पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएम मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत मांडला. अर्थसंकल्पात गरीब, मध्यमवर्ग, शेतकरी, युवा, महिला या वर्गावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नसल्याची महत्त्वाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. दरम्यान, आज सादर झालेल्या अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. आज विशेषतः पायाभूत सुविधांशी संबंधित शेअर्समध्ये घसरण झाली. तर खप (कन्झम्शन) संबंधित शेअर्समध्ये वाढ दिसून आली. अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक स्थिर पातळीवर राहिले. सेन्सेक्स ५ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७७,५०५ वर बंद झाला. तर निफ्टी २६ अंकांच्या घसरणीसह २३,४८२ वर स्थिरावला.
निफ्टी FMCG निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत वाढला. तर कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक २.९ टक्के वाढला. रियल्टी निर्देशांकाने ३.३ टक्के वाढ नोंदवली. बीएईस मिडकॅप ०.५ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप ०.२ टक्के वाढला.
दरम्यान, आज संसदेत अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्प मांडत असताना शेअर बाजारातील (Stock Market) सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात चढ-उतार दिसून आला. दुपाच्या व्यवहारात सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरून ७७,१५० च्या खाली आला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक १०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह २३,३९१ वर होत. त्यानंतर पुन्हा दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर आले.
सेन्सेक्सवर झोमॅटोचा शेअर्स तब्बल ७ टक्के वाढून २३६ रुपयांवर पोहोचला. तर मारुती सुमारे ५ टक्के, आयटीसी हॉटेल्स ४.७ टक्के, आयटीसी ३.३३ टक्के, एम अँड एम २.९ टक्के, एशियन पेंट्स २ टक्के, टायटन १.८ टक्के, इंडसइंड बँक १.७ टक्के, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स १.४ टक्के वाढले. तर पॉवर ग्रिड ३.७ टक्के, एलटी ३.३ टक्के, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट प्रत्येकी २ टक्के घसरले.
यावेळी सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नाहीत. पण केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी २.५५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये घसरण दिसून आली. RVNL चा शेअर्स सुमारे ९ टक्के घसरला.