प्रीतम मांडके
* एचडीएफसी बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनाम्यानंतर बँकेत मोठी खळबळ माजली. शाखा बँकिंग प्रमुखासह किमान 3 वरिष्ठ अधिकार्यांना पदावरून हटवण्यात आले असून, हे प्रकरण क्रेडिट सुईस AT-1 बाँडच्या चुकीच्या विक्रीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. 18 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली असून, गुंतवणूकदारांना उच्च-जोखमीचे बाँड सुरक्षित परताव्याचे उत्पादन म्हणून विकल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. तसेच याआधी सप्टेंबरमध्ये दुबई वित्तीय प्राधिकरणाने बँकेच्या DIFC शाखेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. या घडामोडींनंतर 19 मार्च रोजी शेअरमध्ये इंट्राडेमध्ये 8.7 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आणि शेवटी 5.3 टक्क्यांनी खाली बंद झाला, जो जून 2024 नंतरचा सर्वात वाईट दिवस ठरला. चालू वर्षात एचडीएफसी बँकेचा शेअर सुमारे 21 टक्के घसरला असून तो निफ्टी 50 च्या 11.6 टक्के आणि निफ्टी बँकच्या 10.5 टक्के घसरणीपेक्षा खूपच अधिक घसरला आहे, तर निर्देशांकात बँकेचे वजन सुमारे 11.8 टक्के आहे. चक्रवर्ती यांनी आपल्या राजीनाम्यात मागील 2 वर्षांतील काही व्यवहार आणि पद्धती वैयक्तिक मूल्ये व नैतिकतेशी विसंगत असल्याचे नमूद केले असून त्यांचा कार्यकाळ मे 2027 पर्यंत अपेक्षित होता. या सर्व घडामोडींनंतरही रिझर्व्ह बँकेने बँक प्रणालीद़ृष्ट्या महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करत कोणतीही मोठी गव्हर्नन्स समस्या नसल्याचे सांगितले आहे.
* भारताच्या सुमारे 90 टक्के LPG आयातीचा पुरवठा, 50 टक्के ते 55 टक्के कच्चे तेल आणि जवळपास 60 टक्के LNG होर्मूझ सामुद्रधुनीतून येत असून सध्या या मार्गावर जहाजांची संख्या 135 वरून 10 पेक्षा खाली आली आहे. मध्यपूर्वेतून येणारा कच्च्या तेलाचा पुरवठा 17.3 दशलक्ष बॅरल प्रति दिवस वरून 7.4 दशलक्ष बॅरलपर्यंत घसरल्याने भारताला महाग पर्यायांकडे वळावे लागत आहे.
* इराणच्या हल्ल्यामुळे कतारच्या LNG उत्पादन क्षमतेपैकी 17 टक्के उत्पादन बाधित झाले असून सुमारे $20 अब्ज वार्षिक उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुरुस्ती प्रक्रियेला 3 ते 5 वर्षे लागू शकतात, ज्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण होऊ शकतो.
* DGCA ने एअरलाईन्सना एकाच बुकिंगमध्ये 60 टक्के सीट एकत्र आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या सुमारे 20 टक्के सीटच अतिरिक्तशुल्काशिवाय दिल्या जात होत्या. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
* GAIL (इंडिया) कंपनी देशातील वाढत्या नैसर्गिक वायू मागणीच्या पार्श्वभूमीवर सुमारे रु.10,000 कोटींची पाईपलाईन गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. 2030 पर्यंत गॅस वापर 297 दशलक्ष स्टँडर्ड क्यूबिक मीटर प्रति दिवस (mmscmd) पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनी सध्या 16.5 दशलक्ष टन प्रति वर्ष (mtpa) LNG पोर्टफोलिओ हाताळत असून पुढील 5-7 वर्षांत ते वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच भारताच्या 25,000 किमी राष्ट्रीय गॅस ग्रिडला बळकटी देण्यावर भर दिला जात आहे.
* फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीत केवळ 0.8 टक्के वाढ होऊन ती $36.61 अब्जवर पोहोचली, तर आयात 24.1 टक्के वाढून $63.71 अब्ज झाली आहे. परिणामी, व्यापार तूट $27.1 अब्ज इतकी नोंदवली गेली. चीनसोबतची व्यापार तूट 2024-25 मध्ये $102.02 अब्जवर पोहोचली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी वस्तूंनी निर्यातीला काही प्रमाणात आधार दिला आहे.
* केंद्र सरकारने 100 औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी रु.33,660 कोटी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेत 1000 एकरपर्यंतच्या औद्योगिक पार्क्सचा समावेश असून पुढील 6 वर्षांत विकास होणार आहे. यासोबतच रु.2,584 कोटींच्या जलविद्युत योजनेलाही मंजुरी देण्यात आली असून 1,500 मेगावॅट अतिरिक्त क्षमता निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच रु.7,969 कोटींच्या उत्तर प्रदेश रस्ते प्रकल्पालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे.