अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर
आयुष्यात सुख-समृद्धी, मान-सन्मान हवा असेल, तर आपली आर्थिक संपत्ती मजबूत हवी. त्यासाठी महत्त्वाचे आर्थिक निर्देशांक तुम्हाला समजून घ्यावे लागतील. हे निर्देशांक चांगले ठेवले तरच तुमचे आर्थिक भवितव्य उज्ज्वल ठरेल. जर तुमचे आर्थिक निर्देशांक घसरलेले असतील तर आर्थिक आरोग्य बिघडत जाईल. त्याचे परिणाम भविष्यात पैशाची कमतरता, गरिबी, आर्थिक कलह, उधारी-उसनवारी सारखे प्रसंग येतील.
शारीरिक संपत्ती आणि आरोग्य संपत्ती या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यांचा समतोल पाहण्यासाठी काही निर्देशांक पाहावे लागतात. शरीर संपत्ती कधी चांगले असते? उंचीनुसार वजन, ब्लड प्रेशर, रक्तातील हिमोग्लोबिन, इतर कॅल्शियम, कोलेस्टेरॉल घटक हे योग्य प्रमाणात असतील तर आरोग्य चांगले आहे असे समजले जाते. हे निर्देशांक आरोग्याची स्थिती दर्शवितात. शरीर धडधाकट असेल, तरच तुम्ही हसतखेळत, सुख-समाधानात आनंदात जीवन जगू शकता. तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी, मानसन्मान हवा असेल, तर तुमची आर्थिक संपत्ती मजबूत हवी. आपल्या कुटुंबाचे आर्थिक आरोग्य समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे आर्थिक गुणोत्तर वापरले जातात. या गुणोत्तरांच्या आधारे उत्पन्न, बचत, गुंतवणूक, कर्ज, आपत्कालीन तयारी आणि निवृत्ती नियोजन यांचे योग्य मूल्यांकन करता येते.
उत्पन्नाशी बचतीचे गुणोत्तर
आपल्या उत्पन्नापैकी किती पैसा आपण बाजूला ठेवतो? म्हणजेच बचत करतो. आज अनेक कुटुंबांचे उत्पन्न चांगले आहे. घर, गाडी आहे, मान-सन्मान आहे; पण तरीही आर्थिक ताण, वाद, असुरक्षितता आणि भीती वाढताना दिसते. याचे मुख्य कारण मूलभूत आर्थिक नियमांकडे दुर्लक्ष होय. जर घरात 100 येत असतील तर त्यामधील खर्च होऊन किती टक्के पैसे शिल्लक राहतात? उत्पन्नाशी बचतीचे गुणोत्तर किती आहे? हा पहिला नियम महत्त्वाचा आहे. किमान 35% रक्कम शिल्लक राहत असेल तर हा रेषो सर्वोत्तम आहे, असे मानले जाते. किती टक्के रक्कम शिल्लक राहते, त्यावरून तुमचे भवितव्य अवलंबून राहते. ते खाली सोप्या पण प्रभावी उदाहरणांतून समजून घेऊया.
समजा, एखाद्याचं वार्षिक उत्पन्न 10 लाख आहे. त्यापैकी तो दरवर्षी 2 लाख वाचवतो. म्हणजेच तो आपल्या उत्पन्नाचा सुमारे 20% भाग बचत करतो. इथे बचतीची शिस्त सर्वोत्तम 100% पैकी 60% पर्यंत आहे, हे दिसून येते.
कुटुंबात महिन्याला पैसा आला की, अनेक जण प्रथम खर्च करतात. अशा ठिकाणी पैसा शिल्लक राहत नाही. घरात पैसा आला की, खर्चाचा आराखडा तयार करावा आणि प्रथम बचत बाजूला काढावी. मग राहिलेला पैसा खर्च करावा, तरच बचत शक्य होते आणि महिन्या अखेरीस ताण येत नाही. तसेच हे गुणोत्तर उत्पन्नाशी 35% हून जास्त असेल तर ते सर्वोत्तम मानले जाते. मजबूत बचत आर्थिक आरोग्यासाठी चांगली शिस्त असते. आपल्या घरात किती टक्के पैसे शिल्लक राहतात, त्याचे आर्थिक भवितव्य काय असेल? ही बाब समजून घेतली पाहिजे. आणि बचतीला महत्त्व दिले पाहिजे.
बचत-ते-गुंतवणूक गुणोत्तर
दरमहिन्याला आलेल्या उत्पन्नातून पैसे वाचवितो, त्यापैकी गुंतवणूक किती करतो, याला फार महत्त्व असते. पैशाचे व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी त्यातील जास्तीत जास्त भाग गुंतवणूक केला पाहिजे. जर आपण वाचवलेला पैसा घरात तसाच ठेवला तर त्याची किंमत कमी कमी होत जाणार. बचत खात्यात ठेवले तर 3% ने वाढणार. महागाई 7% ने वाढते आणि पैसा 3% वाढत असेल तर 4% नुकसान होते. बँक एफडी, पोस्टात ठेवले तर 7% व्याज मिळते. महागाईपेक्षा किती टक्क्यांनी उत्पन्न वाढून मिळते, तितक्याच टक्क्यांनी संपत्ती वाढते, हे लक्षात घेतले पाहिजे.
