* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 573.25 अंक व 1844.20 अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक 23431.5 अंक व 77378.91 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.39 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 2.33 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. निफ्टीमध्ये सर्वाधिक कोसळणार्या कंपन्यांमध्ये श्रीराम फायनान्स (-12.7 टक्के), ट्रेंट (-9.9 टक्के), एनटीपीसी (-9.3 टक्के), टाटा स्टील (-7.9 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (-7.8 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. तसेच सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (4 टक्के), टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट (3.6 टक्के), एचसीएल टेक (2.5 टक्के), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (2.2 टक्के), एसबीआय लाईफ (2.1 टक्के) यांचा समावेश झाला. या आठवड्यात प्रामुख्याने चीनमधून भारतात दाखल झालेल्या एचएमपीव्ही या व्हायरसमुळे भांडवल बाजारातदेखील मंदीचे वातावरण होते. याचप्रमाणे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे रुपया चलनाने डॉलरच्या समोर या आठवड्यातदेखील घसरण दर्शवली. याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास या सप्ताहात सुरुवात झाली. या सर्वाचा एकत्रित परिणाम भारतीय भांडवल बाजारात बघावयास मिळाला.
* रुपया चलनाने डॉलरच्या तुलनेत तळ गाठला. शुक्रवारअखेर रुपया डॉलरच्या तुलनेत 85.9650 रुपये प्रतिडॉलरच्या आजपर्यंतच्या सर्वाधिक कमकुवत पातळीवर बंद झाला. या सप्ताहात रुपया पुन्हा एकदा 0.2 टक्क्यांनी घसरला. गेले 10 आठवडे रुपया सातत्याने घसरण दर्शवत आहे. अमेरिकेत नॉन फार्म पेरोल डेटा म्हणजे रोजगारसंबंधी आकडे दर्शवणारे निर्देशांकाचे निकाल येणार आहेत. यामुळे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल बँकेकडून पुन्हा एकदा व्याजदर कपातीची अपेक्षा करण्यात येत आहे. असे झाल्यास डॉलर इतर चलनांच्या तुलनेत आणखी मजबूत होण्याची आशंका व्यक्त करण्यात येत आहे. यात भरीसभर म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव पुन्हा भडकले आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम रुपया चलन कमकुवत होण्यात झाला; परंतु रिझर्व्ह बँकेने वेळीच हस्तक्षेप करून डॉलर्स विक्रीला काढले आणि रुपयाला 86 रुपये प्रतिडॉलरच्या पुढे जाण्यापासून तात्पुरते रोखले.
* देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर. टीसीएसचा महसूल मागील तिमाहीच्या तुलनेत 0.4 टक्के घटून 64,259 कोटींवरून 63973 कोटी झाला; परंतु कंपनीचा निव्वळ नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 4 टक्के वधारून 11909 कोटींवरून 12380 कोटी झाला. निव्वळ नफा वाढण्याचे प्रमुख कारण नेट प्रॉफिट मार्जिनमध्ये झालेली वाढ. नेट प्रॉफिट मार्जिन 18.5 टक्क्यांवरून 19.4 टक्क्यांवर पोहोचली. सध्या टीसीएसची ऑर्डर बुक (कामासाठीच्या निविदा) 10.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
* महिंद्रा अँड महिंद्राकडून पुण्यातील चाकणमध्ये विद्युत वाहन निर्मितीचा (ई-व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट) प्रकल्प उभारला जाणार. यासाठी एकूण 4500 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. वर्षाकाठी 90 हजार विद्युत वाहन निर्मिती करण्याची या प्रकल्पाची क्षमता असणार असून वाहनांसोबतच विद्युत वाहनांच्या बॅटरीचे उत्पादनदेखील या ठिकाणी घेता येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर या प्रकल्पात करण्यात येणार आहे. 2021-22 ते 2026-27 या पंचवार्षिक योजनेत एकूण 16 हजार कोटींची गुंतवणूक ईव्ही क्षेत्रात करण्याचे महिंद्राने जाहीर केले होते. याचाच एक भाग म्हणून 4500 कोटींची गुंतवणूक चाकणमध्ये करण्यात येणार आहे. एकूण 88 हजार चौरस मीटरवर हा प्रकल्प विस्तारलेला असणार आहे आणि 1 हजारच्या जवळपास रोबोट यामध्ये कार्यरत असतील.
* वर्ष 2024 मध्ये म्युच्युअल फंडाद्वारे भारतीय भांडवल बाजारामध्ये तब्बल 3.9 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत 144 टक्क्यांची वाढ बघावयास मिळाली. 2022 मध्ये 1,61,044 कोटी, तर 2023 मध्ये 1,61,578 कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंडामार्फत आली होती; परंतु आता 2024 मध्ये याच्या सुमारे अडीचपट म्हणजे 3,94,260 कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंडामार्फत केली. यामध्ये दरमहा किंवा विशिष्ट कालावधीच्या एसआयपी सिपद्वारे होणार्या गुंतवणुकीचा वाटा 2,68,322 कोटी इतका अवाढव्य झाला. 31 डिसेंबर 2024 अखेर एकूण भारतातील म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापनांतर्गत भांडवलमूल्य 69.33 लाख कोटींवर पोहोचले. 2022 मध्ये हे भांडवल मूल्य (असेट अंडर मॅनेजमेंट) 40.76 लाख कोटी, तर 2023 मध्ये हे 51.09 लाख कोटी होते. डिसेंबर 2024 मध्ये एसआयपी/सिपद्वारे होणार्या गुंतवणुकीचा आकडा विक्रमी 26,459 कोटींवर गेला. सातत्याने म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा वाढता आकडा हा भारतीय स्थानिक गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरचा विश्वास दर्शवतो.
* नोव्हेंबर 2024 मध्ये भारताच्या औद्योगिक प्रगतीचे निदर्शक असलेला औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मागील 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 5.20 टक्क्यांवर पोहोचला. वस्तूनिर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील वाढ 5.8 टक्के तसेच यंत्रसामग्री क्षेत्रातील वाढ 9 टक्क्यांवर गेली. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एक अहवालात 2025 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्था वृद्धीदराचा अंदाज 6.6 टक्के राहणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले. वर्ष 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.8 टक्के दराने वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
* अदानी समूहाने आपली एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी अदानी विल्मरमधील 12.5 टक्के हिस्सा विकला. एकूण 17.54 कोटी समभागांची विक्री करण्यात आली. या विक्रीद्वारे सुमारे 4850 कोटींचा निधी अदानी समूहाने जमवला. ही विक्री संस्थात्मक गुंतवणूकदारांना करण्यात आली. आता 13 जानेवारी रोजी 275 रुपयांच्या न्यूनतम किमतीवर (फ्लोअर प्राईस) सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी (रिटेल इन्व्हेस्टर) समभाग विक्री केली जाणार. ऑफर फॉर सेलसाठी अधिकचे 6.50 टक्के हिस्सेदारी म्हणजेच 8.44 कोटी समभागदेखील उपलब्ध होणार आहेत. पायाभूत, ऊर्जानिर्मिती, बांधकाम व्यवसायासारख्या प्रमुख क्षेत्रात असणार्या कंपन्यांवर (कोअर बिझनेस) लक्ष केंद्रित करण्यासाठी इतर कंपन्यांमधील हिस्सेदार विकत असल्याचे अदानी समूहातर्फे सांगण्यात येत आहे.
* सोने आयातीच्या आकड्यांमध्ये घोळ. सोने आयातीच्या आकडेवारीत दुहेरी मोजणी झाल्याने आयातीचा आकडा वाढला. यामध्ये आकडेवारी करणार्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी आढळल्याचे सरकारचे म्हणणे. नोव्हेंबरमध्ये 37.84 अब्ज डॉलर्सची व्यापारतूट जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सोन्याची आयात जबरदस्त वाढल्याचे दिसत होते; परंतु हा आकडा आता सुधारित होऊन 32.8 अब्ज डॉलर्स असा ठरवण्यात आला आहे.
* 3 जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 5.7 अब्ज डॉलर्सनी घटून 10 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 634.59 अब्ज डॉलर्सवर आली. या मागील तीन सप्ताहांत गंगाजळी सातत्याने एकूण 17.8 अब्ज डॉलर्सनी घटली आहे. ढासळत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलर विक्रीचा सपाटा लावल्याने गंगाजळी घटत असल्याचे अर्थ विश्लेषकांचे मत.