मुलांसाठी गुंतवणूक योजना कशी निवडावी? Pudhari File Photo
अर्थभान

मुलांसाठी गुंतवणूक योजना कशी निवडावी?

मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक योजना

पुढारी वृत्तसेवा
जगदीश काळे

गुंतवणूक करताना चांगला परतावा, सुरक्षितता, करसवलत, मुलांची गरज आणि योजनेतील लवचिकता या पाच गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या पाल्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, अशी इच्छा बाळगून असते. यासाठी तो दिवस-रात्र मेहनत करत असतो आणि एक एक पैसा उभा करत असतो. अधिकाधिक परतावा मिळावा याद़ृष्टीने तो विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना पाहत असतो. अशा मंडळींसाठी काही टीप्स या ठिकाणी देत असून या मदतीने मुलांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करू शकता.

या पाच गोष्टी लक्षात ठेवा

मुलांच्या भवितव्यासाठी एखादी गुंतवणूक योजना पाहत असाल तर गुंतवणूक करताना चांगला परतावा, सुरक्षितता, करसवलत, मुलांची गरज आणि योजनेतील लवचिकता या पाच गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत.

चांगला परतावा : दीर्घकाळात चांगला परतावा मिळेल, अशा गुंतवणूक योजनांची निवड करायला हवी.

सुरक्षितता : मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. मुलांच्या नावाने गुंतवला जाणारा पैसा हा सुरक्षित कसा राहील, याचा विचार करायला हवा. यासाठी आपण सरकारी योजनांतील मोठ्या कंपनीत गुंतवणुकीचा पर्याय पाहावा.

करसवलत : करसवलत देणार्‍या गुंतवणूक योजनांचा विचार करायला हवा. तसेच योजना पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त राहील, याद़ृष्टीने गुंतवणूक योजनेची निवड करायला हवी आणि अशाच योजनांना प्राधान्य द्यायला हवे.

लवचिकता : गुंतवणूक योजना लवचिक असेल तर गरजेच्या वेळी पैसे काढणे सोयीचे ठरते. याद़ृष्टीने योजना पाहाव्यात. एखाद्या महिन्यात पैसे कापले गेले नाही तर पेनल्टी बसणार नाही, काही वेळा गुंतवणुकीतील काही रक्कम काढली तर त्यावर शुल्क आकारणी होणार नाही, प्रीमॅच्युअर एक्झिटसाठी कोणत्याही प्रकारचा एक्झिट लोड नसणे या गोष्टींची चाचपणी करून गुंतवणूक योजना निवडावी. पीपीएफसारख्या योजना फायदेशीर राहिलेल्या आहेत.

मुलांची गरज ओळखा : योजनेची निवड करताना मुलांच्या शिक्षणासाठी किती आणि कधी पैसे लागणार आहेत, याचा विचार करायला हवा. शिवाय विवाह, व्यवसायासाठी पैसे कधी लागतील, याचेही आकलन करायला हवे. म्हणून लॉक इन पीरियड नसलेल्या योजनांची निवड करायला हवी.

आवडीची योजना निवडा

गुंतवणुकीचे आजघडीला असंख्य पर्याय आहेत; परंतु या पर्यायांपैकी कोणती योजना चांगली आहे, याचा निर्णय तुम्हीच घेऊ शकता. अर्थात यासाठी फायनान्शियल प्लॅनरची सेवा घेऊ शकता; परंतु ती सेवा सशुल्क असते. तुम्हाला सशुल्क सेवा नको असेल तर पुढे सांगितलेल्या योजनांची काळजीपूर्वक निवड करायला हवी. यात युनिट लिंक्ड विमा योजनेतील गुंतवणूक, म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी गुंतवणूक, बँकेतील मुदत ठेवी किंवा आवर्ती ठेव योजना, पीपीएफमधील गुंतवणूक, ईटीएफमधील गुंतवणूक, सरकारी बाँड गुंतवणूक, सरकारी योजनांतील गुंतवणूक, सोन्यात भौतिक रुपातून गुंतवणूक यांसारख्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा.

गुंतवणूक कशासाठी गरजेची

मुलांसाठी गुंतवणूक करण्याचे अनेक कारणे असू शकतात. यात प्रामुख्याने शिक्षणावरचा वाढता खर्च आणि विवाह सोहळ्यावरील खर्च याचा उल्लेख करावा लागेल. मात्र मुलांना व्यवसाय करायचा असेल किंवा त्यांच्यासाठी घर खरेदी करायचे असेल तर वार्षिक गुंतवणुकीच्या रकमेत वाढ करावी लागेल. अर्थात, तुम्ही म्युच्युअल फंडच्या एसआयपीचा विचार केला तर पुढील वीस वर्षांपर्यंत दरवर्षी तीन हजार रुपये दरमहा गुंतवणूक केल्यास त्यावरचा अंदाजित परतावा बारा टक्के गृहित धरला तर वीस वर्षांनंतर तीस लाख रुपये मिळतील आणि याप्रमाणे हीच गुंतवणूक 25 वर्षे सुरू ठेवली तर 57 लाख आणि तीस वर्षांत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT