अर्थभान

ITR Refund : आयकर परतावा अजूनही मिळाला नाही? रिफंड मिळण्यास विलंब का होतो, ‘ही’ असू शकतात कारणे

स्टेटस कसे तपासावे?... बहुसंख्य लोक अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे बँक खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर रोजी संपली आहे. ज्या करदात्यांनी वेळेत आपले रिटर्न भरले आहेत, त्यापैकी अनेकजण आता आयकर परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांना परतावा मिळाला असला, तरी बहुसंख्य लोक अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे बँक खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत.

साधारणपणे, आयटीआर ई-व्हेरिफाय केल्यानंतर एका आठवड्याच्या आत रिफंडची रक्कम खात्यात जमा होते. काही प्रकरणांमध्ये तर 2 ते 3 दिवसांतही परतावा मिळाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, जर तुमचाही परतावा येणे बाकी असेल आणि तो अद्याप जमा झाला नसेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे.

परतावा मिळायला किती वेळ लागतो?

जेव्हा तुम्ही तुमचा आयकर रिटर्न ई-व्हेरिफाय करता, तेव्हा आयकर विभागाकडून प्रक्रिया सुरू होते. बहुतेक प्रकरणांमध्ये, आयटीआर भरल्यानंतर 4 ते 5 आठवड्यांत परतावा बँक खात्यात येतो. परंतु, जर तुमचा रिटर्न साधा असेल आणि सर्व माहिती (उदा. AIS, TIS, फॉर्म 26AS) जुळत असेल, तर परतावा एका आठवड्यातही मिळू शकतो. मात्र, जर तुमच्या रिटर्नमध्ये व्यावसायिक उत्पन्न, भांडवली नफा (Capital Gain) किंवा अनेक प्रकारच्या कपाती (Deduction) असतील, तर प्रक्रियेला दोन ते चार आठवडे लागू शकतात.

रिफंड अडकण्याची प्रमुख कारणे

आयकर विभागाकडून परतावा मिळण्यास उशीर होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत :

  • बँक खाते प्री-व्हॅलिडेटेड नसणे : आता रिफंड मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आयकर पोर्टलवर प्री-व्हॅलिडेटेड असणे अनिवार्य आहे.

  • नावात तफावत : तुमच्या बँक खात्यातील नाव आणि पॅन कार्डवरील नाव जुळत नसल्यास परतावा अडकू शकतो.

  • चुकीचा IFSC कोड : आयटीआर फॉर्ममध्ये बँक खात्याचा IFSC कोड चुकीचा नमूद करणे.

  • बँक खाते बंद असणे : तुम्ही दिलेले बँक खाते बंद झाले असल्यास परतावा जमा होणार नाही.

  • पॅन-आधार लिंक नसणे : तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसल्यास रिफंड प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

रिफंड स्टेटस कसे तपासावे?

तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईटवर तुमच्या रिफंडचे स्टेटस सहज तपासू शकता. यासाठी खालील प्रक्रिया वापरा :

1) सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट incometax.gov.in वर जा.

2) तुमचा पॅन क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. (जर तुम्ही सीए किंवा इतर कोणाच्या मदतीने रिटर्न भरला असेल, तर त्यांच्याकडून पासवर्ड घ्या.)

3) लॉग इन केल्यानंतर, वरच्या मेनूमधील e-file टॅबवर जा.

4) येथे खपलेाश Income Tax Returns या पर्यायावर क्लिक करून View File Returns निवडा.

यानंतर तुम्हाला तुमच्या रिटर्नची सद्यस्थिती आणि रिफंड स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

मोठ्या रकमेचा रिफंड आणि व्याज

  • परताव्याच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. तुमचा रिफंड 50,000 रुपयांपेक्षा जास्त असला, तरी तो सामान्य प्रक्रियेनुसारच मिळतो. तथापि, मोठ्या रकमेच्या परताव्याची विभागाकडून अतिरिक्त तपासणी केली जाते, ज्यामुळे थोडा विलंब होऊ शकतो.

  • विशेष म्हणजे, जर तुमच्या परताव्याला उशीर झाला, तर आयकर विभाग त्या रकमेवर दरमहा 0.5 टक्के दराने व्याजदेखील देतो. त्यामुळे, तुमचा परतावा योग्य असेल तर तो व्याजासह तुम्हाला मिळेल, याची खात्री बाळगा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT