स्वाती देसाई
भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कर नियोजनाचे एक अत्यंत प्रभावी पण दुर्लक्षित साधन म्हणजे ‘हिंदू अविभक्तकुटुंब’ म्हणजेच ‘एचयूएफ’. प्राप्तिकर कायद्यांतर्गत याला पूर्णपणे कायदेशीर मान्यता असूनही, अनेक कुटुंबे केवळ वैयक्तिक ‘पॅन’ कार्डवरच सर्व आर्थिक व्यवहार करतात. मात्र, सनदी लेखापाल नितीन कौशिक यांच्या मते, ही रचना वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबाचा करपात्र भार लक्षणीयरीत्या कमी करू शकता.
प्राप्तिकर कायद्यानुसार, एचयूएफ ही त्याच्या सदस्यांपासून वेगळी एक ‘स्वतंत्र व्यक्ती’ मानली जाते. याचाच अर्थ, कुटुंबातील सदस्यांकडे स्वतःचे वैयक्तिक पॅन कार्ड असताना, कुटुंबाच्या नावाने एक वेगळे पॅन कार्ड काढता येते. एचयूएफ स्वतःच्या नावाने मालमत्ता खरेदी करू शकते, व्यवसाय करू शकते आणि गुंतवणूकही करू शकते.
जानेवारी 2026 मधील नवीन नियमांनुसार, ‘नवीन कर प्रणाली’ मध्ये 4 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. जर तुम्ही एचयूएफ तयार केले, तर ही 4 लाखांची मर्यादा तुम्हाला वैयक्तिकरीत्या आणि तुमच्या एचयूएफला स्वतंत्रपणे मिळते. यामुळे कुटुंबाचे एकूण 8 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कायदेशीररीत्या करमुक्तहोऊ शकते.
एचयूएफ स्थापन केल्याने केवळ स्लॅबचाच फायदा मिळतो असे नाही, तर इतर अनेक सवलतीही मिळतात :
स्वतंत्र वजावट : प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांची आणि 80 डी अंतर्गत आरोग्य विम्याची वजावट वैयक्तिक पॅनप्रमाणेच एचयूएफलाही स्वतंत्रपणे मिळते.
भांडवली नफ्यावर सवलत : शेअर्स किंवा मालमत्तेच्या विक्रीतून मिळणार्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर मिळणारी सवलत एचयूएफला स्वतंत्रपणे घेता येते.
गुंतवणुकीचे साधन : एचयूएफ स्वतःच्या नावाने मुदत ठेवी, शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकते. आयपीओमध्ये अर्ज करतानाही स्वतंत्र पॅनमुळे शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते.
वडिलोपार्जित मालमत्ता : कुटुंबातील वडिलोपार्जित मालमत्तेतून मिळणारे भाडे किंवा उत्पन्न थेट एचयूएफच्या खात्यात दाखवून वैयक्तिक कराचा स्लॅब वाढण्यापासून रोखता येते.
एचयूएफ स्थापन करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी एका घोषणापत्राची आवश्यकता असते, ज्यामध्ये कुटुंबाचा प्रमुख किंवा ‘कर्ता’ आणि इतर सदस्यांची नावे असतात. एकदा का स्वतंत्र पॅन कार्ड आणि बँक खाते उघडले की, ही संस्था एक स्वतंत्र करदाता म्हणून कार्यरत होते.
तथापि, यामध्ये काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. केवळ स्वतःचा पगार एचयूएफच्या खात्यात वळवून कर वाचवता येत नाही. उत्पन्न हे वडिलोपार्जित मालमत्ता, व्यवसाय, भेटवस्तू किंवा गुंतवणुकीतून आलेले असणे आवश्यक आहे. तसेच, वडिलांकडून मिळालेली थेट मालमत्ता आणि आजोबांकडून मिळालेली मालमत्ता यांच्यातील कायदेशीर फरक समजून घेणे गरजेचे आहे.
ज्या कुटुंबांचे उत्पन्न अनेक स्रोतांतून येते, जसे की घरभाडे, व्यवसाय आणि शेअर्समधील गुंतवणूक, त्यांच्यासाठी एचयूएफ हे एका दुसर्या आर्थिक इंजिन प्रमाणे काम करू शकते. केवळ कर वाचवण्यासाठीच नाही, तर भावी पिढीसाठी संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठीही ही रचना अत्यंत उपयुक्तठरते.