दीपाली चांडक
उत्पन्नाची सुरुवात आणि जीवन विमा हे जणू गणित झाले आहे. हे गणित चुकीचे की बरोबर असे नाही नीटसे मांडता येणार. परंतु पहिल्या उत्पन्नातून दोन पैसे बाजूला टाकण्यासाठी हा एक पर्याय अशी मानसिकता नक्कीच दिसून येते. विमा घेणे म्हणजे आर्थिक नियोजन केले, असे बहुतांश लोकांना वाटते. पण कालानुरूप हीच संज्ञा पूर्ण बदलली आहे आणि आर्थिक साक्षरतेपार होत असणार्या विविध उपक्रमांतून मी नेहमी मांडत असते की, फक्त विमा घेणे म्हणजे आर्थिक नियोजन झाले असे नव्हे, तर आत्ताच्या काळात विम्याचे नियोजन करावयाला हवे आणि हीच आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
विम्याचे नियोजन करताना जीवन विमा, आरोग्य विमा, अपघाती विमा प्रामुख्याने ह्या तीन पर्यायांचा विचार आणि समावेशकता आवश्यक आहे. भारतीय विमा गुंतवणूकदार कर वजावट, परतावा, परताव्यावरील हमी या निकषांवर विमा योजनेची खरेदी करताना मुख्यत: दिसून येतात.आपण आधी केलेल्या गुंतवणुकीवर सतत लक्ष ठेवून गरज पडल्यास, त्यात फेरविचार करणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे गुंतवणूकदार, विमा वगळता अन्य सर्व पर्यायांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवून असतो. परंतु एकदा का जीवन विमामध्ये गुंतवणूक केली की त्याचे प्रीमिअम भरण्याखेरीज कधीही त्या पर्यायाचा फेरविचार मनात आणत नाही. कारण आपण दीर्घमुदतीची बांधिलकी मानसिकरीत्या मान्य केलेली असते. परंतु इतर गुंतवणुकीच्या पर्यायांना लागू होणारे गुंतवणुकीचे सर्व नियम विमा गुंतवणुकीलाही लागू व्हायला हवेत किंवा गुंतवणूकदाराने विचारात घ्यायला हवेत. म्हणून नवनवीन येणार्या योजनांचा/पर्यायांचा सातत्याने विचार करत गेले पाहिजे. उपलब्ध पर्यायांनुसार पुनर्आखणी करणे गरजेचे आहे. आधी केलेल्या गुंतवणुकींचा आढावा घेऊन सुधारित उपाययोजनेनुसार नवीन पर्यायी योजना अमलात आणता येते.
खरे तर जीवन विमा मृत्यूमध्ये अटळ असणार्या आर्थिक नुकसान भरपाईसाठी अत्यंत आवश्यक असा अर्थविचार आहे. परंतु गुंतवणूक आणि जीवन विमा असा एकत्र विचार करून अनेक गुंतवणूकदार विमा पॉलिसीत मालमत्ता अडकून ठेवतात.1880 पासून 2018 पर्यंत जर चलनवाढीचा अभ्यास केला तर लक्षात येते की, ती सरासरी 7% ते 8% ती वाढत आलेली आहे. वर्षानुवर्षे व्याजदराला उतरती कळा चालत आली आहे आणि याचमुळे दीर्घमुदतीचे विमा पर्याय फक्त 5% ते 6% दरानेच परतावा देऊ शकले आहेत.
अनेकवेळा सुरुवातीला पैसे भरताना असणारी आयुष्याची परिस्थिती स्थित्यंतरानुसार बदललेली असते. वाढती महागाई, वाढलेले खर्च, इ. यामुळे आपण आधी सुरू केलेले जीवन विम्याचे हप्ते फेडणे जड जाते किंवा आधी भरलेले प्रीमिअम अडकवून, पुढील लांब पल्ल्यांची प्रीमिअमची बांधिलकी, मिळणारा परतावा, नवनवीन अधिक फायद्याच्या इतर गुंतवणुकीच्या निवडलेल्या योजना, यांचा एकत्रित विचार केल्यास आपण फेरविचार करावा असे आढळून येते. परंतु पुन्हा नव्याने सुरुवात कशी करावी हे लक्षात येत नाही आणि त्यासाठीच पारंपरिक विमा पॉलिसीतून बाहेर पडण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. (या पर्यायांसाठी ग्राहकाने कमीतकमी तीन विमा हप्ते भरलेले असणे आवश्यक आहे.)
रिड्यूस्डपेड-अप पर्याय-पॉलिसी पेड अपमध्ये रूपांतरित करणे म्हणजे सोप्या शब्दात विहित रक्कम म्हणजे मृत्यूदाव्याची रक्कम प्रीमिअम भरण्यानुसार विशिष्ट विमा रकमेत आक्रसणे. उदा.भालेराव यांनी 5 लाख रु. ची जीवन विमा एन्डोमेंट पॉलिसी 25 वर्षे कालावधीकरिता 1 जानेवारी 2003 रोजी घेतली. त्यावेळी त्यांचे वय 45 वर्षे होते आणि आज निवृत्त होताना त्यांना असे जाणवले की, पुढील प्रीमिअम भरणे शक्य नाही किंवा पुढील बारा वर्षे सातत्याने भरलेच जातील अशी मासिक मिळकत आता नाही. तसेच कुटुंबातील सदस्यसुद्धा आर्थिकदृष्ट्या सबळ आणि स्वावलंबी असल्याने पाच लाखांचा विमा असणे आवश्यक नाही. परंतु भरलेल्या प्रीमिअमची बेरीच आणि अवधीपूर्वी विमा पॉलिसी बंद केल्याने मिळणारी रक्कम समाधानकारक नाही. मग अशावेळी रिड्यूस्ड पेड-अप पर्यायाद्वारे, मूत्यूदाव्याद्वारे मिळणारे सुरक्षाकवच तसेच मॅच्युरिटीद्वारे मिळणारी विमा राशी कमी करून सुवर्णमध्य साधता येतो.
सरेंडर-पॉलिसीतून पूर्णत: बाहेर पडणे हे देखील सारासार विचार करूनच ठरवणे हिताचे ठरते. शेवटचा व टोकाचा पर्याय ठरतो पॉलिसी सरेंडर करणे. प्रत्येक विमा कंपनीच्या अंतर्गत धोरणानुसार सरेंडर पर्यायांचे समीकरण बदलते. सरेंडर वॅल्यू ठरवताना भरलेल्या प्रीमिअममधून पहिला प्रीमियम वजा करून उरलेल्या बाकीच्या रकमेतून केवळ 30 % रक्कम ग्राहकास परत मिळविता येते.
विमा फोर्टपोलिओची पुनर्बांधणी करावी आणि आर्थिक अपव्यय टाळावा. ग्राहकाच्या विमाविषयक गरजा आणि प्रीमिअम भरण्याची अर्हता ही व्यक्तिसापेक्ष आहे. त्यामुळे व्यावसायिक नियोजांकाच्या सल्ल्यानुसारच असा अर्थ विचार अमलात आणावा. आर्थिक नियोजनाद्वारे विमा नियोजनाची पहिली यशस्वी पायरी चढण्यासाठी ग्राहकाने तटस्थपणे कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.