अर्थभान

गृहिणींसाठी विमा गरजेचा आहे का?

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर अखेर दिव्या मेहता आयुर्विमा पॉलिसी विकत घेण्यास तयार झाल्या. त्यांचा एक चुलतभाऊ त्यांना ही पॉलिसी विकत घेण्यासाठी खूप आग्रह करत होता. सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे त्या पॉलिसी खरेदी करण्यासाठी तयार झाल्या असल्या, तरी ही गुंतवणूककेंद्री विमा पॉलिसी आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे की नाही, याबद्दल त्यांना पूर्ण खात्री वाटत नव्हती आणि अशा पद्धतीने विचार करणाऱ्या त्या एकट्या नाहीत. बऱ्याच जणांना खरोखर असे वाटते की, विमा पॉलिसी म्हणजे जबरदस्तीची बचत आहे. विमा पॉलिसी त्यांच्या कुटुंबाला आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण तर पुरवेलच, शिवाय पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या हातात भरीव रक्कम येईल, हा प्रमुख मुद्दा त्यांच्यावर बिंबवला जातो.

दिव्यासारख्या अनेक जणांच्या मनात एक प्रश्न सारखा डोके वर काढत राहतो. तो म्हणजे त्यांना विमा काढण्याची खरोखर गरज आहे का? याचे उत्तर शोधण्यासाठी आपण प्रथम आयुर्विमा म्हणजे नेमके काय हे समजून घेऊ. आयुर्विमा हे एक प्राथमिक साधन आहे, ज्याद्वारे व्यक्ती तिच्या/त्याच्या लवकर वा अकाली झालेल्या निधनामुळे निर्माण होणारी आर्थिक जोखीम (तिच्या/त्याच्या कुटुंबाकडून) विमा कंपनीकडे सोपवली जाऊ शकते.

पुढील पायरी ही की, एखाद्याचा मृत्यू झाल्यास कोणत्या प्रकारची आर्थिक जोखीम निर्माण होऊ शकते. दिव्या स्वत:ला विचारू शकते: "मला काही झाले तर सध्याचे राहणीमान कायम राखण्यासाठी तसेच आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा माझ्या कुटुंबाकडे असेल का?". या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण व विश्लेषण करावे लागेल. कुटुंबातील कमावत्या सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या कुटुंबाला प्रचंड भावनिक व आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यावेळी कुटुंबाकडे अतिरिक्त पैसा असला, तरी नियोजन नीट न केल्यास कुटुंबाला पुढे खडतर काळाचा सामना करावा लागू शकतो.

आयुर्विमा घेणे हा बहुतांशी वैयक्तिक निर्णय आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर लक्षणीय परिणाम होणार, असेल तरच तो घेतला जावा. अशा परिस्थितीत एका गृहिणीने खालील बाबींचा विचार केला पाहिजे:

माझ्या मुलांच्या गरजा, कौटुंबिक उद्दिष्टे व दायित्वे पूर्ण करण्यासाठी माझ्या जोडीदाराचे उत्पन्न पुरेसे आहे का?

मला आज काही झाले, तर काही तात्कालिक किंवा पुन:पुन्हा होणारे खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे का?

माझ्या जोडीदाराला पुरेसे संरक्षण आहे का? जर त्याला/तिला ते असेल, तर त्याचा/तिचा मृत्यू झाल्यास मला किती प्रकारच्या आणि किती प्रमाणातील खर्च, उद्दिष्टे व दायित्वांची पूर्तता करावी लागेल?

एका गृहिणीसाठी, तिच्या जोडीदाराला पुरेसे संरक्षण आहे की नाही याची खात्री करणे, स्वत:ला  पुरेसे संरक्षण आहे की नाही हे बघण्याहून अधिक महत्त्वाचे आहे. जर जोडीदाराला आयुर्विम्याचे पुरेसे संरक्षण असेल, तर गृहिणीला आयुर्विमा खरेदी करण्याची गरज नाही. तरीही आयुर्विमा पॉलिसी खरेदी करायचीच असेल, तर सुलभ मुदतीची कमी हप्त्यामध्ये चांगले संरक्षण देणारी योजना घेणे सर्वोत्तम. बहुतेक कंपन्या निव्वळ मुदतीची योजना आर्थिक कारणांसाठी किंवा नैतिक कारणांसाठी नाकारतील, किंवा ५ लाख रुपये मूल्याच्या आसपासचे निम्न संरक्षण देतील. एका ३५ वर्षांच्या स्त्रीसाठी ५ लाख रुपयांच्या मुदत संरक्षणाची किंमत प्रतिवर्ष १७०० रुपये एवढी जाते.

हप्त्याची रक्कम कंपनीनुसार बदलेल पण सामान्यपणे याहून अधिक हप्ता भरण्याची गरज नाही. तुम्ही गुंतवणूककेंद्री पॉलिसी सहज दूर ठेवू शकता. विमा एजंटांना असे वाटते की, गृहिणी या कुटुंबातील कमावत्या सदस्य नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर पर्यायी उत्पन्न उभे करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट, एखाद्या गृहिणीने गुंतवणूककेंद्री विमा पॉलिसीचा पर्याय स्वीकारला तर ते लगेच तो देतात.

यातील जोखमीमध्ये कुटुंबाच्या भविष्यकाळावर परिणाम करण्याची क्षमता आहे का याचा विचार करणे हा आयुर्विमा पॉलिसी खरेदी करण्याचा योग्य दृष्टिकोण आहे. आपल्या मृत्यूमुळे कुटुंबावर जो भावनिक आघात होईल, त्या व्यतिरिक्त काही आर्थिक नुकसानही होईल का याचा अंदाज घेण्यास दिव्याने सुरुवात केली.

तिच्या अनुपस्थिती निर्माण होऊ शकतील अशा काही खर्चांची यादी तिने ढोबळ विभागांखाली केली.

मुलांची काळजी घेण्यासाठी केअर टेकर

मुलांसाठी शिकवणी घेणारी शिक्षिका

घरात मदतनीस

हे सर्व विश्लेषण केल्यानतंर तिच्या असे लक्षात आले की, तिच्या नवऱ्याचे उत्पन्न वरील सर्व गरजा भागवण्यासाठी पुरेसे तर आहेच, शिवाय दरवर्षी गुंतवणुकीसाठी एक व्यवस्थित रक्कमही बाजूला पडेल. तिला आणि तिच्या नवऱ्याला काही झाले तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांची काळजी घेण्यासाठी तिच्या नवऱ्याला पुरेसे संरक्षण आहे, हेही तिच्या लक्षात आले. या विचारप्रक्रियेला थोड्या हिशेबाची जोड दिल्यानंतर दिव्यासाठी निर्णय करणे सोपे झाले. आपल्या बचतीतील अधिक हिस्सा गुंतवण्याचा निर्णय तिने घेतला आणि कमी खर्चाची मुदत योजना देऊ शकेल, अशा विमा कंपनीचा शोध ती घेऊ लागली.

गृहिणी पार पाडत असलेली कर्तव्ये नक्कीच निस्वार्थी आणि अतुलनीय आहेत. त्यांच्या बहुतेक जबाबदाऱ्या घरगुती बाबींशी निगडित असल्या तरी आयुर्विम्याचा विचार करताना व्यक्तीच्या परिस्थितीचे पूर्ण मूल्यांकन करूनच चातुर्याने निर्णय करणे आवश्यक असते.

(File pic)

      – अमर पंडित, सीएफए, HappynessFactory.in चे चीफ हॅपिनेस ऑफिसर आणि संस्‍थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT