Mercor Founders: शाळेत शिकणाऱ्या तीन मित्रांनी आता इतिहास रचला आहे. वयाच्या केवळ 22 व्या वर्षी ‘Mercor’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित रिक्रुटिंग स्टार्टअपचे संस्थापक ब्रेंडन फूडी, आदर्श हिरेमठ आणि सूर्य मिधा हे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश (self-made billionaires) बनले आहेत. त्यांनी 2008 मध्ये 23 व्या वर्षी अब्जाधीश झालेल्या मार्क झुकरबर्गचा विक्रम मोडला आहे.
‘Mercor’ या सॅन फ्रान्सिस्कोस्थित स्टार्टअपने नुकतेच डॉलर 350 दशलक्ष (सुमारे ₹2,900 कोटी) इतके फंडिंग उभारले असून कंपनीचे एकूण मूल्यांकन आता डॉलर 10 अब्ज (सुमारे ₹83,000 कोटी) इतके झाले आहे. या फंडिंगनंतर CEO ब्रेंडन फूडी, CTO आदर्श हिरेमठ आणि बोर्ड चेअरमन सूर्य मिधा या तिघांनीही अब्जाधीशांच्या यादीत एन्ट्री केली आहे.
‘Forbes’च्या अहवालानुसार, Mercor ही कंपनी जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने रिक्रुटमेंट प्रक्रिया सोपी करते. या यशामुळे हे तिघे तरुण आता तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित उद्योजकांच्या यादीत सामील झाले आहेत.
ब्रेंडन फूडी, आदर्श हिरेमठ आणि सूर्य मिधा हे तिघे कॅलिफोर्नियातील बेलारमाइन कॉलेज प्रिपरेटरी या शाळेत एकत्र शिकले. हिरेमठ आणि मिधा हे दोघे शाळेतील डिबेट टीममध्ये होते आणि त्यांनी एकाच वर्षी अमेरिकेतील तीनही राष्ट्रीय वादविवाद स्पर्धा जिंकून इतिहास रचला होता.
यानंतर हिरेमठने हार्वर्ड विद्यापीठात संगणकशास्त्र शिकायला सुरुवात केली, तर सूर्य मिधा आणि ब्रेंडन फूडी हे दोघे जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये फॉरेन स्टडीज आणि इकॉनॉमिक्स शिकत होते. मात्र, स्टार्टअपसाठी तिघांनीही शिक्षण अर्धवट सोडून ‘Mercor’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
‘Mercor’चे दोन सहसंस्थापक भारतीय वंशाचे आहेत. सूर्य मिधा हे दुसऱ्या पिढीचे भारतीय-अमेरिकन असून त्यांच्या पालकांनी नवी दिल्लीहून अमेरिकेत स्थलांतर केलं होतं. “माझं जन्म माउंटन व्ह्यू येथे झाला आणि मी सॅन होजे येथे वाढलो,” असं सूर्य मिधा यांनी त्यांच्या वेबसाइटवर सांगितलं आहे.
आदर्श हिरेमठ हे सुद्धा भारतीय-अमेरिकन असून त्यांनी हार्वर्डमध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यांनी सांगितलं, “जर मी Mercor वर काम करत नसतो, तर काही महिन्यांपूर्वीच कॉलेजमधून पदवी घेतली असती. पण माझं आयुष्य काही महिन्यांत 180 डिग्रीने बदललं.”
‘Mercor’ ही AI-आधारित कंपनी आहे जी कंपन्यांसाठी रिक्रुटमेंट आणि हायरिंग प्रोसेसेस तयार करते. म्हणजेच, जगभरातील उमेदवार आणि नोकरी देणाऱ्या कंपन्यांमधील दुवा म्हणून ही कंपनी काम करते. हिरेमठच्या म्हणण्यानुसार, “21व्या शतकातील सर्वात मोठं संधीचं क्षेत्र म्हणजे ‘लेबर अॅग्रीगेशन’ आणि Mercor त्याच दिशेने पुढे जात आहे.”