सर्वसाधारण विम्याला टॉपअप आणि सुपर टॉपअप ही पॉलिसी जोडल्यास कमी हप्त्यात अधिक रकमेचे विमा संरक्षण मिळविणे आता शक्य झाले आहे.
आरोग्य विमा हे आपल्या जीवनाचा आता एक अविभाज्य घटक बनला आहे. आजारपणात रुग्णालयांमध्ये होणारा खर्च वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विमा सर्वांना आधारभूत ठरतो आहे. तथापि, योग्य रकमेचा विमा घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. याचे कारण आहे आरोग्य विम्याचा वाढत जाणारा प्रीमियम. कर्करोग, हृदयरोग अशा गंभीर आजारांमध्ये चांगल्या रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर जात आहे. अशा व्यक्तींच्या समस्या आरोग्य विमा बर्याच प्रमाणात हलक्या करू शकतो; परंतु प्रीमियम हल्ली मोठा असल्यामुळे मोठ्या रकमेचा आरोग्य विमा घेणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. परिणामी, खिशाला परवडेल तेवढ्याच प्रीमियमचा विमा घेतला जातो. तेवढ्या विमा रकमेत गंभीर आजारावरील उपचार पूर्ण होतीलच असे नाही.
अशावेळी सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की, ज्याचा हप्ताही परवडणारा असेल आणि विम्याची रक्कमही जास्त असेल, असा आरोग्य विमा उपलब्धच नाही की काय? आरोग्य विमा घेताना आपण आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतील आणि त्यांच्या उपचारांवर किती खर्च होऊ शकतो, याचा अंदाज घेतो. आपल्या गरजेनुरूप आपल्याला दहा लाखांपर्यंतचा आरोग्य विमा पुरेसा ठरतो; परंतु एवढ्या मोठ्या रकमेच्या विम्यासाठी हप्ता म्हणजेच प्रीमियमही जास्त असतो. मग, आपण विचार बदलून विम्याची रक्कम कमी करतो आणि पाच लाखांचा आरोग्य विमा घेतो. उदाहरणार्थ, एखाद्या तीस वर्षे वयाच्या व्यक्तीच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे आणि त्याने दहा लाखांचा विमा घेतला, तर त्याचा विमा हप्ता सुमारे 25 हजारांपर्यंत जातो; परंतु याच विमा योजनेअंतर्गत तीन लाखांचा आरोग्य विमा घेतला, तर हप्ता 12 हजार रुपये भरावा लागतो. मध्यमवर्गीय व्यक्तीला बर्याच जबाबदार्या पार पाडाव्या लागत असल्यामुळे 25 हजारांचा हप्ता त्याला परवडत नाही. ज्यांचा विमा हप्ता जास्त आहे, अशा सर्वसाधारण विमा कंपनीच्या विम्याबाबत विमा रक्कम कमी करण्यावाचून गत्यंतरच नसते; परंतु आता बाजारात अशा पॉलिसी उपलब्ध आहेत, ज्यांचा संबंध सर्वसाधारण विम्याशी जोडून एक मोठ्या रकमेचा विमा केला जाऊ शकतो. टॉपअप पॉलिसी अशा व्यक्तींसाठीच जणू तयार करण्यात आली आहे, ज्यांना कमी हप्त्यामध्ये जास्त विमा रकमेचे संरक्षण अपेक्षित आहे.
याअंतर्गत कोणत्याही दाव्यासाठी (क्लेम) एका निश्चित रकमेचे वहन स्वतः केल्यास त्यानंतर टॉपअप पॉलिसीमधून दावा करता येतो. विम्याच्या भाषेत याला ‘डिडेक्टेबल’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. म्हणजेच आपण 10 लाखांची टॉपअप पॉलिसी खरेदी केली आणि त्यात तीन लाख रुपयांचे ‘डिडेक्टेबल’ आहे, तर पाच लाखांचा क्लेम केल्यावर आपल्याला पहिल्या तीन लाख रुपयांच्या रकमेचे आपल्या विमा राशीतून वहन करावे लागेल. त्यासाठी स्वतःची जमा रक्कम किंवा सर्वसाधारण विमा किंवा नियुक्ती करणार्याकडून मिळालेली आरोग्य विमा पॉलिसी उपयोगी पडते. त्यानंतरचे दोन लाख रुपये आपण टॉपअप पॉलिसीमधून क्लेम करू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्य असे की, त्यांचा प्रीमियम कमी असतो; परंतु या ठिकाणीही दोन प्रकारच्या पॉलिसी असतात. टॉपअप आणि सुपर टॉपअप हे ते दोन प्रकार होत. या दोहोंमधील फरक म्हणजे, टॉपअप पॉलिसीतून क्लेम करण्यासाठी एका वेळच्या खर्चासाठीच रक्कम तीन लाखांपेक्षा अधिक असणे गरजेचे असते. सुपर टॉपअप पॉलिसीमध्ये वर्षभरात कितीही क्लेम केले, तरी सर्व क्लेमच्या रकमांची बेरीज करून रक्कम तीन लाखांपर्यंत पोहोचली, तरी चालेल, अशी तरतूद असते.
एक उदाहरण देऊन या टॉपअप पॉलिसीचे सर्वसाधारण विमा पॉलिसीसोबत कार्यान्वयन कसे केले जाते, हे समजून घेता येईल. समजा तुम्ही तीन लाख रुपयांचा सर्वसाधारण विमा घेतला असेल किंवा नियोक्त्याकडून मिळालेल्या आरोग्य विमा पॉलिसीची रक्कम तेवढी असेल, तर आपल्याला तीन लाखांपर्यंतचे संरक्षण मिळते आहे. जर स्वतंत्रपणे विमा घेतला, तर तुम्हाला दहा ते बारा हजारांच्या दरम्यान प्रीमियम भरावा लागेल. जर या पॉलिसीची रक्कम वाढवून दहा लाखांपर्यंत नेली, तर प्रीमियम 25 हजारांपर्यंत पोहोचेल. अशा वेळी ज्यातून तीन लाख रुपये ‘डिडेक्टेबल’ आहेत, अशी सात लाखांची टॉपअप किंवा सुपर टॉपअप पॉलिसी तुम्ही घेऊ शकता. अशा पॉलिसीचा प्रीमियम तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यानच असेल. म्हणजेच दहा-बारा हजारांचा प्रीमियम न भरताही तुम्हाला सात लाखांचा अतिरिक्त विमा मिळेल. दोन्ही पॉलिसींचे मिळून विमा संरक्षण दहा लाखांपर्यंत जाईल आणि हे सर्व तुम्हाला 13 ते 15 हजार रुपयांपर्यंतच्या वार्षिक प्रीमियममध्ये उपलब्ध होईल. तुम्ही सर्वसाधारण विम्यासोबत टॉपअप आणि सुपर टॉपअप पॉलिसी जोडली, तर तुम्हाला कमी विमा प्रीमियममध्ये अधिक आरोग्य विमा संरक्षण मिळू शकेल. म्हणजेच, 10 लाखांपर्यंतच्या आरोग्य विम्याची गरज आहे, तर त्यासाठी एरवी 25 हजारांचा वार्षिक हप्ता भरावा लागला असता. त्याऐवजी टॉपअपच्या माध्यमातून तीन लाखांच्या सर्वसाधारण विम्याला टॉपअप पॉलिसी जोडून अवघ्या 15 हजारांमध्ये दहा लाखांचा आरोग्य विमा मिळविता येईल.