Celebrity Wedding Business Model Pudhari
अर्थभान

Celebrity Weddings: ग्लॅमर, फॉलोअर्स आणि प्रॉफिट.. सेलिब्रिटींच्या शाही लग्नांमागचं आर्थिक गणित

Celebrity Wedding Business Model India: सेलिब्रिटींच्या शाही लग्नांमागे मोठं प्रमोशन आणि ब्रँड डील्सचा खेळ असतो. लग्नाच्या पोस्टमुळे फॉलोअर्स वाढतात आणि जाहिरातींची कमाईही वाढते.

Rahul Shelke

Celebrity Wedding Business Model India: बॉलीवूडमध्ये लग्नसराईचा सीझन सुरू झाला की चाहत्यांची उत्सुकता वाढते. अलीकडेच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील शाही लग्नाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्री-वेडिंग शूटपासून पहिल्या फोटोपर्यंत प्रत्येक अपडेट व्हायरल झाली आहे. पण या सेलिब्रिटी लग्नांमागे मोठं आर्थिक गणित आणि प्रमोशनची स्ट्रेटेजी असते.

नात्याच्या चर्चेपासून सुरू होतो ‘बिझनेस’

सेलिब्रिटी कपल्सच्या प्रेम कहाण्या अनेकदा चित्रपटांच्या सेटवर सुरू होतात. त्यानंतर अफेअर्सच्या चर्चा, सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स यामुळे ते सतत चर्चेत असतात. या चर्चेमुळे दोघांची ब्रँड व्हॅल्यू वाढते. वर्षानुवर्षे नातं टिकून राहिलं की लग्नाची घोषणा होते आणि त्याच क्षणापासून प्रमोशनचा टप्पा सुरू होतो.

प्री-वेडिंग ते फर्स्ट फोटो

मेहेंदी, संगीत, हळद... प्रत्येक सोहळ्यावर ‘कंटेंट’ बनवला जातो. रील्स, स्टोरीज आणि पोस्ट्समधून लाखो-कोटी व्ह्यूज मिळतात. एका व्हायरल रीलमुळे जाहिरातींचे दर वाढतात आणि ब्रँड्सचे लक्ष या कपलकडे जाते. चाहतेही या प्रक्रियेत महत्त्वाचे असतात. ते उत्साहाने फोटो शेअर करतात, कमेंट्स करतात आणि यामुळे फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढते.

डिझायनर्स आणि ज्वेलरी ब्रँड्सचा गेम

सेलिब्रिटींनी लग्नात घातलेले कपडे आणि दागिने पुढच्या ट्रेंडचा भाग बनतात. त्यामुळे मोठे डिझायनर्स आणि ज्वेलरी ब्रँड्स आधीच संपर्क साधतात. अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये “हा लेहंगा अमुक डिझायनरचा आहे” किंवा “ज्वेलरी तमुक ब्रँडची आहे” अशी माहिती देतात. यामागे मोठ्या ब्रँड डील्स असण्याची शक्यता असते. सोनम कपूरने सांगितले होते की, “इतके महागडे कपडे खरेदी करणे शक्य नसते; बरेचदा ते भाड्याने घेतले जातात.”

‘नो फोन पॉलिसी’ आणि एक्सक्लूसिव्ह फोटो

अनेक लग्नांमध्ये ‘नो फोन पॉलिसी’ असते. यामागचा उद्देश असा असतो की, पहिला अधिकृत फोटो व्हायरल होऊ नये याची काळजी घेतली जाते. काहीवेळा ब्लर फोटोंमुळे चर्चा होते आणि मग अधिकृत फोटो प्रसिद्ध होताच लाइक्सचा पाऊस पडतो.

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट-रणबीर कपूर, दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, विक्की कौशल-कॅटरीना कैफ या जोडप्यांच्या लग्नाच्या पोस्ट्सना लाखो-करोडो लाइक्स मिळाले आहेत. अलीकडे रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या फोटोनेही विक्रमी लाइक्स मिळवले आहेत. तिचे फॉलोअर्स 49.2 मिलियनवरून 50 मिलियनवर गेले, तर विजयचेही फॉलोअर्स वाढले आहेत.

लग्नानंतरची कमाई

लग्नानंतर कपलची ब्रँड एंडोर्समेंट्ची मागणी वाढते. अनेकदा फॉलोअर्समध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ होते. यामुळे जाहिरातींचे दर वाढतात. काही वेळा लग्नाचे फोटो किंवा स्ट्रीमिंग राइट्स कोट्यवधींना विकले जातात.

उदाहरणार्थ, प्रियंका चोप्राच्या लग्नाचे फोटो मॅगझिनला 18 कोटी रुपयांना विकल्याची चर्चा झाली होती. नयनताराने आपल्या लग्नाचे स्ट्रीमिंग राइट्स 25 कोटी रुपयांना दिल्याचीही माहिती समोर आली होती. रश्मिका आणि विजय यांना देखील 60 कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे, मात्र त्यांनी ती नाकारल्याचे सांगितले जाते.

सेलिब्रिटींच्या शाही लग्नांमध्ये मोठा खर्च होतो, पण त्यामागे तितकाच मोठा आर्थिक फायदा आणि प्रमोशनचं प्लॅनिंग असतं. प्रेम, परंपरा आणि ग्लॅमरसोबतच ब्रँडिंग, सोशल मीडिया आणि व्यावसायिक करार म्हणजे आजचे ‘सेलिब्रिटी वेडिंग’. म्हणजेच बँड-बाजा-बारात हा केवळ आनंदाचा सोहळा नसून, ते एक ‘बिझनेस मॉडेल’ आहे.

सेलिब्रिटी वेडिंग आणि फॉलोअर्स

  • करीना कपूर आणि सैफ अली खान: 2012, त्यांच्या लग्नाच्या वेळी सोशल मीडिया फार मर्यादित होता, परंतु त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढली. आज, करीनाचे 14 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि हे जोडपे टॉप ब्रँड्समध्ये आहे.

  • विराट कोहली आणि अनुष्का शर्मा: 2017: लग्नाच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले (एका पोस्टवर 3 दशलक्ष+ व्ह्यूज). विराटने नंतर 100 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्सचा आकडा ओलांडला आणि अनुष्काला श्रेय दिले.

  • दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग: 2018 : लग्नाच्या फोटोंना 25 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले: लग्नानंतर दोघांच्या ब्रँड व्हॅल्यू आणि फॉलोअर्समध्ये 10-20% वाढ झाली.

  • आलिया भट्ट आणि रणबीर कपूर: 2022, लग्नानंतर आलियाची लोकप्रियता वाढली. फॉलोअर्समध्ये अंदाजे 10-15% वाढ झाली.

  • सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी, 2023: त्यांच्या लग्नाचा फोटो भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला फोटो होता. इंस्टाग्राम पोस्ट (16.5 दशलक्ष लाईक्स) सर्वात जास्त चर्चेत होती, ज्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली.

  • विकी कौशल आणि कतरिना कैफ, 2021: त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर 12.6 दशलक्ष लाईक्स होते. त्यांच्या लग्नानंतर लाखो नवीन फॉलोअर्स वाढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT