Indian Share Market | भारतीय शेअर बाजार सकारात्मक वळणावर? 
अर्थभान

Indian Share Market | भारतीय शेअर बाजार सकारात्मक वळणावर?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. विजय ककडे

भारतीय शेअर बाजार सातत्याने विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमाऱ्यातून आणि भू-राजकीय अस्थिरता, तेलाच्या वाढत्या किमती यातून सावरला नसल्याने गेल्या दोन वर्षांत त्याने फारसा परतावा दिला नाही. नोव्हेंबर महिन्यात हे चित्र सकारात्मकरित्या बदलले आणि एक सकारात्मक वळण शेअर बाजाराला मिळाले आहे; पण अल्पशा तेजीतून सातत्याने बाजार वाढतच जाईल, हे समजणे गुंतवणुकीच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते.

सध्या सेन्सेक्सने ८२ हजार पातळी गाठली असून, निफ्टी २५००० च्या पुढे आहे. नोव्हेंबर महिन्यात दोन्ही निर्देशांकामध्ये 10 टक्के वाढ झाली. हे सकारात्मक वातावरण अशाच प्रकारचे राहील का, हा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. परंतु, त्याचबरोबर झालेले बदल समजावून घेणे आणि आपली त्यानुसार गुंतवणूक रचना करणे महत्त्वाचे ठरते.

सकारात्मक बदल : नोव्हेंबर महिना आणि दीपावलीचा शुभमुहूर्त भारतीय गुंतवणूकदारांना मोठा परतावा देणारा ठरला. याचे महत्त्वाचे कारण परकीय गुंतवणूकदार संस्था यांनी ६० हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक केली. ऑक्टोबरमध्ये ३४ हजार कोटी रुपयांची त्यांनी विक्री केली होती. याचा परिणाम म्हणून शेअर बाजाराचा निर्देशांक वाढत्या गुंतवणुकीतून वाढत गेलेला दिसतो. यासोबत दुसरा महत्त्वाचा सकारात्मक बदल म्हणजे कंपन्यांच्या तिमाही निकालामध्ये मोठी सुधारणा झालेली दिसते. केवळ गुंतवणूकदारांचा उत्साह नव्हे, तर त्या पाठोपाठ सकारात्मक अर्थ प्रवाह आणि कंपन्यांची कामगिरी तेवढीच महत्त्वाची असते.

सप्टेंबर २०२६ च्या कंपन्यांच्या तिमाही कामगिरीतून असे दिसते की, निफ्टीतील ४७ कंपन्यांपैकी फक्त तीन कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिले. २७ कंपन्यांनी नफ्याच्या बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, तर १७ कंपन्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे राहिले. विशेषत: बँकिंग, वाहन उद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि औषधनिर्मिती क्षेत्रांत कंपन्यांच्या सकारात्मक कामगिरीचा आधार सेन्सेक्सला मिळाला. यासोबतच आणखी एक महत्त्वाची सकारात्मक बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट. भारत हा मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की भारताचा आयात खर्च वाढतो. त्याचा परिणाम चालू खात्यातील तूट वाढते. रुपयाचा विनिमय दर घसरतो, महागाई वाढते, वाहतूक उत्पादन खर्च यात वाढ होते आणि कंपन्यांचा नफा कमी होतो. सध्या तेलाचा आंतरराष्ट्रीय दर शंभर डॉलरच्या खाली असल्याने त्याचाही फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होत आहे. जागतिक गुंतवणुकीतील प्रवाहात देखील बदल होत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कंपन्यांच्या प्रचंड गुंतवणुकीबाबत आणि भविष्यातील परताव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषत: डेटा सेंटरसाठी असणारा विरोध आणि त्यामुळे एआय गुंतवणुकीचे भवितव्य फारसे सकारात्मक वाटले नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती आणि भारतीय अर्थव्यवस्थेची सकारात्मक ७.१ टक्के इतकी वाढ हीदेखील गुंतवणूक आकर्षणाचे कारण ठरले. भारतीय अर्थव्यवस्थेतील देशांतर्गत मागणी, पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्च, डिजिटल अर्थव्यवस्थेचा विस्तार, औद्योगिक उत्पादनातील सुधारणा या सर्व बाबी सकारात्मक आहेत.

गुंतवणुकीची आकर्षक क्षेत्रे

आगामी कालखंडात बँकिंग, वित्त सेवा, पायाभूत सुविधा, संरक्षण, उद्योग, औषध निर्मिती, ऊर्जा, भांडवली वस्तू या क्षेत्रांत गुंतवणूक अधिक चांगला परतावा देऊ शकते. एकूण देशांतर्गत गुंतवणुकीचा वाढता आधार आणि कंपन्यांच्या नफ्यातील वाढ, विदेशी गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात असलेल्या संधी व मध्यमवर्गीयांच्या खर्चातील वाढ हे सर्व घटक भारतीय बाजाराला पाठबळ देणारे ठरले.

भविष्यकालीन दिशा

एका बाजूला बाजाराची सकारात्मक दिशा असताना सावधानता ही तितकीच आवश्यक असते. अल्पशा तेजीतून सातत्याने बाजार वाढत जाईल, हे समजणे गुंतवणुकीच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते. यासाठी भविष्यकाळात जर अमेरिकन व्याजदर वाढले व आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती तणावाची राहिली, तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, रुपयाचे अवमूल्यन झाले तर पुन्हा आपला बाजार घसरू शकतो. बाजारातील चढ-उतार हे नेहमीचेच असते. त्यामुळे गुंतवणुकीतील शिस्तबद्ध सातत्य हेच चांगल्या प्रकारची गुरुकिल्ली असते.

गुंतवणूक करण्यापूर्वी निश्चितच आपला अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला याचा वापर केल्यास भांडवल बाजार हा अधिक परतावा देणारा हमखास मार्ग ठरतो. बाजाराची दिशा सकारात्मक असताना बाजारातील चढ-उताराचा निर्देशांक विक्स वाढला आहे. याचा अर्थ वजन वाढले आहे. चांगला विकास झाला आहे; पण त्याचबरोबर जोखीम वाढली आहे, असे आपल्या अर्थव्यवस्थेचे चित्र आहे. म्हणूनच गुंतवणुकीत सावधानता हा यशाचा नेहमीच पासवर्ड असतो, हे लक्षात घ्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT