्हणजे भारत-यूके व्यापार करार! परंतु, मनुष्याप्रमाणे शेअर बाजाराचाही एक स्वभाव असतो आणि खूप वेळा त्याचे वर्तन गुंतवणूकदारांच्या लक्षात येत नाही. या अत्यंत सकारात्मक घटनेचा बाजारावर काहीही परिणाम न होता तो ढिम्मच राहिला. या कराराचे उद्दिष्ट आहे भारत-यूके व्यापार दहा लाख छत्तीस हजार कोटी रुपयांवर नेण्याचे! दरवर्षी दोन लाख वीस हजार कोटी रुपयांपर्यंत दोन्ही देशामध्ये व्यापार वाढेल. भारतीय शेतकर्‍यांना विशेष लाभ मिळवून देणारा हा करार आहे. कारण, चहा आणि तांदूळ यांची निर्यात भारतातून वाढेल. Textiles, Leather, Chemicals, Engineering goods­ ही सेक्टर्सही मोठ्या प्रमाणावर लाभार्थी ठरतील.

FIIS ची अखंड विक्री आणि भारत अमेरिका ट्रेड डीलला विलंब याच कारणांमुळे भारतीय बाजार मंदीच्या छायेत आहे. हे एव्हाना सर्वांनाच ठाऊक झाले आहे. या कराराची वाढवलेली मुदतही संपत आली आहे. विलंबाने का होईना, पण हा करार होणारच आहे. तोपर्यंत सहनशक्ती दाखवणे, अनाठायी ट्रेडस न करणे, Buy on dips चे धोरण अंमलात आणणे याच गोष्टी आपल्या हातात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT