अर्थवार्ता : एअर इंडियाचा तोटा २६,७९८ कोटींवर! इंधन दरवाढ आणि पश्चिम आशियातील संघर्षाचा विमान कंपनीला फटका Pudhari File Photo
अर्थभान

अर्थवार्ता : एअर इंडियाचा तोटा २६,७९८ कोटींवर! इंधन दरवाढ आणि पश्चिम आशियातील संघर्षाचा विमान कंपनीला फटका

पुढारी वृत्तसेवा

* सलग तीन आठवड्यांच्या तेजीला ब्रेक लागत भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. सेन्सेक्स आठवडाभरात 2.7 टक्क्यांनी म्हणजेच 2,035.20 अंकांनी घसरून 75,237.99 वर बंद झाला, तर निफ्टी 2.2 टक्क्यांनी म्हणजेच 504.60 अंकांनी घसरून 22,843.50 वर स्थिरावला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FPI) मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने गुंतवणूकदारांची संपत्ती 13 लाख कोटी रुपयांनी घटून एकूण बाजार भांडवल 406.91 लाख कोटी रुपयांवर आले.

* अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने प्रथमच 96 चा स्तर ओलांडत 95.97 प्रति डॉलरवर बंदभाव नोंदवला. शुक्रवारी दिवसभरात रुपया 96.14 पर्यंत घसरला होता. कच्च्या तेलाच्या किमती 109.64 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्याने चलन बाजारावर दबाव वाढला. फेब्रुवारीअखेरपासून रुपयात सुमारे 5.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशियाई चलनांमध्ये भारतीय रुपयाची सर्वाधिक कमजोरी दिसून आल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. या परिस्थितीमुळे व FII ने बाजारातून पैसे काढून घेतल्याने 8 मे रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात देशाची परकीय गंगाजळी 6.295 अब्ज डॉलरने वाढून 696.988 अब्ज डॉलरवर पोहोचली, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली. यामध्ये परकीय चलन मालमत्ता 562 दशलक्ष डॉलरने वाढून 552.387 अब्ज डॉलरवर गेली. सोन्याच्या साठ्यात सर्वाधिक 5.637 अब्ज डॉलरची वाढ झाली असून तो 120.853 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील विशेष आहरण हक्क (SDR) 84 दशलक्ष डॉलरने वाढून 18.873 अब्ज डॉलरवर गेले. तसेच आयएमएफमधील भारताची राखीव स्थिती 12 दशलक्ष डॉलरने वाढून 4.875 अब्ज डॉलरवर नोंदवली गेली.

* महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी टाटा ट्रस्टस्च्या 16 मे रोजी होणार्‍या विश्वस्त मंडळ बैठकीला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमाच्या कलम 36अ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला. ट्रस्टविरोधातील तक्रारींची चौकशी पूर्ण होईपर्यंत बैठक घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात माजी विश्वस्त वेणू श्रीनिवासन आणि अन्य तक्रारदारांनी नियमभंगाचे आरोप केले आहेत. चौकशी अहवाल सादर होईपर्यंत पुढील प्रक्रिया थांबवली आहे.

* एप्रिल महिन्यात भारताची वस्तू निर्यात 13.7 टक्क्यांनी वाढून 43.5 अब्ज डॉलरवर पोहोचली. याच कालावधीत आयात 10 टक्क्यांनी वाढून 71.9 अब्ज डॉलर झाली. त्यामुळे व्यापार तूट 28.3 अब्ज डॉलरवर नोंदली गेली, जी तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. पेट्रोलियम उत्पादन निर्यात 34.66 टक्क्यांनी वाढून 9.6 अब्ज डॉलरवर पोहोचली. इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 40.3 टक्के वाढून 5.1 अब्ज डॉलर झाली, तर अभियांत्रिकी वस्तू निर्यात 8.76 टक्के वाढून 10.3 अब्ज डॉलरवर नोंदली गेली.

