आयकर रिटर्न भरणे Pudhari File Photo
अर्थभान

आयकर : पहिल्यांदा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना...

पहिल्यांदा आयकर रिटर्न भरताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

पुढारी वृत्तसेवा

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे आणि जवळ येत आहे. तुम्ही पहिल्यांदाच रिटर्न भरणार असाल, तर काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम 31 जुलैपर्यंत रिटर्न भरल्यास तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागणार नाही. हे आयकर विवरणपत्र भरताना खालील बाबी लक्षात घ्या.

एकूण करपात्र उत्पन्न

आयकर कायद्यांतर्गत पगारासह सर्व स्रोतांमधून तुम्ही कमावलेल्या एकूण उत्पन्नातून स्टँडर्ड डिडक्शन आणि भविष्य निर्वाह निधीसारख्या योजनांमधील गुंतवणुकीद्वारे होणारी वजावट कमी केली जाते. त्यानंतर उरलेले उत्पन्न हे करपात्र उत्पन्न असते.

आयकर प्रणाली

भारतात सध्या दोन आयकर प्रणाली कार्यरत आहेत : जुनी आणि नवीन. 2020 मध्ये नवीन प्रणाली आणली गेली, ज्यामध्ये आयकर दर भिन्न आहेत आणि सवलतीचे दरदेखील भिन्न आहेत; परंतु यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वजावटी आणि सवलती उपलब्ध नाहीत. रिटर्न भरताना तुम्हाला कोणती प्रणाली निवडायची आहे हे तुम्ही सूचित केले नाही, तर तुम्हाला थेट नवीन प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येते म्हणून प्रथम दोन्ही प्रणालींचे फायदे आणि तोटे समजून घ्या आणि नंतर त्यापैकी एक निवडा.

फॉर्म 26 एएस तपासा : तुमच्या संपूर्ण उत्पन्नाचा संपूर्ण तपशील आणि त्यावर कापलेला टीडीएस हा या फॉर्ममध्ये दिलेला असतो. कर आणि रिटर्न अचूकपणे भरण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

अ‍ॅन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट : यामध्ये व्याज, लाभांश, शेअर डीलमधून मिळणारे उत्पन्न आणि परदेशातून मिळालेले पैसे यांचा संपूर्ण तपशील असतो. हे सर्व तुमच्या रिटर्नमध्ये आधीच भरलेले असते.

प्राप्तिकर विभाग दरवर्षी करदात्यांच्या विविध श्रेणींसाठी वेगवेगळे रिटर्न फॉर्म जारी करतो. यातील योग्य फॉर्म हुशारीने निवडा.

योग्य कपातीचा दावा करणे : आयकर कायद्याच्या कलम 80 सी (रु. 1.5 लाखांपर्यंतची वजावट), 80 डी (आरोग्य विमा), 80 टीटीए (देणगी)अंतर्गत मिळणार्‍या वजावटी तुमचे करपात्र उत्पन्न कमी करतात आणि तुमचे करदायित्वदेखील कमी करतात म्हणून रिटर्न भरताना सर्व प्रकारच्या वजावटी आणि सवलतींचा दावा करा.

वेळेवर भरा : आयकर विवरणपत्र वेळेवर भरले नाही, तर तुम्हाला दंड आणि व्याज भरावे लागू शकते. रिटर्न भरण्याची अंतिम तारीख साधारणपणे 31 जुलै असते. तरीही, तारीख बदलली आहे किंवा वाढवली आहे का हे पाहण्यासाठी कृपया आयकर विभागाची वेबसाईट तपासावी.

ई-फायलिंग फायदेशीर आहे : आयकर विभाग स्वतःच्या पोर्टलद्वारे ई-फायलिंगला प्रोत्साहन देतो. ही प्रक्रिया अत्यंत सोयीस्कर आहे आणि यामध्ये चुकांना वावही कमी होतो. प्रथमच रिटर्न भरत असताना तुम्ही पोर्टलवर तुमचे खाते उघडू शकता आणि नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून स्वतः रिटर्न सबमिट करू शकता.

पडताळणी विसरू नका : इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. तुम्ही आधारवर वनटाईम पासवर्ड मागवू शकता, नेट बँकिंग वापरू शकता किंवा आयटीआयव्हीच्या प्रतीवर स्वाक्षरी करू शकता आणि सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर, बंगळूर येथे पाठवू शकता.

आवश्यक कागदपत्रे

तुम्ही रिटर्न भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी सर्व आवश्यक आर्थिक कागदपत्रे तुमच्याकडे ठेवा. तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या कार्यालयातून मिळालेला फॉर्म 16 सर्वात महत्त्वाचा आहे. याखेरीज तुमच्याकडे तुमचे बँक स्टेटमेंट असले पाहिजे. कर वाचवण्याच्या उद्देशाने जी काही गुंतवणूक केली आहे, त्याचे पुरावेही गरजेचे आहेत. तुम्ही भाडे भत्त्यावर सूट मिळण्याचा दावा करत असल्यास, भाडे पावती जपून ठेवा. जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर त्याच्या व्याजावरील वजावटीसाठी कर्ज विवरणपत्र आवश्यक आहे. याखेरीज पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT