Indian woman success story earned 63 lakh extra income streams
लंडन: नोकरीच्या पगारावर अवलंबून न राहता अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधणाऱ्यांसाठी एका तरूणीची गोष्ट प्रेरणादायी ठरत आहे. लंडनमध्ये काम करत असताना आपल्या पगाराव्यतिरिक्त ६३ लाख रुपये कसे कमावले, याचा खुलासा एका भारतीय तरूणीने केला आहे. अदिती मिश्रा असे तिचे नाव असून ती लंडनमध्ये फिनटेक स्टार्टअपमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे.
अदिती मिश्रा स्वतःला "फुल-टाइम कॉर्पोरेट कर्मचारी" आणि "पार्ट-टाइम कंटेंट क्रिएटर" असे सांगते. ती लंडनमधील एका फिनटेक स्टार्टअपमध्ये 'चीफ ऑफ स्टाफ' म्हणून कार्यरत असून आठवड्याला ६० तासांहून अधिक काम करते. नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये तिने आपल्या विविध उत्पन्न स्रोतांची माहिती दिली.
अदितीचे इन्स्टाग्रामवर २.२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या अतिरिक्त कमाईचा मोठा भाग कंटेंट क्रिएशनमधून येतो. तिने सांगितले की, अॅफिलिएट मार्केटिंगमधून तिला केवळ १२ पौंड (सुमारे १,५०० रुपये) मिळाले. मात्र, भविष्यात या क्षेत्रात अधिक काम करण्याचा तिचा प्लॅन आहे. याशिवाय, तिने सशुल्क न्यूजलेटरच्या माध्यमातून ४९० पौंड कमावले. तिच्या न्यूजलेटरचे ४० हजारांहून अधिक वाचक असल्याचे तिने सांगितले.
मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स पदवी घेतलेली अदिती काही स्टार्टअप संस्थापक मित्रांना कन्सल्टिंग सेवा देखील देते. या माध्यमातून तिने सुमारे ५ हजार पौंड (सुमारे ६.३ लाख रुपये) कमावले. तसेच सार्वजनिक व्याख्याने आणि कार्यशाळांमधून तिने ९,५०० पौंड कमाई केली. काही कार्यक्रम विनामूल्य तर काही सशुल्क असल्याचे तिने सांगितले.
अदितीने UGC (User Generated Content) तयार करून १०,००० पौंडांची कमाई केली. या प्रकारात कंटेंट क्रिएटर एखाद्या ब्रँडसाठी व्हिडिओ किंवा पोस्ट तयार करतो, मात्र तो स्वतःच्या अकाउंटवर न टाकता ब्रँडच्या अधिकृत पेजवर प्रकाशित केला जातो. मात्र, तिच्या सर्वाधिक कमाईचा स्रोत ब्रँड डील्स ठरल्या. या माध्यमातून तिने तब्बल २५,१०२ पौंड कमावले. "ही रक्कम अविश्वसनीय आहे," असे ती म्हणाली.
अदिती सध्या ब्रिटनमध्ये स्किल्ड वर्कर व्हिसावर आहे. त्यामुळे इतके अतिरिक्त काम करणे कायदेशीर आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यावर तिने स्पष्ट केले की, ब्रिटनच्या नियमांनुसार स्किल्ड वर्कर व्हिसाधारक व्यक्ती आपल्या प्रायोजित नोकरीसोबत आठवड्याला २० तासांपर्यंत अतिरिक्त काम किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकते. अदितीने सांगितले की, ती या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करते आणि अतिरिक्त कामाचा वेळ २० तासांच्या आतच ठेवते. अदितीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.