रिटर्न भरताना सर्व स्रोतांची माहिती द्या (Pudhari File Photo)
अर्थभान

Income Tax Return Filing | रिटर्न भरताना सर्व स्रोतांची माहिती द्या

आयटीआर भरताना उत्पन्नांच्या सर्व स्रोतांचे विवरण भरणे गरजेचे आहे.

पुढारी वृत्तसेवा

आयटीआर भरताना उत्पन्नांच्या सर्व स्रोतांचे विवरण भरणे गरजेचे आहे. काहीवेळा कायद्याची माहिती नसल्याने किंवा निष्काळजीपणामुळे काही स्रोतांचा उल्लेख करणे राहून जाते. परंतु, आयटीआरमध्ये सर्व स्रोतांचा समावेश करायला हवा.

यंदा प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. मात्र, प्राप्तिकर विवरण लवकरात लवकर दाखल करणे हिताचे राहते. अर्थात, आयटीआर भरताना सर्व प्रकारच्या स्रोतांचा उल्लेख करायला हवा. मग उत्पन्न कोणत्याही प्रकारचे असो किंवा कितीही कमी असो. कारण बहुतांश मंडळी व्याजातून झालेले उत्पन्न किंवा अन्य स्रोतांतून मिळालेली रक्कम रिटर्नमध्ये दाखवत नाही.

बचत खाते आणि एफडीवरील व्याज

आयटीआर भरताना नोकरदार व्यक्ती सामान्यपणे केवळ उत्पन्न म्हणून वेतनाचाच उल्लेख करतात. किंवा चार्टर्ड अकाऊंटंटला फॉर्म 16 देऊन निश्चिंत होतात. यावेळी फॉर्म 16 मध्ये बचत खात्यावरील व्याजाचा उल्लेख असतोच असे नाही. कारण काही नोकरदार बचत खात्यावरील व्याज पूर्णपणे करमुक्त असल्याचे गृहित धरतात. शिवाय मुदत ठेवीवरील व्याजावर अगोदरच कर भरलेला असतो आणि मग पुन्हा त्याचा उल्लेख कशाला करायचा, असे म्हणून एफडीच्या व्याजाचा उल्लेख केला जात नाही. अर्थात, बचत खात्यावरील व्याज कलम 80 टीटीए/80 टीटीबीनुसार कपातीस पात्र आहे. तरीही बचत खात्यावरील व्याजाची रक्कम ही कपातीच्या रकमेपेक्षा कमी उपलब्ध असेल तर त्यास आपल्या उत्पन्नात सामील करावे लागेल आणि नंतर कलम 80 टीटीए/80 टीटीबीनुसार कपातीचा दावा करावा लागेल.

बचत खात्यात वर्षभरात जमा केलेल्या एकूण व्याजाचे विवरण आता एआयएस (अ‍ॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट) मध्ये उपलब्ध आहे. तुुम्ही जर नवीन व्यवस्था निवडत असाल तर कोणतीही कपात मिळत नाही, हे लक्षात ठेवा आणि बचत खात्याचे संपूर्ण व्याज हे करपात्र आहे. याप्रमाणे मुदत ठेवीच्या व्याजावर कर आकारला जाऊ शकतो. मात्र, टीडीएसचा दर आणि तुम्हाला लागू असलेला स्टॅक्स स्लॅबचा दर वेगळा राहू शकतो. या व्याजाला तुमच्या उत्पन्नात सामील करावे लागेल आणि उर्वरित कराचा भरणा करावा लागेल. कर अधिक कापला गेला असेल तर रिफंडसाठी दावा करावा लागेल. उदा. कर दहा टक्क्यांनी कापला गेला असेल अणि तुमचा स्लॅब दर कमी किंवा अधिक असू शकतो. अशावेळी फरकातून आकारला जाणारा कर भरावा लागेल. एवढेच नाही तुम्ही रिफंडचे दावेदार असाल तरीही मुदत ठेवीच्या व्याजाला उत्पन्नाशी सामील करावे लागेल.

