Viral News File Photo
अर्थभान

Viral News: दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करत जगताय? मग करोडपती उद्योजकाची 'ही' डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट नक्की वाचा

आपण नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करत असतो, यामुळे स्वतःच्या यशाचा आनंद तर घेऊ शकत नाहीच, उलट नेहमी दु:खी राहतो.

पुढारी वृत्तसेवा

Viral News

मुंबई: आपण नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करत असतो, यामुळे स्वतःच्या यशाचा आनंद तर घेऊ शकत नाहीच, उलट नेहमी दु:खी राहतो. असाच एक करिअरमधील संघर्ष, कुटुंबातील दुःखद घटना आणि या सगळ्यातून सावरत असताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला याचा वैयक्तिक अनुभव उद्योजक परेश पिसिपाटी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमधून शेअर केला आहे. वडिलांचे निधन आणि कौटुंबिक संकटांनंतर आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलला, हा प्रवास त्यांनी सांगितला आहे.

वयाच्या ३२ व्या वर्षांपर्यंत मानसिक संघर्ष

पिसिपाटी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भूतकाळातील आठवणी सांगितल्या आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी हाती कोणतीही नोकरी नसताना त्यांचे मित्र चांगल्या पदांवर रुजू झाले होते. वयाच्या २६ व्या वर्षी जेव्हा ते अवघे २६ हजार रुपये महिना कमवत होते, तेव्हा त्यांचे अनेक मित्र आणि सहकारी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमावत होते. हाच मानसिक संघर्ष वयाच्या ३२ व्या वर्षांपर्यंत सुरू राहिला. जेव्हा त्यांना वाटले की आता आपण चांगले पैसे कमावत आहे, तेव्हा त्यांच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी लहान असलेले तरुण त्यांच्याहून अधिक पॅकेज घेत असल्याचे त्यांनी पाहिले. यामुळे सातत्याने मनात एक असंतोष आणि अपयशाची भावना घर करून राहिली होती, असे त्यांनी म्हटले आहे.

कौटुंबिक संकटांनंतर कसा बदलला दृष्टिकोन?

मात्र, त्यानंतर आलेल्या काही अनपेक्षित संकटांनी पिसिपाटी यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. लागोपाठ दोन वर्षे त्यांच्या वडिलांवर कर्करोगाचे उपचार सुरू असल्याने त्यांचा बराच वेळ रुग्णालयात गेला. याच काळात त्यांची आई आणि पत्नी वेगवेगळ्या अपघातात जखमी झाल्या. या गंभीर परिस्थितीशी झुंजत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या दुःखातून सावरतानाच त्यांच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट आला. वडिलांच्या अंत्यविधीच्या दिवसांमध्ये त्यांना जाणीव झाली की, सतत इतरांच्या प्रगतीशी स्वतःची तुलना करत राहिल्यामुळे ते स्वतः भूतकाळातच अडकून पडले आहेत.

पैशांपेक्षा कृतज्ञता महत्त्वाची

या आत्मपरीक्षणानंतर त्यांनी यशाची व्याख्या बदलली. तुलना करण्याऐवजी त्यांनी कृतज्ञता, स्वतःची प्रगती आणि इतरांना मदत करण्यावर भर दिला. "दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी पैसे कमवणे आणि गुंतवणूक करणे नक्कीच महत्त्वाचे आहे. परंतु, गरज असताना आपण जर कोणाच्या मदतीला धावून जाऊ शकलो नाही, तर त्या संपत्तीला काहीही अर्थ उरत नाही," असे पिसिपाटी यांनी म्हटले आहे. याच विचारातून गेल्या साडेतीन वर्षांपासून ते विविध सामाजिक संस्थांना आणि अन्नदान उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत.

सध्या परेश पिसिपाटी ३७ वर्षांचे आहेत. आज ते स्वतःला भाग्यवान समजतात. उत्तम आरोग्य, खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे मित्र आणि प्रेमळ कुटुंब हीच आपली खरी संपत्ती असल्याचे ते सांगतात. कठोर परिश्रम करा, शक्य असेल तेव्हा इतरांना मदत करा आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल नेहमी कृतज्ञ राहा, असा मोलाचा सल्ला त्यांनी या पोस्टमधून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT