TCS Salary Hike
भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने नुकताच १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार १ सप्टेंबरपासून वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.
टीसीएसचे सीएचआरओ मिलिंद लक्कड आणि सीएचआरओ के सुदीप यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमधून याची माहिती दिली आहे. या पगारवाढीचा फायदा सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांना होईल.
ही पगारवाढ ज्युनियर ते मध्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. ज्यात कंपनीच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. कंपनीने म्हटले आहे की C3A पर्यंतच्या ग्रेड्स आणि त्याच्या समकक्ष पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा केली जाणार आहे.
"आम्हाला C3A आणि समतुल्य श्रेणीतील सर्व पात्र सहकाऱ्यांच्या पगारात सुधारणा जाहीर करताना आनंद होत आहे, ज्यात आमच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल," असे कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे.
सदर कंपनीने नेमकी किती पगारवाढ होईल? याबाबत अचूक माहिती दिलेली नाही. गेल्यावेळी कामाच्या मूल्यांकन प्रक्रियेत, टीसीएसने एप्रिल २०२४ पासून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक ४.५ टक्के ते ७ टक्के पगारवाढ दिली होती. "आम्ही याची पुष्टी करू शकतो की आम्ही आमच्या सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०२५ पासून पगारवाढ देणार आहोत," असे कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
ग्राहकांकडून खर्चात कपात, टॅरिफ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मुळे भारतीय आयटी उद्योग मंदावलेल्या महसूल वाढीमुळे दबावाखाली आला आहे. या पार्श्वभूमीवर टीसीएसने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की ते चालू आर्थिक वर्षात १२ हजार नोकरकपात करतील.
आयटी उद्योगात नोकरकपातीची लाट सुरुच आहे. Layoffs.fyi वरील आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये १७६ टेक कंपन्यांनी ८०,८४५ कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.