विधिषा देशपांडे
आजच्या काळात क्रेडिट कार्ड गरजेचे बनले आहे. आता खरेदी करा, नंतर पैसे भरा ही संकल्पना लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग बनली आहे. परंतु, एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, जर एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा पूर्ण वापर केला असेल आणि अचानक त्याचा मृत्यू झाला, तर हे देयक कोण अदा करणार? त्याचा भार कुटुंबावर येतो का? की बँक ते पैसे माफ करते?
बहुतेक क्रेडिट कार्ड अनसिक्युअर्ड लोन मानले जातात. यामध्ये बँक तुम्हाला तुमच्या उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि पूर्वीच्या व्यवहाराच्या इतिहासावर आधारित कार्ड देते. त्यामागे कोणतीही मालमत्ता गहाण ठेवलेली नसते. बँक सर्वप्रथम मृत व्यक्तीच्या मालमत्तेतून थकीत रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे, मृतकाच्या नावावर जर काही बँक शिल्लक, एफडी, गुंतवणूक किंवा मालमत्ता असेल, तर बँक न्यायालयीन प्रक्रियेद्वारे तिथून आपला पैसा मिळवण्याचा प्रयत्न करते.
जर मृत व्यक्तीच्या नावावर काहीही संपत्ती नसेल आणि बँक वसूल करू शकत नसेल, तर त्या कर्जाची रक्कम बँक एनपीएमध्ये वर्ग करते आणि त्या तोट्याचा भार बँक स्वतः सहन करते. कुटुंबावर कोणतेही कर्ज फेडण्याचे ओझं येत नाही. ज्यांची क्रेडिट हिस्टरी चांगली नाही किंवा निश्चित उत्पन्न नाही, त्यांना बँक सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड देते, जे फिक्स्ड डिपॉझिट (एफडी)च्या बदल्यात दिले जाते. जर अशा कार्डधारकाचा मृत्यू झाला, तर बँकेकडे एफडीच्या रूपाने सुरक्षा असते. बँक थेट त्या एफडीची रक्कम वळती करून क्रेडिट कार्डचे थकीत पैसे वसूल करते. उरलेली रक्कम कुटुंबीयांना दिली जाते.
पर्सनल लोन हेही अनसिक्युअर्ड प्रकारात येते. त्यामुळे त्यावरही वरचाच नियम लागू होतो. म्हणजे, मृत्यूनंतर बँक फक्त मालमत्तेतून वसुली करू शकते. संपत्ती नसेल, तर ते कर्जही बुडित खात्यात टाकावे लागते.
पण होम लोन किंवा कार लोन हे सिक्युअर्ड असतात. यामध्ये संबंधित मालमत्ता बँकेकडे गहाण असते. त्यामुळे कुटुंबाने कर्जाचे हप्ते भरल्यास मालमत्ता त्यांच्या नावे राहते, अन्यथा बँक ती मालमत्ता जप्त करून विक्री करून आपले पैसे वसूल करते.
जॉईंट कार्डमध्ये जर एक कार्डधारक मरण पावला, तर संपूर्ण थकीत रक्कम देण्याची जबाबदारी दुसर्या जिवंत धारकावर येते. कार्डधारकाच्या थकीत रकमेचा परिणाम कुटुंबातील इतर कोणाच्याही क्रेडिट स्कोअरवर होत नाही.
अशा स्थितीत कार्डधारकाचा मृत्यू झाला, तर त्या क्रेडिट कार्डवरील थकीत रक्कम भरण्याची कायदेशीर जबाबदारी केवळ त्याच्यावरच असते. बँक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर म्हणजेच पत्नी, मुले, आई-वडील यांच्यावर थकीत रक्कम भरण्यासाठी कायदेशीर दबाव टाकू शकत नाही.