वसंत माधव कुळकर्णी
तुम्हाला बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा किंचित अधिक मोबदला (0.50-0.75 टक्के) हवा असेल आणि तुम्ही 3 ते 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुम्ही रोखे गुंतवणुकीचा मोठा हिस्सा कॉर्पोरेट बाँड फंड, डायनॅमिक बाँड फंड, किंवा बँकिंग अँड पीएसयू डेट फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार करणे आवश्यक आहे.
अस्थिरतेची जोखीम दूर ठेवून रोज वाढलेली एनएव्ही पाहू इच्छिणार्या गुंतवणूकदारांसाठी डेट फंड हे आदर्श साधन आहे. आजची ही शिफारस एलआयसी एमएफ बँकिंग अँड पीएसयू डेट फंडाची आहे. हा फंड मुखत्वे (80 टक्के) बँका आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांत गुंतवणूक करतो. त्यामुळे वेळेवर व्याज आणि मुदतपूर्ती पश्चात मुद्दल न मिळण्याची जोखीम अन्य डेट फंडांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, व्याजदर वाढल्यावर एनएव्ही कमी होण्याचा धोका मात्र संभवतो. एक फंड गट म्हणून, या गटातील सर्वच फंडांचा कामगिरीची अव्वल आहे. अनेक वर्षांचा नीचांकी महागाईचा दर लक्षात घेऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण आढावा बैठकीत पाव टक्क्याची व्याज दर कापत करण्यात आली.
व्याजदर आणि रोख्यांच्या किमती यात व्यस्त संबंध असतो. व्याज दर किंवा महागाईचा दर कमी होतो तेव्हा रोख्यांच्या किमती वाढतात आणि जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा रोख्यांच्या किमती कमी होतात. भविष्यात व्याज दर वाढण्याची शक्यता शून्य असल्याने निधी व्यवस्थापकांनी दीर्घ मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक केली आहे. कारण, दीर्घ मुदतीच्या रोख्यांचे अधिमूल्य तुलनेने जास्त असते. कमी मुदतीचे रोखे व्याजदर बदलाशी कमी संवेदनशील असतात. फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने तीन टप्प्यांत 1 टक्क्यांची कपात केली आहे. हा लेख लिहित असताना केंद्र सरकारच्या 10 वर्षे मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याचा दर 6.60 टक्केआहे. बँकिंग अँड पीएसयू डेट फंडांना त्यांच्या मालमत्तेपैकी किमान 80 टक्के रक्कम बँकांच्या आणि सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या रोख्यांत गुंतवणे बंधनकारक आहे.
या फंड गटातील बहुतेक फंड सरासरी तीन वर्षांची परिपक्वता राखतात, ज्यामुळे ड्यूरेशन रिस्क नियंत्रणात राहते. एलआयसी एमएफ बँकिंग अँड पीएसयू डेट फंडाचे ‘मॉडीफाईड ड्यूरेशन’ फंड गट सरासरी 3.20 वर्षांच्या तुलनेत 3.33 वर्षे आहे. फंडाचे ‘यिल्ड टू मॅच्युरिटी’ फंड गट सरासरी 6.67 टक्क्यांच्या तुलनेत 6.68 टक्केआहे. सेबीने वर्गीकरण नियमांच्या आधारे बँकिंग अँड पीएसयू डेट फंडांच्या गुंतवणुकीतील रोख्यांच्या सरासरी मुदतीवर किंवा उर्वरित कालावधीवर मर्यादा घातलेल्या नाहीत. सर्वसाधारणपणे बहुतेक फंडांची सरासरी परिपक्वता 3 -3.50 वर्षे असते; परंतु एडेलवाईज बँकिंग अँड पीएसयू डेट फंडांसारखे फंड परतावा वाढविण्यासाठी ड्युरेशन रिस्क घेतात आणि दूरची मुदत असलेले रोख्यांचा गुंतवणुकीत समावेश करतात. बँकिंग आणि पीएसयू पल ए आणि सार्वभौम रोख्यांत फंडाची प्रमुख गुंतवणूक पत जोखीम (क्रेडिट रिस्क) कमी होते. म्हणून बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा अस्थिरतेची थोडी जोखीम घेऊन मिळविता येईल. प्रतिक श्रॉफ आणि राहुल सिंग हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.