पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) नुकतेच त्याचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाला लक्ष्य केले होते. यामुळे अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Adani Group stocks) घसरण होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आता हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नेट अँडरसन याच्यावर सिक्युरिटीज फसवणुकीचा आरोप लावला जाऊ शकतो, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
एका कॅनडाच्या पोर्टलवर आधारित एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विविध कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी रिपोर्ट्स तयार करताना हेज फंडशी संगनमत केल्याप्रकरणी नेट अँडरसनची चौकशी सुरू आहे. यासाठी या पोर्टलने ओंटारियो न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांचा हवाला दिला आहे.
पोर्टलने पुढे म्हटले आहे की, मानहानी खटल्यात ओंटारियो सुपीरियर कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांवरून असे स्पष्ट झाले आहे की कॅनडाच्या अँसन हेज फंडचे प्रमुख मोएझ कस्सम यांनी हिंडेनबर्गचे नेट अँडरसनसह विविध सुत्रांकडे संशोधनाची माहिती शेअर केल्याचे कबूल केले आहे.
मार्केट फ्रॉड्स पोर्टलने पुढे नमूद केले आहे की न्यायालयातील कागदपत्रांवरून कथितरित्या उघड झाले की हिंडेनबर्ग रिसर्चने रिपोर्ट तयार करताना अँसन हेज फंडचे अँसनशी संगनमत केले.
सहभागाची माहिती न देता 'बेयरिश ट्रेंड' निर्माण करणारा रिपोर्ट तयार केल्याबद्दल यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) द्वारे सिक्युरिटीज फसवणुकीचा आरोप केला जाऊ शकते, हे देखील त्यांत अधोरेखित करण्यात आले आहे.
कंपन्यांबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट समोर आल्यानंतर शॉर्ट-सेलर्सनी सिक्युरिटीज उधार घेऊन त्या खुल्या बाजारात विकणे आणि नंतर कमी किमतीत त्याची पुन्हा खरेदी करणे हे सामान्य आहे. पण हेज फंडचा या प्रकरणात सहभाग असणे ही चिंता निर्माण करणारी गोष्ट आहे. कारण असे फंड समांतर पैसे लावू शकतात ज्यामुळे शेअर्सच्या किमतीवर घसरणीचा दबाव वाढतो. दरम्यान, अँडरसन, अँसन आणि कस्सम यांनी अद्याप या प्रकरणी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
पीटीआयने पोर्टलचा हवाला देत म्हटले आहे, "अँडरसन आणि अँसन फंड्स यांच्यात ईमेलद्वारे झालेल्या संभाषणांमुळे आम्हाला असे दिसून आले आहे की तो प्रत्यक्षात अँसनसाठी काम करत होता. त्याला जसे सांगण्यात आले, त्यानुसार त्याने तसा रिपोर्ट प्रकाशित केला. त्यात प्राइस टार्गेटपासून ते रिपोर्टमध्ये काय असावे आणि काय नसावे? याचा समावेश होता.
"जर आणखी हवे आहे का? असे त्याला अनेकवेळा विचारण्यात आले. या त्यांच्या संभाषणातून असे दिसून येते की, त्याचे कधीही संपादकीय नियंत्रण नव्हते. त्याला नेमके काय प्रकाशित करायचे ते सांगितले जात होते," असा दावाही पोर्टलने केला आहे.