आपत्कालीन निधी गुणोत्तर
आपत्कालीन निधीचे महत्त्व कोरोना काळात जाणवले. ज्यांच्याकडे हा निधी चांगला होता, त्यांनी सुखाचे दिवस अनुभवले. ज्यांच्याकडे निधी नव्हता, त्यांना खायला अन्नही मिळाले नाही. आपत्ती कधी सांगून येत नाही. अचानक नोकरी गेली, कुटुंब प्रमुखाचा अपघात झाला, आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले, तर घरखर्च किती महिने भागवता येईल? हे तपासून पाहावे. किमान सहा ते नऊ महिन्यांचा खर्च- त्यामध्ये घरखर्च, विमा हप्ते, कर्जाचे हप्ते किती होतात, तितकी रक्कम कायम शिल्लक ठेवली पाहिजे.
कर्ज-ते-उत्पन्न गुणोत्तर
कर्जाचे हप्ते येणार्या उत्पन्नातून देत असतो. घरात एकूण किती उत्पन्न येते आणि कर्जाचे हप्ते किती असावेत, त्यासाठी हा निर्देशांक महत्त्वाचा ठरतो. जर तुमच्या घरात 100 रु. येत असतील, तर जास्तीत जास्त 40% पेक्षा जास्त हप्ता नसावा. जितका हप्ता जास्त जाईल, तितकी रक्कम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे भविष्यात संपत्ती निर्माण होऊ शकत नाही. जितका कर्ज हप्ता कमी, तितकी शिल्लक जास्त राहते. आणि भविष्यासाठी चांगली संपत्ती निर्माण करण्यास मदत होते. कर्ज कोणते आहे, हे फार महत्त्वाचे आहे. चांगले कर्ज (गुड लोन) की, वाईट कर्ज (बॅड लोन) अशी दोन प्रकारची कर्जे असतात. ज्या कर्जातून भविष्यात संपत्ती निर्माण होते, त्याला चांगले कर्ज म्हणतात. ज्या कर्जातून संपत्ती निर्माण होत नाही, त्याला वाईट कर्ज म्हणतात.
कर्जाचे मालमत्तेशी गुणोत्तर
आपल्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या मालमत्तेच्या तुलनेत कर्ज किती आहे, हे फार महत्त्वाचे आहे. अचल संपत्ती आणि चल संपत्ती. एकूण मालमत्ता किती आहे आणि त्याच्या तुलनेत कर्ज किती आहे, यावरून निव्वळ मालमत्ता किती आहे, हे काढता येते. मालमत्तेपेक्षा कर्जाचे प्रमाण जास्त असेल तर उणे मालमत्ता होते आणि मालमत्तेच्या तुलनेत कर्ज आटोक्यात असेल तर आपली सांपत्तिक स्थिती उत्तम आहे, हे दर्शविते. कर्ज-ते-मालमत्ता गुणोत्तर -आदर्श निर्देशांक हा 20% प्रमाणित 1: 5 असा असावा. याचा अर्थ तुमची एकूण मालमत्ता दोन कोटी असेल तर तुमचे विविध प्रकारचे कर्ज 40 लाख पर्यंत हवे, तर हा निर्देशांक सर्वोत्तम मानला जातो. निव्वळ मालमत्ता मोजताना राहत्या घराची आपण कधीही विक्री करत नाही आणि त्यामुळे राहत्या घराची किमत गृहीत धरू नये.
कुटुंबात येणारे उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, कर्जे किती आहेत आणि किती असावीत? हे पाहावे. आपल्या घरात विविध निर्देशांकाची सर्वोत्तम पातळी कशी ठेवू शकतो, यावर विचार करा. ती गोष्ट साध्य करण्यासाठी काही धाडसाने, काटकसरीचे निर्णय घ्यावे लागतील. वरील निर्देशांक आपणास आर्थिक नियोजन करण्यासाठी, आपल्या घरात आर्थिक शिस्त लावण्यासाठी, आर्थिक निर्णय घेण्यासाठी मदत करतात. कुटुंबातील इतर सदस्यांना विश्वासात घेऊन आज घेतलेले चुकीचे आर्थिक निर्णय उद्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेवर परिणाम करतात. नातेसंबंध, आरोग्य आणि मानसिक शांतता हिरावून घेतात. म्हणून आर्थिक नियम पाळणे म्हणजे फक्तपैसा वाचवणे नाही, तर आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे होय. योग्य नियोजन व योग्य दिशा मिळाल्यास आर्थिक आरोग्य अधिक मजबूत आणि दीर्घकालीन सुरक्षित होऊ शकते.
बचत असूनही गुंतवणूक नसेल तर?
जसं साचलेले पाणी ते वापरले नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. तसेच पैसा गुंतवला नाही तर तो वाढत नाही. महागाईमुळे तो हळूहळू कमी होत जातो. बचतीपैकी मोठा भाग गुंतवणुकीत गेला पाहिजे. वर्षभर मेहनत करून आपण बचत केली आहे, तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवा. महागाईचा राक्षस आपले वास्तवमधील उत्पन्न खात असतो. म्हणजेच पैशामधील खरेदी शक्ती कमी कमी होत असते. उदा. सात वर्षांपूर्वी एक लिटर पिण्याची पाणी बाटली 10 रु. मध्ये येत होती. तीच दहा रुपयेची नोट घेऊन बाजारात आज पाणी आणावयास गेलो तर अर्धा लिटरच पाणी येते. याचा अर्थ मागील सात वर्षांत महागाईमुळे खरेदी करण्याची शक्ती 50% नी कमी झाली. महागाईने 50% पैसे खाल्ले, असा त्याचा अर्थ होतो .
नियम पाळला नाही तर कुटुंबावर परिणाम:
पैसा खात्यात पडून राहतो. 10-15 वर्षांनी पैसा असूनही उद्दिष्ट पूर्ण होत नाही. ‘इतका पैसा कमावूनही काही जमलं नाही,’ अशी आर्थिक परिस्थिती निर्माण होते.