* चार वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेल दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 94.77 रुपयांवरून 97.77 रुपये प्रति लिटर झाला, तर डिझेल 87.67 रुपयांवरून 90.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. सीएनजी दरातही प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली असून दिल्लीतील दर 79.09 रुपये प्रति किलो झाला आहे. तेल कंपन्यांना दररोज सुमारे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. विश्लेषकांच्या मते, या दरवाढीमुळे किरकोळ महागाईत 12 ते 20 बेसिस पॉइंटस्ची वाढ होऊ शकते.

* केंद्र सरकारने शुल्कमुक्त सोन्याच्या आयातीवर 100 किलोची मर्यादा लागू केली आहे. अ‍ॅडव्हान्स ऑथोरायझेशन योजनेअंतर्गत पूर्वी अमर्यादित सोने आयात करता येत होते. आयात शुल्क वाढल्यानंतर गैरवापर टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. नव्या नियमांनुसार आयात केलेल्या सोन्याची ठरावीक कालावधीत निर्यात करणे बंधनकारक राहणार आहे. शुल्कवाढीनंतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली.

* एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दर 8.3 टक्क्यांवर पोहोचला असून हा 42 महिन्यांतील उच्चांक आहे. मार्चमध्ये हा दर 3.88 टक्के होता. इंधन आणि वीज विभागातील महागाई 24.71 टक्क्यांवर पोहोचली, जी मार्चमध्ये उणे 3.85 टक्के होती. अन्नपदार्थ महागाई 2.31 टक्क्यांवर नोंदली गेली. उत्पादन क्षेत्रातील महागाई 4.62 टक्के झाली असून रसायने, धातू आणि वस्त्रोद्योगातील किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

* एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 3.48 टक्क्यांवर पोहोचला असून मार्चमध्ये तो 3.40 टक्के होता. अन्न महागाई दर 4.2 टक्क्यांवर गेला असून फळे, भाज्या आणि मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. कोअर महागाई दर 3.31 टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. ग्रामीण भागातील महागाई 3.74 टक्के तर शहरी भागातील महागाई 3.16 टक्के नोंदवली गेली. रिझर्व्ह बँकेच्या 4 टक्के नियंत्रण रेषेखाली खाली सलग 15 व्या महिन्यात किरकोळ महागाई दर राहिला आहे.

* एअर इंडियाचा 2025-26 आर्थिक वर्षातील तोटा 2.8 अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे 26,798 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे समोर आले आहे. कंपनीचे एकूण कर्ज 22,000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम आशियातील संघर्ष, वाढलेले इंधन दर आणि पाकिस्तान हवाई क्षेत्र बंद राहिल्यामुळे विमान कंपनीच्या खर्चात मोठी वाढ झाली. सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडियामध्ये 25 टक्के हिस्सा कायम ठेवत गुंतवणूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विमान विलंब आणि इंजिन देखभाल खर्चामुळेही कंपनीवर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

* केंद्र मंत्रिमंडळाने कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठी 37,500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळसा गॅसिफिकेशन क्षमता उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सरकारकडून प्रकल्पांच्या भांडवली खर्चाच्या 20 टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार असून एका प्रकल्पासाठी कमाल 5,000 कोटी रुपयांची मर्यादा असेल. या क्षेत्रात 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या देशाच्या एलएनजी गरजेपैकी सुमारे 50 टक्के आयात केली जाते, तर अमोनियाची आयात 100 टक्के आहे.

* टोयोटा किर्लोस्कर मोटर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात नवीन उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून सुमारे 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे उद्योग सूत्रांनी सांगितले. प्रकल्पाचे उत्पादन

2029 च्या पहिल्या सहामाहीत सुरू होण्याची शक्यता आहे. प्रारंभी या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 1 लाख वाहनांची असेल आणि सुमारे 2,800 रोजगार निर्माण होणार आहेत. टोयोटाच्या भारतातील हा तिसरा उत्पादन प्रकल्प असणार असून कंपनीची एकूण उत्पादन क्षमता 4.32 लाख वाहनांपर्यंत वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT