Stock Market Updates: जागतिक घडामोडींचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसताना दिसत असून, आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात इराणकडून जहाजांवर कारवाई झाल्याच्या वृत्तांमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला.
व्यापाराच्या सुरुवातीलाच BSE Sensex तब्बल 600 हून अधिक अंकांनी घसरला. सेन्सेक्स 665 अंकांनी कोसळत 77,851 च्या पातळीवर पोहोचला. तर Nifty 50 निर्देशांकही 211 अंकांनी घसरून 24,200 च्या खाली गेला आणि 24,178 वर व्यवहार करत होता.
मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स तुलनेने कमी घसरले आहेत. निफ्टी मिडकॅप निर्देशांकात सुमारे 0.29 टक्के तर स्मॉलकॅपमध्ये 0.11 टक्क्यांची घसरण झाली.
क्षेत्रनिहाय पाहिल्यास ऑटो क्षेत्रातील शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. खासगी बँका, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी विक्री झाली. मात्र फार्मा क्षेत्राने तुलनेने चांगली कामगिरी केली आणि काही प्रमाणात बाजाराला आधार दिला.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 एप्रिलला घोषित करण्यात आलेला युद्धविराम कायम राहील, असे सांगितले. मात्र इराणने पुढील चर्चेत सहभागी होण्यास नकार दिल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील अडथळ्यांमुळे जागतिक महागाई आणि आर्थिक वाढीबाबत चिंता वाढत आहे.
आशियाई बाजारातही अस्थिरता दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक सुरुवातीला वाढला होता, मात्र नंतर तो घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक मात्र वाढीसह बंद झाला.
अमेरिकन बाजारांनी मात्र सकारात्मक कामगिरी केली. एसअँडपी 500 आणि नॅस्डॅक निर्देशांक विक्रमी उच्चांक गाठत वाढीसह बंद झाले. डाऊ जोन्समध्येही वाढ झाली.
कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर कायम आहे. पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे तेल बाजारात तणाव कायम आहे. दुसरीकडे सोन्या आणि चांदीच्या दरात मात्र किरकोळ घसरण झाली.
एकूणच, पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलातील वाढ आणि जागतिक अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.