मुदत ठेवीचे नूतनीकरण झाले असेल आणि मॅच्योरिटीचा रक्कम ही काहीवेळा खात्यात दिसत नाही. अशावेळी नूतनीकरण केलेल्या मुदत ठेवीचे व्याज प्राप्तिकरात सामील करण्याचे राहून जाऊ शकते; पण हे चुकीचे आहे. व्याजाचे उत्पन्न हे उत्पन्नाचे स्रोत (अर्निंग बेसिस) म्हणून दाखविले जात असेल, तर मागच्या वर्षी खरेदी केलेल्या ‘एनएससी’वर मिळालेल्या व्याजासकट दीर्घकालीन मुदत ठेवीच्या एकूण व्याजाला देखील आपल्या आयटीआरमध्ये दाखवावे लागेल.

स्विचिंगमुळे कॅपिटल गेन

एकाच फंड हाऊसच्या एका योजनेतून दुसर्‍या योजनेत युनिट केल्यास कायद्यानुसार त्यास प्रसंगी करपात्र स्थानांतर मानले जाते. एकाच फंड हाऊसच्या योजनेत अशा प्रकारचे स्विचिंग बँक स्टेटमेंटमध्ये दिसत नाही. परिणामी, अशा स्विचिंगने होणारा कोणताही लाभ किंवा नुकसान आयटीआरमध्ये भरण्याचे राहून जाते. स्विचिंगचा निर्णय हा कोणत्याही योजनाची खराब कामगिरी किंवा सिस्टेमॅटिक ट्रान्सफरमुळे होऊ शकतो. योजनेतील स्विचिंगने होणारा फायदा किंवा नुकसान हे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते आणि त्यासाठी वेगवेगळी कर आकारणीची तरतूद आहे. डेट फंड आणि इक्विटी ओरिएंटेड फंडसाठीदेखील कर आकारणी वेगळी राहू शकते. अशा प्रकारच्या स्विचिंगच्या व्यवहारावर होणारे नुकसान किंवा फायदा योग्य रितीने मांडायला हवे. म्युच्युअल फंडच्या व्यवहाराचे विवरण ‘एआयएस’शी पडताळून पाहावे आणि त्यात कोणताही फरक असेल तर दुरुस्तीसाठी प्राप्तिकर विभागाला कळवावे.

अल्पवयीन मुलाचे उत्पन्न

अल्पवयीन मुलाच्या खात्यावर जमा झालेले सर्व निष्क्रिय उत्पन्न अधिक उत्पन्न असणार्‍या पालकाच्या (आई किंवा वडील) उत्पन्नाला जोडून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलापोटी दीड हजार रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. त्यामुळे प्रत्येक अल्पवयीन मुलांचे दीड हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर ते तुमच्या उत्पन्नाशी जोडून घ्यावे लागेल. तुमचे उत्पन्न हे अल्पवयीन मुलांच्या नावाने सादर करण्याची गरज नाही. कारण अल्पवयीन मुलांच्या नावावर असलेले उत्पन्न करपात्र असते.

भेटवस्तू किंवा अन्य फायदा

सध्या व्यवसायाला चालना देण्याचे युग असून, त्यात केवळ ग्राहकांनाच नाही तर व्यावसायिक भागिदारांना सवलत आणि भेटवस्तू दिली जाते. तुमच्यापैकी काही जणांना व्यावसायिक सहकार्‍यांकडून मौल्यवान भेट मिळाल्या असतील. यापैकी काही जणांनी पुरस्कृत परदेश दौर्‍याचा आनंदही घेतला असेल. अशा प्रकारचा प्रवास आणि वस्तू करपात्र आहेत. परंतु, ते आपल्या खात्यात दिसत नाहीत आणि त्याची नोंद होत नाही. अशा प्रकारच्या लाभाचा आयटीआरमध्ये समावेश करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT