चौदा ऑगस्टपासून सुरू झालेली भारतीय बाजारातील धुवांधार तेजी 4 सप्टेंबरपासून ओसरण्यास सुरुवात झाली आणि शुक्रवारच्या वैश्विक Sell-off मध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सनेही अलीकडच्या काळातील तळ गाठला. चौदा दिवसांत 1140 पॉईंटस् वाढलेला निफ्टी अखेरच्या तीन दिवसांत 427 पॉईंटस् घसरला आणि 25000 च्या खाली 24,852 वर कसाबसा स्थिरावला. शुक्रवारीच 24801.30 चा नीचांक त्याने गाठला होता तेव्हा 24800 ची पातळी निफ्टीने राखली. हेच महत्त्वाचे सेन्सेक्सही 81000 च्या खाली 80981 पर्यंत घसरून अखेरीस 81183 म्हणजे 81000 च्या वर टिकून राहिला आहे.
सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 कंपन्यांचे शेअर्स गेल्या आठवड्यात मंदीत बंद झाले, तर 10 शेअर्स तेजीत राहिले. एशियन पेंटस् (3274.50), बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स अनुक्रमे पावणे पाच टक्के आणि सव्वा चार टक्के वाढले, तर टायटनचा शेअर साडेतीन टक्क्यांनी वाढला. मंदीवाल्यांचे नेतृत्व टाटा मोटर्स आणि एनटीपीसी यांनी केले. दोन्हीही शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक कोसळले. त्यांना महिंद्र आणि महिंद्र, एलटी, भारती एअरटेल, रिलायन्स, पॉवर ग्रीड यांनी साथ दिली.
शुक्रवारच्या बाजार घसरणीला चार गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. त्यांपैकी एक होती SBI च्या शेअर्समधील घसरण, सव्वाचार टक्के हा शेअर घसरला कारण होते. गोल्डमन सॅकसने बँकेचे पतमानांकन Sell असे केले आणि Target Price ही पूर्वीची रु.841 ने कमी करून रु.742 इतकी म्हणजे 12 टक्के कमी केली. गोल्डमन सॅकस्च्या मते बँकेची आर्थिक वाढ पर्याप्त झाली आहे आणि इथून पुढे आणखी आर्थिक प्रगती करणे बँकेला जड जाणार आहे. देशाच्या प्रमुख बँकेवर जेव्हा एका आंतरराष्ट्रीय विख्यात कंपनीकडून असा नकारात्मक अहवाल येतो तेव्हा देशाच्या एकूणच बँकिंग आणि फायनान्स सेक्टरवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि कोणत्याही देशाचे फायनान्स सेक्टर हे त्या देशाच्या प्रगतीचे किंवा अधोगतीचे मोजमाप ठरत असते.
बाजार अधोगतीचे दुसरे कारण म्हणजे, सेबी आणि सेबीप्रमुख यांच्या बाबतीत गेले काही दिवस उठलेला गदारोळ. आता तर सेबी प्रमुख माधवी बूच यांच्यावर चौकशी आयोग नेमला जाण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी एक अभूतपूर्व घटना घडली. सेबीच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर सेबीच्या अधिकार्यांनी निदर्शने केली. त्यांनी याबाबत अर्थमंत्रालयाला एक पत्रही लिहिले. त्यामध्ये दोन आरोप करण्यात आले आहेत. पहिला आहे, अवास्तव KRA Targets चा. यापुढे कार्यालयीन कामाची गुणवत्ता खालावली आहे आणि कर्मचार्यांमध्ये कमालीचा ताण आला आहे. दुसरा आरोप आहे, सेबीच्या Higher Authorities कडून कर्मचार्यांवर दाखविण्यात येणारा अविश्वास आणि त्यांचा होत असलेला अनादर याबाबत.
मागील दोन आठवडे बाजारात जी तेजी आली होती ती अमेरिकेतील आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे, तिथे व्याज दर कमी होण्याचे संकेत मिळाल्यामुळे; परंतु जॉबलेस क्लेमस्चे वर खाली होणारे आकडे आणि त्यामुळे व्याज दर कमी होण्याबाबत वेळोवेळी उद्भवणारी सांशकता यामुळे अमेरिकेतील बाजारात सतत हेलकावे येत असतात. त्यात आता भर पडली आहे ती एका चर्चेची आणि ती म्हणजे व्याज दर कमी करण्याबाबत फेडने अतिकठोरता दाखवली काय याची!
FIIS ने भारतीय बाजारात पुन्हा खरेदीस प्रारंभ केला, ही भारतीय बाजाराच्या द़ृष्टीने मोठीच सकारात्मक बाब आहे. सप्ताहातील पहिले तीन दिवस खरेदी आणि अखेरचे दोन दिवस विक्री ही FIIS ची सप्ताहातील कामगिरी राहिली आहे. DIIS नी मात्र पूर्ण सप्ताह खरेदी केली.
Pharma, Consumption आणि FMCG ही तीन सेक्टर्स येणारा काही काळ भारतीय बाजारांना तेजी दाखवतील, असे निर्देश बाजारांकडून मिळत आहेत. फार्मामध्ये सुरू असलेली तेजी अव्याहतपणे सुरू आहे. आयटी सेक्टरमधील तेजीला अमेरिकेतील Nvidia मध्ये आलेल्या घसरणीने झाकोळल्यामुळे हे सेक्टर पुन्हा Negative झाले.
व्हॅल्यूएशन्स रिझनेबल होण्याच्या द़ृष्टिकोनातून अशी Healthy Corrections आवश्यक असतात, तरीही जोपर्यंत तेजीचे ठोस संकेत मिळत नाहीत तोवर गुंतवणूकदारांनी किंवा ट्रेडर्सनी Heavy Trades टाळावेत.