रिफंड कमी मिळालाय? Pudhari File Photo
अर्थभान

रिफंड कमी मिळालाय?; रिक्वेस्ट फाईल करू शकता, जाणून घ्या प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा
विनिता शाह

31 जुलैपर्यंत आयटीआर भरल्यानंतर अनेक जण रिफंड जमा होण्याची वाट पाहत असतात. अर्थात, रिफंड कितपत मिळू शकतो, याची पूर्वकल्पना आयटीआर भरताना आलेली असते; परंतु काहीवेळा रिफंड लवकर मिळत नाही किंवा कमी मिळतो किंवा अपेक्षेप्रमाणे कमी मिळतो. यादरम्यान, प्राप्तिकर विभाग करदात्यांना रिटर्नची प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूचना पाठवत असते. ही सूचना करदात्याच्या मेलवर मिळते.

साधारणपणे तीन-चार आठवड्यांनंतर रिफंडचा पैसा करदात्याच्या खात्यात जमा केला जातो. 31 जुलै ही प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची तारीख असते. यावेळी 7.28 कोटी नागरिकांनी आयटीआर भरल्याची नोंद झाली आहे. एकूण दाखल केलेल्या आयटीआरमध्ये कर भरणार्‍या लोकांची संख्या निम्म्यापेक्षा कमी आहे.

रिफंड कसा मिळतो?

एखाद्या करदात्याने जादा टीडीएस भरला असेल तर प्राप्तिकर खात्याकडून रिफंड दिला जातो. अर्थात, प्राप्तिकर विवरण दाखल करताना करदात्यांच्या कराचे आकलन केले जाते. त्याचवेळी किती अधिक कर भरला आहे, याचे आकलन होते. कमी कर भरला आहे का? आकारला गेलेला कर पूर्णपणे भरला आहे का? याचे आकलन केले जाते. सद्य:स्थितीत करदात्यांना आयटीआर प्रक्रिया होण्याची पूर्वसूचना मिळण्यास सुरुवात झाली असेल, अशी अपेक्षा करू.

मेल आयडीवर येते इंटिमेशन

प्राप्तिकर विभागाच्या सेक्शन 143 (1) नुसार करदत्यांना आयटीआर भरल्याचे इंटिमेशन पाठविण्यात येते. ही सूचना करदात्याच्या मेल आयडीवर पाठविली जाते. त्यामुळे करदात्यांनी मेल तपासत राहणे गरजेचे आहे. याशिवाय प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर ई- फायलिंगला लॉग-इन करूनही करदाते रिटर्नचे स्टेटसही पाहू शकतात. इंटिमेशनमध्ये आपल्यावरचा कर आणि टॅक्स रिफंडची माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे इंटिमेशन लेटरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्राप्तिकर खात्याकडून कर आकारणी योग्य नसेल आणि आपला रिफंड अधिक राहत असेल, तर प्राप्तिकर खात्याच्या कलम 154 नुसार रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट फाईल करू शकता.

विनंती कशी दाखल करायची?

करदाते रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट इन्कमटॅक्स खात्याच्या ई-फायलिंग संकेतस्थळावर सबमिट करू शकतात. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने 8 ऑगस्टला संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती जारी केली आहे. करदाते हे ‘सीपीसी’कडून प्राप्तिकर रिटर्नच्या प्रक्रियेतील चुकीसंदर्भात रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट करू शकतात, असे त्या माहितीत नमूद केले आहे. अशा वेळी रेकॉर्डवर दिसणारी चूक दुरुस्त करण्यासाठी रिक्वेस्ट सबमिट करता येऊ शकते. जर रिटर्नमध्ये अन्य प्रकारची चूक असेल, तर ती विनंती स्वीकारली जाणार नाही. करदात्याकडून काही चूक झाली असेल, तर त्यासाठी सुधारित आयटीआर दाखल करावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT