अर्थभान

भरघोस सवलतींचा अर्थसंकल्प शक्य | पुढारी

Pudhari News

अर्थसंकल्पाची 1 फेब्रुवारीची तारीख जशी जवळ येत चालली आहे तशी त्याबाबतच्या अनेक तर्कांची आता प्रसिद्धी सुरू आहे. हा अर्थसंकल्प घरघोस सवलतीचा असेल अशी अपेक्षा आहे. कॉर्पोरेटकर एक वा दोन टक्क्याने कमी होईल किंवा कंपन्यांना द्यावा लाणारा लाभांश वितरण कर काढून टाकला जाईल असा अंदाज आहे. सध्या हा कर 12.5 टक्के आहे. तो काढला तर कंपन्या तेवढा जास्त लाभांश देऊ शकतील. त्यामुळे जास्त लाभांश देऊ शकणार्‍या कंपन्यांचे शेअर्स अर्थसंकल्पानंतर वर जातील. 1 फेब्रुवारीपर्यंत ज्या कंपन्यांचे डिसेंबर 2017 तिमाहीचे आकडे प्रसिद्ध होतील त्यातील ज्यांचे आकडे विक्री वा नफा दाखवणारे असतील ते शेअर्स वर चढतील. जिंदाल सॉपाईप्स, जिंदाल स्टील, जिंदाल स्टेनलेस स्टील, टाटा स्टील, कल्याणी स्टील, किर्लोस्कर फेरस या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी सध्या त्याद‍ृष्टीने करावी.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने फुटकळ एकच ब्रँड असलेल्या कंपन्यांत 100 टक्के विदेशी भांडवल असायला परवानगी दिली आहे. मार्क अँट सेन्सर, आयडिया अशा कंपन्यांना त्यामुळे भारताचे दरवाजे उघडतील. आयडियाने हैद्राबाद इथे विक्री केंद्र उघडण्यासाठी मोठी जागा दीड वर्षापूर्वीच विकत घेतली आहे. 

त्याचबरोबर एअर इंडिया या बुडणार्‍या कंपनीतही विदेशी भांडवल 49 टक्क्यांपर्यंत घालायला परवानगी दिली आहे. कदाचित सिंगापूर एअरलाईन्स वा जेट एअरवेज त्याबाबत विचार करू शकेल अन्यथा सरकारला इथे सारखे पैसे ओतावे लागतील. 

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (ढउड)चे डिसेंबर 2017 तिमाहीचे उत्पन्‍न 30904 कोटी रुपये होते. त्यावर 6931 कोटी रुपयांचा करोत्तर नफा झाला. अमेरिकेत श्री. ट्रंप यांनी कर कमी केल्याने, संगणकक्षेत्राला उभारी मिळेल असा विश्‍वास कंपनीने व्यक्‍त केला आहे. तरीही गुंतवणूकदारांनी संगणकक्षेत्रातील कंपन्यांपासून दूर रहावे. डॉलर-रुपया विनिमय दरही सुधारत असल्याने रुपयाचा दर 62 रुपयांपर्यंत खाली आला तर अमेरिकेतील भारतीय संगणक व्यवसायाला धक्‍का बसेल. 

सरकारचा 'मेक इन इंडिया'चा विस्तार पुढील महिन्यात होणार आहे. पाच वर्षासाठी काही क्षेत्रांबाबत पथ-नकाशा (ठेरव-चरि) काढण्याचे काम चालू आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांचे या तिमाहीचे आकडे लवकरच प्रसिद्ध होऊ लागतील. मोठ्या प्रमाणावर तरतुदी करून 2019 अखेर, बरीचशी अनार्जित कर्जे कमी करण्याचा त्याचा प्रयत्न राहील. पण इथे अजून गुंतवणूक हितावह ठरणार नाही. स्टेट बँक इंडियाची 265 मोठी बुडीत खाती आहेत. 77538 कोटी रुपये रक्‍कम त्यात अडकली आहे. खासगी क्षेत्रातील इडुसिंड बँकेचे डिसेंबर 2017 तिमाहीचे आकडे उत्तम आहे. तिचे एकूण उत्पन्‍न 5473.54 कोटी रुपये झाले. करोत्तर नफा 936.25 कोटी रुपये होता. डिसेंबर अखेरच्या नऊ महिन्यांचे उत्पन्‍न 16172.33 कोटी रुपये होते व नक्‍त नफा 4046.84 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे 15.42 रुपये व 44.31 रुपये होते. शेअरचा भाव गेल्या शुक्रवारी 1710 रुपये होता. इथे गुंतवणूक करणार्‍यांना वर्षभरात 1600 रुपयांचा भाव दिसू शकेल. खासगी क्षेत्रातली ही क्रमांक एकवरील बँक आहे. सध्याच्या काळात किं/उ गुणोत्तर 28.5पट दिसते. 

गेल्या आठवड्यात एपी एल अपोलो ट्यूब्ज 2260 रुपयापर्यंत वाढला आहे. वर्षभरात तो 2600 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. जिंदाल समूहाचे सर्वच शेअर्स सध्या आघाडीवर आहे. ते वर्षभरासाठी घेऊन, राखून ठेवावेत. 

स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जासाठी आपली व्याप्ती वाढवित आहे. त्यासाठी ती 200000 कोटी रुपये रोखे विकून उभी करणार आहे. भारत सरकार परवडणार्‍या घरांसाठी जास्त क्रियाशील असल्याने, केवळ गृहवित्त देणार्‍या दिवाण हौसिंग फायनान्स, इंडिया हौसिंग फायनान्स व कॅनफिन होम्स हे शेअर्स जरूर घ्यावेत. सध्या 620 रुपयाला मिळणारा दिवाण हौसिंग फायनान्सचा शेअर वर्षभरात 820 रुपयांचा भाव दाखवू शकेल. 

श्री. सिमेंटसचा डिसेंबर 2017 तिमाहीचा करोत्तर नफा, डिसेंबर 2016 च्या तिमाहीच्या तुलनेत 42 टक्क्याने वाढला आहे. तो 333.33 कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत सर्वच सिमेंट कंपन्या चांगला नफा दाखवतील. खरेदीसाठी मात्र मध्यम गटातील इंडिया सिमेंटस्, मंगलम सिमेंटस् यांना प्राधान्य द्यावे.

डिसेंबर महिन्यात पॅसेंजर मोटारींची विक्री 22 टक्क्याने वाढली आहे. मारुती सुझुकी त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. हा शेअर सध्या 9408 रुपयांपर्यंत चढला आहे. गेल्या बारा महिन्यांतील किमान भाव 5642 रुपये होता. म्हणजे त्यात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मारुती आता गुंतवणूकदारांच्या प्राधान्य यादीत कायम हवा. वर्षभरात तो 25 टक्के नफा सहज देऊन जाऊ शकतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 38  पट दिसते. सध्या टायर कंपन्यांबद्दल  फारसे कुणी बोलत नसले तरी जे के टायर्स व अपोलो टायर्स सध्या घेतल्यास वर्षभरात 25 टक्के नफा देऊन जातील. मोटारीचा व्यवसाय जसा वाढेल तसा टायर कंपन्या व वाहनांचे सुटे भाग करणार्‍या कंपन्यांचे शेअर्सही वाढतील.

किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री
यावेळचा 'चकाकता हिरा' म्हणून किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे नाव घेता येईल. किर्लोस्कर समूहातील महाराष्ट्रातील ही एक जुनी फाऊंड्री आहे. तिची तुलना नेल कास्ट स्टील कास्ट अ‍ॅलीकॉन कास्ट अ‍ॅलॉय व जयस्वार नेको इंडस्ट्रीजशी करता येईल. किर्लोस्कर फेरस ही किर्लोस्कर ऑईल इंजिन्स आणि शिवाजी वर्क्सशी संबंधित आहे. कर्नाटकमधील कोप्पल आणि महाराष्ट्रातील सोलापूर इथे तिचे कारखाने आहेत. पीग आयर्नचे तिचे व्यावसायिक उत्पादन एका मिनीब्लास्ट भट्टीतून 1994 मध्ये सुरू झाले. तिथूनच ग्रे आयर्न कास्टिंगचे उत्पादन 1995 मध्ये सुरू झाले. भट्टीतील वाया जाणार्‍या गॅसवर चालणारे दोन ऊर्जा कारखाने अनुक्रमे1994 आणि 1997 मध्ये सुरू झाले. 2007 साली किर्लोस्कर फेरसने किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या सोलापूरच्या फाऊंड्रीचे आग्रहण केले. आता तिची एकूण उत्पादनक्षमता वर्षाला तीनही कारखान्यांची मिळून 5 लक्ष 23 हजार टन इतकी आहे. अतुल चंद्रकांत किर्लोस्कर हे तिचे ख्यातनाम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचा भाऊ राहुल किर्लोस्कर हे कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. किर्लोस्कर फेरसची माच 2017 मध्ये 1133 केाटी रुपयांची विक्री होती. नक्‍त नफा फक्‍त 49.3 कोटी रुपये होता. कंपनीच्या शेअरचा सध्या भाव 115 रुपये आहे. वर्षभरात तो 150 रुपयावर जावा. कंपनीची मार्च 2018 अखेरची विक्री1539 कोटी रुपये व्हावी. दोन वर्षांनी 2020 मार्चमध्ये हीच विक्री 1756 कोटी  रुपये व्हावी. 2020 साली तिचे किं/उ गुणोत्तर 10ः9 पट व्हावे. कंपनीने आत्तापर्यंत नफ्याच्या 30 टक्के लाभांश दिला आहे. कंपनीचे प्रवर्तक कंपनीतून काहीही पगार घेत नाहीत. कंपनीला दीर्घ मुदती कर्जे नाहीत. त्यामुळे 35 टक्केे  नफा मिळवण्यासाठी हा शेअर घ्यावा. 

                                                                                                                                                                                                                                                   – डॉ. वसंत पटवर्धन

SCROLL FOR NEXT