मुंबई : पत्रकारांना माहिती देताना जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी. व्यासपीठावर ईशा अंबानी, उदय कोटक. pudhari photo
अर्थभान

Jio Platforms Growth Strategy : भारताचा सर्वात मोठा आयपीओ येण्यापूर्वीच 'जिओ'ने जाहीर केला रोडमॅप

मोबिलिटी, होम व एंटरप्राइज-इंटरनॅशनल हे जिओचे तीन प्रमुख 'ग्रोथ इंजिन' : आकाश अंबानी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारतातील आजवरच्या सर्वात मोठ्या आयपीओपूर्वी 'जिओ' प्लॅटफॉर्म्सने आपल्या पुढील टप्प्यातील वाढीचा रोडमॅप सादर केला आहे. आरसीपी कॅम्पस येथे पत्रकारांशी बोलताना जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आकाश अंबानी यांनी मोबिलिटी (Mobility), होम (Home) आणि एंटरप्राइज-इंटरनॅशनल (Enterprise-International) यांना कंपनीचे तीन मोठे 'ग्रोथ इंजिन' (वाढीचे मुख्य स्त्रोत) असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान, डिजिटल गेटवे आणि मजबूत पायाभूत सुविधांच्या बळावर २०३१ पर्यंत भारताच्या सुमारे १.४ ट्रिलियन डॉलरच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

आकाश अंबानी म्हणाले, आमच्या व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आमचा ग्राहक आहे. प्रत्येक भारतीय, प्रत्येक घर आणि प्रत्येक उद्योगाला सर्वोत्तम तसेच परवडणाऱ्या डिजिटल सेवा पुखण्यावर जिओचा भर असेल, असे त्यांनी नमूद केले. सध्या जिओकडे सुमारे ५३.३ कोटी कनेक्टिव्हिटी ग्राहक असून, कंपनी भारतातील ६० टक्के पेक्षा जास्त डेटा ट्रॅफिक हाताळते.

१.मोबिलिटी

मोबिलिटी क्षेत्रात येत्या पाच वर्षात सुमारे ३४ कोटी नवीन 4G आणि 5G ग्राहकांची बाजारपेठ कंपनीला दिसत आहे. आकाश अंबानी यांच्या मते, यामध्ये सुमारे १० कोटी असे नवीन ग्राहक असतील जे पहिल्यांदाच मोबाईल कनेक्शन घेतील, तर सुमारे २४ कोटी ग्राहक 2G वरून 4G आणि 5G कडे अपग्रेड होतील. २०२६ मध्ये जिओचे निव्वळ सक्रिय मोबाईल ग्राहक दुसऱ्या क्रमांकावरील ऑपरेटरच्या तुलनेत तब्बल तीन पटीने वाढले आहेत.

२. होम ब्रॉडबँड

होम ब्रॉडबँडला कंपनी आगामी वर्षांतील वाढीचा सर्वात मोठा स्त्रोत मानत आहे. जिओचे सध्या सुमारे २.८६ कोटी फिक्स्ड ब्रॉडबैंड ग्राहक असून, ही संख्या १० कोटी घरांपर्यंत पोहोचवण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. २०२६ मध्ये देशात जोडल्या गेलेल्या एकूण नवीन फिक्स्ड ब्रॉडबैंड कनेक्शनमध्ये जिओचा वाटा तब्बल ६७.५ टक्के राहिला. फायबरसह आपल्या वायरलेस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील १९,००० पिन कोडपर्यंत पोहोच वाढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

३. एंटरप्राइज आणि इंटरनॅशनल

तीसरे 'ग्रोथ इंजिन' म्हणजेच एंटरप्राइज आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय होय. जिओला भारतात सुमारे ₹५.१ लाख कोटी म्हणजेच ५६.८ अब्ज डॉलरची एंटरप्राइज डिजिटल सव्र्हिसेसची बाजारपेठ दिसत आहे. आकाश अंबानी यांच्या माहितीनुसार, देशातील सुमारे ६५ टक्के बँक शाखा जिओच्या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत.

मॅनेज्ड सर्व्हिस पार्टनर' म्हणून काम करण्याचे नियोजन

जिओने स्वतः विकसित केलेले एंड-टू-एंड 'टेक्नॉलॉजी स्टॅक' निवडक परदेशी बाजारपेठांमध्ये मॉनेटाइज करण्याची कंपनीची योजना आहे. केवळ सॉफ्टवेअर विकणे हा उद्देश नसून, जागतिक टेलिकॉम कंपन्यांसोबत 'मॅनेज्ड सव्र्हिस पार्टनर' म्हणून काम करण्याचे जिओचे नियोजन आहे. यामुळे भारत तंत्रज्ञान आयातदाराकडून तंत्रज्ञान निर्यातदार बनण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतो, असे आकाश अंबानी म्हणाले.

१९७७ मधील आठवणींना उजाळा

यापूर्वी ईशा अंबानी यांनी जिओची सुरुवात आणि रिलायन्सच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा उल्लेख करताना सांगितले की, कंपनी दीर्घकालीन विचार, मोठ्या प्रमाणावरील काम, मजबूत अंमलबजावणी आणि आर्थिक शिस्त यावर विश्वास ठेवते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उदय कोटक यांनी रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी आणि १९७७ मधील रिलायन्सच्या ऐतिहासिक आयपीओच्या आठवणींना उजाळा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT